आधी होते मी दिवटी शेतकऱ्यांची आवडती
झाले मग मी पणती घराघरातून मिणमिणती!
समई केले मला कुणी देवापुढे नेवोनी
निघून आले बाहेर सोडत काळासा धूर!
काचेचा मग महाल तो कुणी बांधुनी मज देतो
कंदील त्याला जन म्हणती मीच तयातील परी ज्योती
बत्तीचे ते रूप नवे पुढे मिळाले मज बरवे
वरात मज वाचुनी अडे झगझगाट तो कसा पडे!
आता झाले मी बिजली घरे मंदिरे लखलखती
देवा ठाऊक काय पुढे नवा बदल माझ्यात घडे
एकच ठावे काम मला प्रकाश द्यावा सकळाना
कसलेही मज रूप मिळो देह जळो अन जग उजळो!
काही दिवसांपूर्वी निवर्तलेले ज्येष्ठ कवी वि. म. कुलकर्णी यांची दिवटी नावाची ही कविता. मानवाने काळोखात उजेड निर्माण करण्यात कसा बदल केला याचे वर्णन या कवितेत आहे. तंत्रज्ञानात संशोधन करून सर्वश्रेष्ठ नाविन्यपूर्ण कंपनी (Most Innovative Company) म्हणून गौरविली गेलेली आणि सकळांचे जीवन आपल्या संशोधनामुळे सुखावह करणारी आजची कंपनी म्हणून विषयाची सुरुवात या कवितेने. वार्षकि रु. १२,००० कोटींची विक्री असणारी सिमेन्स इंडिया ही सिमेन्स एजी या जर्मन कंपनीची भारतातील उपकंपनी. या कंपनीच्या ७५% समभागांची मालकी मातृकंपनीकडे आहे. कंपनीचे भारतात २१ कारखाने असून चार नवीन कारखान्यांचे काम सुरू आहे. भारतातील व्यवसाय गेली पाच वर्षे २२.८% चक्रवाढ दराने वाढत आहे.  सिमेन्सची सर्व उत्पादने औद्योगिक वापर, ऊर्जा, आरोग्यसेवा व पायाभूत सुविधा या चार गटात विभागलेली आहेत. सिमेन्सला आधुनिक विश्वकर्मा म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. तब्बल ५३,००० पेटंट या कंपनीच्या नावे नोंदलेली आहेत. या कंपनीत २७,६०० संशोधक आपली प्रज्ञा पणाला लावून नवीन संशोधन करीत आहेत.
सिमेन्सचा भारतातील पहिला कारखाना १९५६ साली मुंबईत वरळी इथे सुरू झाला. काळाच्या ओघात हा कारखाना ऐंशीच्या दशकात इथून जुन्या कारखान्याच्या शेजारी ठाण्याजवळ कळवा येथे हलविण्यात आला. भारतामध्ये आशिया खंडात अनेक अभियांत्रिकी गोष्टी पहिल्यांदा तयार करण्याचा मान भारतातील सिमेन्सकडे जातो. मला महाविद्यालयात औद्योगिक व्यवस्थापन हा विषय शिकविणारे माझे शिक्षक व्ही. डी. कानिवदे हे इतरांपेक्षा सिमेन्स एखादी गोष्ट का आणि कशी वेगळ्या पद्धतीने करते हे सांगत असत. नुसती उत्पादनेच नव्हेत पण अनेक उत्पादन पद्धती (Manufacturing Processes) सिमेन्सने जगात पहिल्यांदा भारतात विकसित केल्या आहेत. वीज वहनामध्ये महत्त्वाचा घटक असलेला ५०० MVA सिंगल फेज हाय व्होल्टेज डीसी ट्रान्सफॉर्मर भारतात सिमेन्सने विकसित केला. हे उत्पादन कळव्याच्या कारखान्यात तयार होते.  सिमेन्सच्या विविध उत्पादनांचे वर्गीकरण व त्याचा वापर करणारी उद्योग क्षेत्रे खालीलप्रमाणे
औद्योगिक उत्पादने :
यात वेगवेगळ्या क्षमतेच्या मोटर्स, संपूर्ण कारखान्याचे संगणकीकरण/ स्वयंचलितीकरण, कागद प्रक्रिया, सीमेंट, पोलाद उत्पादन, रोलिंग मिल्स, पाणी प्रक्रिया, विमानतळ नियंत्रण यंत्रणा, बंदरामध्ये जहाजामधून कंटेनर चढ-उतार करणारी यंत्रणा, कंटेनर तपासणारी क्ष किरण यंत्रणा.
