scorecardresearch

दोन हजार रुपयांच्या नोटा दुर्मीळ!; वर्षभरात १.२० लाख कोटी नोटा चलनातून ‘गायब’

देशातील सर्वाधिक मूल्याची नोट अर्थात २,००० रुपयांच्या नोटांचे चलनातील प्रमाण सातत्याने घटत असून, त्या उलट कमी मूल्यांच्या नोटांचे प्रमाण उत्तरोत्तर वाढत चालल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेने शुक्रवारी दिलेल्या माहितीतून स्पष्ट होते.

मुंबई : देशातील सर्वाधिक मूल्याची नोट अर्थात २,००० रुपयांच्या नोटांचे चलनातील प्रमाण सातत्याने घटत असून, त्या उलट कमी मूल्यांच्या नोटांचे प्रमाण उत्तरोत्तर वाढत चालल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेने शुक्रवारी दिलेल्या माहितीतून स्पष्ट होते. सरलेल्या मार्चअखेर चलनातील सर्व मूल्याच्या नोटांच्या संख्येच्या तुलनेत २,००० रुपयांच्या नोटांच्या संख्येचे प्रमाण १.६ टक्क्यांवर घसरले आहे, दोन वर्षांपूर्वी ते २.४ टक्के होते.

चलनातील सर्व मूल्यांच्या एकूण चलनी नोटांची संख्या १३,०५३ कोटी इतकी मार्च २०२२ अखेर पोहोचली आहे. जी गेल्या वर्षी याच काळात १२,४३७ कोटी होती. यामध्ये गेल्या वर्षांतील मार्चअखेर २,००० रुपयांच्या नोटांची संख्या २७४ कोटी होती. म्हणजेच ५.४८ लाख कोटी रुपये मूल्याच्या नोटा चलनात होत्या. यंदा मार्चअखेर ४.२८ लाख कोटी रुपये मूल्याच्या नोटा चलनात आहेत. म्हणजे वर्षभराच्या कालावधीत १.२० लाख कोटी रुपये लाख कोटी मूल्याच्या दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून गायब झाल्याची माहिती पुढे आली आहे. मूल्याच्या बाबतीत, एकूण चलनी नोटांमधील २,००० रुपयांच्या नोटांचे चलनातील प्रमाण मार्च २०२० अखेरीस २२.६ टक्क्यांच्या पातळीवरून, मार्च २०२१ अखेर १७.३ टक्क्यांवर घसरले आणि मार्च २०२२च्या अखेरीस ते १३.८ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. 

पाचशे रुपयांचे वजन वाढले

दोन हजार रुपयांच्या तुलनेत ५०० रुपयांच्या नोटांचे चलनातील प्रमाण वाढले आहे. विद्यमान २०२२ (कॅलेंडर) वर्षांतील मार्चअखेरीस २२.७७ लाख कोटी रुपये मूल्याच्या ५०० रुपयांच्या नोटा चलनात आहेत. गेल्या वर्षी मार्चअखेरीस हेच प्रमाण १९.२३ लाख कोटी रुपये होते. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन कोटी ४३ लाख कोटी रुपयांची भर यंदा ५०० रुपयांच्या नोटांच्या रूपात पडली आहे. एकूण चलनी नोटांमधील ५०० रुपयांच्या चलनातील प्रमाण ३४.९ टक्के आहे. त्या खालोखाल सर्वाधिक प्रमाण हे  १० रुपये मूल्याच्या नोटांचे असून, त्यांचे मूल्य २१.३ टक्के इतके आहे.

चलनातील रोखीचे प्रमाण वाढून ३१.०५ लाख कोटींवर

सध्या चलनात असलेल्या रोखीचे प्रमाण आतापर्यंतच्या सर्वोच्च स्तरावर म्हणजे ३१.०५ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मार्च २०२१ अखेर हेच प्रमाण २८.२७ लाख कोटी रुपये होते. म्हणजेच एक वर्षांच्या कालावधीत चलनातील रोख ही ९.९ टक्क्यांनी वाढली आहे. त्या आधीच्या २०२०-२१ या करोना छायेतील वर्षांत ती १६.८ टक्क्यांनी वाढली होती. ३१ मार्च २०२२ अखेर ५०० आणि २,००० रुपये मूल्याच्या नोटांचे चलनात असलेल्या रोखीतील वाटा हा ८७.१ टक्क्यांवर गेला आहे, जो आधीच्या वर्षांत मार्चअखेर ८५.७ टक्के होता. काळय़ा पैशाला प्रतिबंध तसेच रोकडरहित अर्थव्यवस्थेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी निश्चलनीकरणाची घोषणा केली आणि त्यानंतर २,००० रुपये आणि ५०० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्या. मात्र त्यानंतरही आर्थिक गैरव्यवहार घटल्याचे अथवा रोखीचा वापर कमी झाल्याचे चित्र दिसत नाही.

चलनी नोटा संख्या   मूल्य (रुपये) टक्के

२,००० रु.   २१४ कोटी   ४.२८ लाख कोटी १.६ टक्के

५०० रु. ४,५५४ कोटी २२.७७ लाख कोटी   ३४.९ टक्के

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Two thousand rupee notes rare notes disappear circulation year ysh