28 February 2020

News Flash

समृद्धीच्या मार्गावरील पांथस्थ

समभाग गुंतवणुकीसारख्या निसरडय़ा वाटेवरून चालताना पाय घसरतोही म्हणून प्रवास सोडून द्यायचा नसतो.

|| वसंत कुलकर्णी

समभाग गुंतवणुकीसारख्या निसरडय़ा वाटेवरून चालताना पाय घसरतोही म्हणून प्रवास सोडून द्यायचा नसतो. गुंतवणुकीत ऊन-पावसाच्या खेळाला नेहमीच सामोरे जावे लागते. मात्र आपल्या निवडीवर श्रद्धा ठेवून  समभागाच्या नजीकच्या घसरणीने गोंधळून न जाता सबुरी ठेवणे हेच यशाचे गमक आहे.

इतिहास घडत असताना इतिहास घडविणाऱ्यांना आपण इतिहास घडवत आहोत याची पुसटशी कल्पनासुद्धा नसते. आयआयएम बंगळूरुमधून व्यवस्थापनाचे शिक्षण घेऊन हा तरुण एसबीआय कॅप्समध्ये दाखल झाला. याची नेमणूक एसबीआय कॅप्सचा भाग असलेल्या एसबीआय म्युच्युअल फंडात समभाग संशोधक म्हणून झाली. समभाग संशोधन आणि निधी व्यवस्थापनाचा एसबीआय म्युच्युअल फंडात दोन वर्षेअनुभव घेतल्यानंतर १९९३ मध्ये हा तरुण आपल्या अन्य तीन सहकाऱ्यांसोबत नव्याने सुरू होणाऱ्या एका म्युच्युअल फंडात दाखल झाला. आपली वाट चोखाळण्यासाठी बाहेर पडलेल्या या चौघांपकी एकालाही आपण इतिहास घडविणार आहोत याची कल्पना नसेल. या चौघांपकी एक असलेल्या प्रशांत जैन यांच्या नावावर मागील २५ वर्षेएकच फंडाचा निधी व्यवस्थापक असल्याची नोंद आहे. जगातील म्युच्युअल फंडाच्या इतिहासात इतक्या प्रदीर्घ कालावधीसाठी एकाच फंडाचे निधी व्यवस्थापन केल्याची दुसरी नोंद नाही.

जानेवारी १९९४ मध्ये ट्वेंटीएथ सेंच्युरी या त्या काळातील आघाडीच्या गरबँकिंग वित्तीय कंपनीने ट्वेंटीएथ सेंच्युरी म्युच्युअल फंड सुरू केला होता. या फंड घराण्याने सेंच्युरीयन प्रुडन्स फंड या बॅलन्स्ड फंडाच्या समभाग गुंतवणुकीची धुरा प्रशांत जैन यांच्याकडे दिली. १९९९ मध्ये ट्वेंटीएथ सेंच्युरी म्युच्युअल फंड हा झुरिच फिनान्शियल सव्‍‌र्हिसेसने विकत घेतला. झुरिच फिनान्शियल सव्‍‌र्हिसेसच्या सर्व योजनांना २००३ मध्ये एचडीएफसी म्युच्युअल फंडाने विकत घेतले. मागील २५ वर्षांत फंडाच्या नावात, तीन वेळा प्रवर्तक बदल्याने, तर एकदा ‘सेबी’च्या प्रमाणीकरणामुळे असे चार वेळा बदल झाले. सध्या एचडीएफसी बॅलन्स्ड अ‍ॅडव्हांटेज नावाने ओळखल्या जाणाऱ्या या फंडाचे १९९४ पासून आजपर्यंत मागील २५ वर्षेप्रशांत जैन हेच निधी व्यवस्थापक आहेत.