ऊर्जा :
ऊर्जानिर्मिती मध्ये गॅस टर्बाईन, औष्णिक टर्बाईन, तसेच कोळसा व राख वाहून नेणारे सरकते पट्टे, वाफ नियंत्रित करणारे वॉल नियंत्रण व रोहित्र, ऊर्जावहन यंत्रणेत वापरण्यात येणारे स्टेपअप ट्रान्सफॉर्मर्स, उच्च वीजेचा दाब नियंत्रण करणारे स्विचगियर, वायू भरलेले इन्सुलेटर्स, क्लोज लूप व ओपन लूप नियंत्रित राखणारी यंत्रणा, स्काडा यंत्रणा, तर वीज वितरणात, विजेचा दाब नियंत्रित राखणारी व यंत्रणेचे संभाव्य नुकसानीपासून संरक्षण करणारी यंत्रणा यांचा समावेश होतो. नुकतीच सिन्नर येथील इंडिया बुल्सच्या वीजनिर्मिती प्रकल्पातील रु. १२५ कोटींचे सर्वात मोठे कंत्राट सिमेन्सला मिळाले आहे.
आरोग्यसेवा :
सिमेन्स या व्यवसायात दोन प्रकारे आहे. एक म्हणजे संपूर्ण इस्पितळासाठी लागणाऱ्या  माहिती-तंत्रज्ञान सल्ला व संगणक प्रणाली ती पुरविते. किंवा फक्त एखादे महत्त्वाच्या विभागाचे संगणकीकरण उदाहरणार्थ, प्रयोगशाळा, पॅथॉलॉजी, क्ष किरण विभाग इत्यादी. दुसरा प्रकार म्हणजे प्रत्यक्ष निदान उपकरणांचे उत्पादन यामध्ये  कमी ऐकू येणाऱ्यांसाठी कानामागे लावायचे श्रवणयंत्र, हृदयाचे ठोके दर्शविणारे व आलेख काढणारी यंत्रणा, शरीरातील निर्माण झालेला दोषाचे निदान करणाऱ्या टॅमोग्राफी यंत्रणा, अल्ट्रासाउंड निदान करणारी यंत्रणा, सोनोग्राफी यंत्रे, आयसीयू मधील अनेक सूटे भाग सिमेन्सचे असतात.      
पायाभूत सुविधा :
शहर कुठलेही असो त्या शहरातली वाहतूक नियंत्रण यंत्रणा सिमेन्सची असते. या गटातील व्यवसायात रेल्वे हा उपगट आहे. भारतात सिमेन्सचा सर्वात मोठा ग्राहक (Single Largest Customer) भारतीय रेल्वे आहे. रेल्वेची तिकिटे आरक्षण यंत्रणा, वाहतूक यंत्रणा हे सिमेन्सच्या ‘रिले’वर चालते. रेल्वेचे प्रवासी डबे, यात मुंबईच्या लोकलचे नवीन डबे तसेच लांबच्या प्रवासात सध्या विशेष गाड्यांसाठी म्हणजे शताब्दी व राजधानीचे कमी धक्के जाणवणारे डबे, फलाटावरची मार्गदर्शन यंत्रणा (Indicators) यात सिमेन्सची उत्पादने वापरली जातात. मुंबई महानगरपालिकेच्या जकात नाक्यावर बसविण्यात येणारी क्ष किरण तपासणी यंत्रणा सिमेन्स तयार करते.
