|| अतुल कोतकर

आयडीएफसी फ्लेक्सीकॅप फंड

 

फंड गट         –       फ्लेक्सी कॅप

फंडाची सुरुवात  –     २८ सप्टेंबर २००५

फंड मालमत्ता    –    ५,२८९ कोटी (३१ मार्च २०२१)

मानदंड            –     एस अ‍ॅण्ड पी बीएसई ५०० टीआरआय

‘जिथे फुले वेचली तिथे गोवऱ्या वेचण्याची वेळ येणे’ या वाक्प्रचाराचे फंड जगतातील उदाहरण द्यायचे असेल तर आयडीएफसी फ्लेक्सीकॅप फंडाचे देता येईल. हा तत्कालीन आयडीएफसी प्रीमिअर इक्विटी फंड ज्यात कधी काळी गुंतवणूकदार पैसे गुंतविण्यास आतुर असत आणि फंड घराण्याने निधी ओघ मर्यादित राहावा म्हणून केवळ ‘एसआयपी’ पद्धतीने तेसुद्धा रोजच्या विशिष्ट मर्यादेत गुंतविण्याचे धोरण आखले होते. सध्या क्रमवारीत नसलेला हा फंड गुंतवणूकदारांच्या खिजगणतीत नाही. गुंतवणूकदारांचे असे टोकाचे वर्तन घडायला अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्या.

आयडीएफसी प्रीमिअर इक्विटीपासून आयडीएफसी मल्टिकॅप आणि आता आयडीएफसी फ्लेक्सीकॅप असा फंडाचा प्रवास होताना मागील पाच वर्षांत या फंडाचे पाच वेळा निधी व्यवस्थापक बदलले. या फंडाने वैभवाचा काळ केनेथ अँड्यू यांच्या कारकीर्दीत पाहिला. ते जून २००६ ते सप्टेंबर २०१६ दरम्यान ११ वर्षे निधी व्यवस्थापक होते. सप्टेंबर २०१५ ते मार्च २०१६ अनिरुद्ध नाहा, एप्रिल २०१६ ते डिसेंबर २०१९ दरम्यान फंड व्यवस्थापनाची धुरा दोनदा अनुप भास्कर यांच्याकडे आणि एकदा कार्तिक मेहता यांनी सांभाळली. अनुप भास्कर जे या फंड घराण्याचे मुख्य गुंतवणूक अधिकारी आहेत त्यांची कारकीर्द लखलखीत असूनदेखील त्यांचा अनुभव फंडाच्या कामगिरीत प्रतिबिंबित झाला नाही. फंडाचे नाव आणि निधी व्यवस्थापकांच्या बरोबरीने फंडाच्या गुंतवणूक रणनीतीतसुद्धा बदल झाले.

केनेथ अँड््यू हे निधी व्यवस्थापक असताना उदयोन्मुख आणि मुख्य प्रवाहात नसलेल्या कंपन्यांना हेरून गुंतवणूक करून भांडवली नफा कमावणे ही त्यांची रणनीती होती. अँड््यू यांच्या काळात मिड अँण्ड स्मॉल कॅप म्हणून ओळखला जाणारा हा फंड सुसूत्रीकरणानंतर म्हणजे एप्रिल २०१९ पासून मल्टिकॅप गटात संक्रमित झाला. फंडाची २०१४-२०१६ ही भरभराटीची वर्षे होती. तत्कालीन निधी व्यवस्थापकांनी मिड कॅपमधील व्याप्ती वाढविली आणि त्याच वेळी मिड कॅपमधील मोठ्या घसरणीमुळे फंडाची कामगिरी बाधित झाली. कार्तिक मेहता यांच्या काळात या फंडाच्या गुंतवणुकीत सरासरी ७० टक्के लार्ज कॅप राखले जात असत. फंडाच्या गुंतवणुकीत सप्टेंबर २०१६ नंतर लार्ज कॅप समभागांचे प्रमाण अधिक आणि गुंतवणुकीत अतिवैविध्याचा विपरीत परिणाम फंडाच्या कामगिरीवर झाला. समभागांच्या ध्रुवीकरणाने बाधित झालेल्या परताव्यामुळे गुंतवणूकदारांनी या फंडाकडे पाठ फिरविली. हा झाला इतिहास.