संगीतात ज्याप्रमाणे घराणी असतात त्याचप्रमाणे या २५ वर्षांत गुंतवणूक क्षेत्रात प्रशांत जैन हे एक घराणे झाले आहे. जगभरात जरी ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’ ही गुंतवणूक शैली परिचित असली तरी, भारतात या शैलीची मुहूर्तमेढ प्रशांत जैन यांनी रोवली. न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडण्याआधी गुरुत्वाकर्षण अस्तित्वात होते. द्रष्टय़ा न्यूटनला गुरुत्वाकर्षण जाणवले, म्हणून न्यूटन गुरुत्वाकर्षणाचा उद्गाता ठरला. ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’ या गुंतवणूक शैलीचा उपयोग भारतात प्रशांत जैन यांनी मोठय़ा प्रमाणावर केला. प्रशांत जैन यांनी निधी व्यवस्थापनास सुरुवात केली त्या काळात दैनंदिन ‘एनएव्ही’ प्रकार नव्हता. स्पर्धक कंपन्यांच्या फंडाबरोबर तुलना होत नव्हती. आज मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार असे दोन शेअर बाजार, ४२ फंड घराणी प्रत्येकाच्या शेकडो योजना प्रत्येक योजनेचे दोन प्लान आणि दोन विकल्प असल्याने प्रत्येक योजनेच्या चार एनएव्ही असा पसारा वाढला आहे. प्रत्येक योजनेचा मानदंड निश्चित आहे. फंडाची तुलना स्पर्धक फंडासोबत होते तशी त्याच्या मानदंडाशीही होते. मानदंडाच्या तुलनेत एखाद्या फंडाची कामगिरी किती सरस आहे हे मोजले जाते. फंड परिभाषेत त्याला ‘अल्फा’ असे म्हणतात. प्रशांत जैन निधी व्यवस्थापक असलेल्या एचडीएफसी बॅलन्स्ड अ‍ॅडव्हांटेज फंडाने मागील २० वर्षांत मानदंडापेक्षा ८.४२ टक्के आणि फंडाच्या सुरुवातीपासून मानदंडापेक्षा ९.१८ टक्के अधिक परतावा (अल्फा) दिला आहे.

व्यापारचक्राच्या बदलत्या दिशेचा अंदाज घेत प्रशांत जैन आपल्या गुंतवणुकीत योग्य ते बदल करत असतात. एका व्यापारचक्राचा कालावधी सहा वर्षेधरला तर प्रशांत जैन यांनी चार व्यापारचक्रे अनुभवली आहेत. प्रशांत जैन यांनी १९९९ मध्ये इन्फोसिससारख्या तंत्रज्ञानाशी संबंधित समभागांचा समावेश केला. २००७ मध्ये भांडवली वस्तू, २०१० दरम्यान ग्राहकोपयोगी वस्तू आणि पुन्हा २०१४ दरम्यान स्टेट बँक, लार्सन अँड टुब्रो यांसारख्या समभागांचा समावेश केला. अनेक विश्लेषक प्रशांत जैन यांनी एशियन पेंट्स, कोटक बँक, आयशर मोटर्स, इंडसइंड बँक यांसारख्या बहुप्रसवा समभागांचा गुंतवणुकीत समावेश न केल्याचे खेदाने नमूद करतात. पूर्वीच्या आणि सध्याच्या क्रिकेटमध्ये बदल झाला आहे. प्रशांत जैन यांची शैली हे जुन्या काळातील फलंदाजांसारखी आहे. तुलना करायची झाल्यास प्रशांत जैन यांचे उद्योग क्षेत्रातील विचलन हे इंग्लिश फलंदाज सर लेन हटन किंवा आपल्या गुंडाप्पा विश्वनाथ यांच्या ‘स्वेअर कट’सारखी क्षेत्ररक्षकांना चकवा देत मारलेल्या चौकारासारखे असते.