सिमेन्स म्हणजे आंब्याचा टाळ बारश्यापासून तेराव्यापर्यंत सोबतीला असणारा. प्रकल्प कुठलाही असो सिमेंट उत्पादन, ऊर्जानिर्मिती, रेल्वेचा विद्युतीकरण प्रकल्प खर्चाच्या सहज २०-२५% कंत्राटे सिमेन्सकडे असतात. यात उपकरण पुरवठा, परिचालन, प्रशिक्षण या गोष्टींचा समावेश असतो. सिमेन्सच्या उत्पादनांचे आणि आपले नाते किती घट्ट आहे, हे समजण्यासाठी एक उदाहरण देतो. प्रसूतीपूर्व गर्भाशयातील गर्भाची चाचणी करणारी सोनोग्राफी यंत्रे सिमेन्सची असतात तर मृत्यूनंतर विद्युत दाहिनीत तापमान कायम राखणारी यंत्रणाही सिमेन्सची असते. या जगात येण्यापूर्वी पासून आणि या जगातून जातानाही सिमेन्स आपली साथ करीत असते. मुंबई महानगरपालिकेची जन्म मृत्यूचा दाखला देणारी यंत्रणा ज्या ‘सॅप’ प्रणालीवर चालते त्याचा परवानाधारक  सिमेन्स आहे. म्हणजे हा दाखला देण्याकरता महानगरपालिका आपल्याला जे शुल्क आकारते त्याचा काही हिस्सा सिमेन्सला त्यांची प्रणाली वापरल्याबद्दल दिला जातो.
सिमेन्सच्या शेअरमध्ये गुंतवणुकीसाठी इतकी सबळ कारणे पुरेशी ठरावीत. ३० सप्टेंबर २०१२ रोजी संपलेल्या तिमाहीचे निकाल २३ नोव्हेंबर २०१२ला जाहीर होणार आहेत. कदाचित सध्या औद्योगिक क्षेत्रातील मंदीमुळे फारसे प्रकल्प सुरु असलेले दिसत नाही. त्यामुळे फारशी नवीन कंत्राटे नोंदलेली नसतील. कमी नोंदलेल्या मागण्यांमुळे नकारात्मक संकेत जाऊन कदाचित किंमत घसरू शकते. तेव्हा लगेचच शेअर घेण्याची घाई नको निकालांची पडताळणी करून निर्णय घेणे योग्य ठरेल. शुक्रवारच्या बंद भावावर ‘सेन्सेक्स’चे (किंमत/उत्पन्न गुणोत्तर) पी/ई २५.०६ पट आहे. सिमेन्सचे तिमाही निकाल जाहीर झाल्यानंतर मागील १२ महिन्यांचा (प्रति समभाग कमाई) ईपीएस रु. २८ असेल तेव्हा कंपनीचे पी/ई गुणोत्तर २२ पट असे येते. डिसेंबर २०१२ ला संपणाऱ्या १२ महिन्यांचा ईपीएस रु. ३३ वर असेल तर याच पी/ई गुणोत्तरावर भाव रु. ७५० वर जायला हवा. शुक्रवारचा ६६९.९५ रु. बंद भाव लक्षात घेता हा शेअर स्वस्त नाही. परंतु रु. ६३०-६३५ दरम्यान घेण्याचा विचार करावयास हवा. कारण ‘It’s far better to buy a wonderful company at a fair price than a fair company at a wonderful price’ असे वॉरेन    बफे यांनीच एके ठिकाणी लिहून ठेवलंय.    
सिमेन्स
दर्शनी मूल्य     : रु. २/-
मागील बंद भाव     : रु. ६६९.९५ (१६ नोव्हेंबर)
वर्षांतील उच्चांक :  रु. ८४०
वर्षांतील नीचांक    :  रु. ६२७

Kolhapur Police arrest gang selling fake notes
बनावट नोटांची छपाई, विक्री करणारी टोळी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात; म्होरक्याचे नेत्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा
congress candidate rashmi barve caste certificate cancelled in just eight days after complaint lodge
राज्य शासनाच्या ‘गतिमान कारभारा’चे दर्शन! तक्रारीनंतर अवघ्या आठ दिवसांत रश्मी बर्वे यांची जात वैधता रद्द
Crowd of devotees on the occasion of Tukaram Beej sohala in Dehu
पिंपरी : देहूमध्ये तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त भाविकांची अलोट गर्दी
fraud of 44 lakh with investors in Dombivli by giving lure of increased interest
वाढीव व्याजाच्या आमिषाने डोंबिवलीतील गुंतवणूकदारांची ४४ लाखाची फसवणूक