वर्तमानात डोकावल्यास, या फंडाच्या निधी व्यवस्थापनाची सूत्रे ८ डिसेंबर २०२० पासून फंड घराण्याने सचिन रेळेकर आणि अनुप भास्कर यांच्याकडे देण्याचा निर्णय घेतला. सचिन रेळेकर हे एलआयसी म्युच्युअल फंडाच्या समभाग गुंतवणुकीचे मुख्य गुंतवणूक अधिकारी होते. ते निधी व्यवस्थापक असलेल्या फंडांचा त्यांनी केलेला जीर्णोद्धार लक्षात घेता ते या फंडाची कामगिरी सुधारतील अशी आशा वाटावी अशी परिस्थिती आहे. या फंडाच्या निधी व्यवस्थापनाची सूत्रे हाती घेतल्यापासून हा फंड लार्ज अ‍ॅण्ड मिड कॅप फंडाच्या गुंतवणुकीसारखा ते व्यवस्थापित करीत आहेत. फंडाच्या गुंतवणूक रणनीतीमध्ये वारंवार परिस्थितीजन्य बदल केल्याने फंड वैभवाच्या शिखराला दुरावला. त्याचा विपरीत परिणाम परताव्यावर झाल्याने अनेकांनी या फंडातील नियोजनबद्ध गुंतवणूक बंद केली, तर काहींनी या फंडातून पैसे काढून घेतले.

सचिन रेळेकर यांच्यासारख्या कर्तृत्व सिद्ध केलेल्या व्यक्तीची निधी व्यवस्थापकपदी नेमणूक झाल्यानंतर फंडाने कूस पालटली असून फंड गतवैभवाच्या शिखराकडे वाटचाल करीत आहे. (संदर्भ : मॉर्निंगस्टार फंड कामगिरी) फंडाच्या गुंतवणुकीत व्हॅल्यू आणि ग्रोथ प्रकारच्या समभागांचे प्रमाण ५८ : ४२ असे आहे. फंडाच्या गुंतवणुकीत असलेल्या कंपन्यांच्या संख्येत कपात करून पोर्टफोलिओच्या पुनर्बांधणीची प्रक्रिया सुरू आहे. जेव्हा पोर्टफोलिओची पुनर्रचना होते तेव्हा पहिल्यांदा शेपटाकडील कंपन्यांच्या संख्येत कपात होऊन निधी व्यवस्थापक नव्या कंपन्यांत गुंतवणूक करणे टाळतात. याचा परिणाम वर्षभरात दिसून येतो. मिड-कॅप फंड गटात पोर्टफोलिओचे मंथन अधिक होते.

सचिन रेळेकर यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर म्हणजे २० डिसेंबर २०२० ते ८ एप्रिल २०२१ या कालावधीत फंड पूर्वीपेक्षा अधिक सातत्यपूर्ण कामगिरी करीत असल्याचे दिसते. अलीकडील काळात शीर्षस्थ फंडांतील स्थान गमावलेला हा फंड तीन आणि सहा महिने कालावधीतील कामगिरीच्या तुलनेत शीर्षस्थ स्थानी पुनरागमन करीत असल्याचे दिसत आहे. एक ते तीन वर्षांत हा फंड गुंतवणूकदारांच्या पदरात फंड गटाच्या सरासरीपेक्षा अधिक परताव्याचे माप टाकेल अशी सुचिन्हे दिसत आहेत. आपण दीर्घकालीन गुंतवणूकदार असल्यास आणि पोर्टफोलिओत फ्लेक्सीकॅप फंडाचा समावेश करण्याचा विचार करीत असाल तर गुंतवणूकदार वाचकांनी या फंडाचा आवर्जून विचार करावा.

atul@sampannanivesh.com