आज माहितीच्या विस्फोटामुळे, पूर्वीच्या तुलनेत आता परताव्याचा अंदाज बांधणे कठीण आहे. याचे कारण म्हणजे भारताची अर्थव्यवस्था खुली होऊन २७ वर्षेझाली आहेत. अर्थव्यवस्था आता प्रगल्भ झाली असून वैश्विक घटनांवर, बाजार लगेच आपली प्रतिक्रिया देतात. माहितीचा विस्फोट अन्य क्षेत्रांप्रमाणे गुंतवणुकीतही झाला असून नवीन गुंतवणूकदार आपल्या तांत्रिक आणि व्यावसायिक आधारसामग्रीच्या बळावर रोज नित्य नवीन तंत्र अवलंबत आहेत. बाजारातील संस्थात्मक गुंतवणूकदारांची मालकी वाढतच चालली असून प्रत्येकाच्या समोर आपापल्या पूर्वनिश्चित मानदंडापेक्षा सरस कामगिरी करण्याचे अधिक आव्हान आहे. सामान्य गुंतवणूकदारांचा भांडवली बाजारपेठेत वावर वाढत चालला असून मध्यम आणि दीर्घ काळापर्यंत निश्चित गुंतवणुकीपेक्षा समभाग गुंतवणुकीतून अधिक परताव्याची अपेक्षा वाढत आहे. ट्वेंटीएथ सेंच्युरी बॅलन्स्ड फंड ते एचडीएफसी बॅलन्स्ड अ‍ॅडव्हांटेज फंडापर्यंतचा प्रवास हा एक नवउद्यमी व्यवसायाच्या सुरुवातीपासून ते ४० हजार कोटींच्या एका यशस्वी फंडापर्यंत वाटचालीचा आहे. हा प्रवास करायला मिळाल्याबद्दल प्रशांत जैन भाग्यविधात्याला धन्यवाद देतात. झुरिच फिनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे एचडीएफसी म्युच्युअल फंडाने केलेले अधिग्रहण हा व्यावसायिक कारकीर्दीतील महत्त्वाचा वळणिबदू ते मानतात. बाजार नेहमीच महागाईपेक्षा अधिक परतावा देतो. भारतात व्याजदर आणि महागाई कमी होत असल्याने बाजारातून परतावा मिळविणे कठीण असताना प्रशांत जैन यांची कामगिरी फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर फलंदाजाने दमदार फलंदाजी करण्यासारखे आहे. फंडाच्या गुंतवणुकीत समावेश केलेला समभाग लगेचच हवा तसा परिणाम देत नसतो. आपल्या निवडीवर श्रद्धा ठेवून समभागाच्या नजीकच्या घसरणीने गोंधळून न जाता सबुरी ठेवणे हे त्यांच्या यशाचे गमक आहे.

सहस्रक बदलत असताना तंत्रज्ञान, मनोरंजन आणि दळणवळणाच्या व्यवसायात असलेल्या कंपन्यांचा बोलबाला वाढला होता. प्रशांत जैन यांच्या गुंतवणूक निकषात न बसणाऱ्या या समभागांचा समावेश त्यांनी गुंतवणुकीत केला नव्हता. परिणामी त्यांच्या फंडांची कामगिरी स्पर्धक फंडांच्या तुलनेत खालावत होती. आपल्या गुंतवणूक निकषांशी प्रामाणिक राहिलेल्या त्यांना गुंतवणूकदारांच्या टीकेला तोंड द्यावे लागले. फंडात निधीचा ओघ आटला. आपल्या निकषांचे समर्थन करत राहिलेल्या प्रशांत जैन यांना या काळात कठीण परीक्षेला सामोरे जावे लागले. पुढे लवकरच या चकचकीत कंपन्यांची झळाळी सोन्याची नसून पितळेची असल्याचे आढळून आले. तंत्रज्ञान, मनोरंजन आणि दळणवळण व्यवसायात गुंतवणूक केलेल्यांचा भ्रमाचा भोपळा फुटला. गुंतवणुकीत ऊन-पावसाच्या खेळाला सामोरे जावे लागते. वाटय़ाला आलेल्या कौतुकाला आणि टीकेला ते सारखेच सामोरे जातात. समभाग गुंतवणुकीसारख्या निसरडय़ा वाटेवरून चालताना पाय घसरतोही. म्हणून प्रवास सोडून द्यायचा नसतो. निवडलेला फंड अपेक्षित काळात अपेक्षित परतावा देईलच असे नाही. फंडाची साथ न सोडता आपल्या बाजूला दान पडण्याची वाट पाहायला हवी. प्रशांत जैन यांच्याकडून हा गुण गुंतवणूकदारांनी  शिकायला हवा.

shreeyachebaba@gmail.com

First Published on July 7, 2019 6:09 pm

Web Title: sip investment mutual fund mpg 94
Next Stories
1 वीकेंड होम गरज, गुंतवणूक की खर्च?
2 पायाभूत सुविधांवर भर ‘लाभ’कारक!
3 वाटचाल अर्थसंकल्पानंतर!
Just Now!
X