06 August 2020

News Flash

आलेखांचे प्रमाण

२००८ साली २०० रुपयांच्या पातळीवर असलेला आयशर मोटर्स २०१६ साली १९,०००च्या पातळीवर आहे.

मागील भागात आलेखांच्या प्रकारांशी ओळख करून घेतली. आजच्या भागात आलेखांच्या प्रमाणांविषयी जाणून घेऊ. सर्वाना गणिती प्रमाण हे परिचयाचे असते.

एखाद्या समभागाचा बाजारभाव वेगाने वाढल्यास ‘वाय’ अक्षावर मोठी जागा व्यापली जाते. आलेख हातांनी आरेखात असताना हा प्रश्न तांत्रिक विश्लेषकांना भेडसावत असे. संगणकीकरण झाल्याने हा प्रश्न जरी सुटला असला तरीही घातांकी पद्धतीचा अवलंब हा या प्रश्नाचे उत्तर होते. हे सोदाहरण स्पष्ट करण्यासाठी आयशर मोटर्स या समभागाचा आलेख पाहू.

२००८ साली २०० रुपयांच्या पातळीवर असलेला आयशर मोटर्स २०१६ साली १९,०००च्या पातळीवर आहे. २०० ते १९,००० ही व्याप्ती मोठी असल्याने गणिती प्रमाणता उपयोगाची नाही. म्हणून ‘एक्स’ अक्षावर गणिती प्रमाणात तर ‘वाय’ अक्षावर घातांकी प्रमाणता वापरून आलेख काढला आहे. आलेख १ हा आयशरचा गणिती प्रमाण वापरून काढलेला तिमाही आलेख असून आलेख २ हा ‘वाय’ अक्षावर घातांकी प्रमाण वापरून काढलेला तिमाही आलेख आहे. घातांकी प्रमाण वापरल्यास मोठय़ा कालावधीचा आलेख स्थापिणे शक्य होते.

घातांकी प्रमाणात समभाग कमी किमतीत असताना त्यातील लहान बदल ठळकपणे दिसतात. दोनपकी एकाच अक्षावर (वाय) घातांकी प्रमाण असल्याने या प्रकारच्या आलेखास लघु घातांकी आलेख, (Semi Log Scale) असे म्हटले जाते. दीर्घ मुदतीचे आलेख काढण्यासाठी लघु घातांकी आलेख सोयीचे असतात.

आधार व प्रतिकार

आधार पातळी म्हणजे ज्या बाजारभावाजवळ मोठय़ा प्रमाणावर खरेदी होते व प्रतिकार म्हणजे ज्या भाव पातळीवर मोठय़ा प्रमाणावर त्या समभागाची विक्री होते. जेव्हा समभाग या पातळ्या तोडतो तेव्हा आधीची आधार पातळीचे प्रतिकारात रूपांतर होते किंवा भाव वर गेल्यास आधीचा प्रतिकार नवीस आधार बनतो.

बाजारातील सट्टेबाजाचे वर्गीकरण तीन गटांत केले असून हे गट तेजीवाले, मंदीवाले कुंपणावरचे या नावांनी ओळखले जातात. बाजाराचा प्रवास वरच्या दिशेने होत असताना तेजीवाले खूश असतात, परंतु मोठय़ा प्रमाणात खरेदी न केल्याचे शल्य असते. तर मंदीवाले आपले धोरण चुकल्याने हळहळत असतात व भाव खाली आल्यास सौदा फिरविण्याच्या मानसिकतेत असतात, तर कुंपणावरचे योग्य भाव मिळाल्यास खरेदीची आस धरून असतात. भाव घसरून खाली आल्यास एका ठरावीक पातळीवर तिघेही आपापले धोरण आक्रमकपणे राबवतात व उलाढाल वाढल्याने ही पातळी समभागाची आधार पातळी ठरते. असेच उलटय़ा दिशेने घडल्यास त्या भावास प्रतिकार पातळी तयार होते.

हे अधिक स्पष्ट करण्यासाठी अरिवदचा आलेख सोबत दिला आहे. खालील आलेखात अरिवदचा २९५चा भाव आधी तीन वेळा प्रतिकार होता, परंतु नंतर हाच भाव आधार ठरला.

(क्रमश:)
Untitled-1

sachinm67@yahoo.co.in

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2016 2:04 am

Web Title: digram
Next Stories
1 बँकांची समस्या नेमकी आहे काय?
2 निर्णय धमक कौतुकास्पद!
3 व्याजदर चढ-उतारांना तयार राहा!
Just Now!
X