आशीष ठाकूर
‘निफ्टी’ची अतिजलद चाल ही अगोदर नमूद केल्याप्रमाणे १७,३०० ते १७,५०० च्या दिशेने होत असल्याने आता सर्व गुंतवणूकदारांनी सावध होण्याची गरज आहे. समभागांची नफारूपी विक्री करणे नितांत गरजेचे बनले आहे. गुंतवणूकदारांकडून नफ्यातील समभागांची विक्री सहजासहजी होत नाही. हा विषय समजून घेण्यासाठी महात्मा जोतिबा फुले यांच्या क्रांतिकारी विचारांचा आधार घेऊया.

‘विद्येविना मती गेली, मतिविना नीती गेली। नीतीविना गती गेली, गतिविना वित्त गेले। वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले!’ हे क्रांतिकारी विचार आजच्या भांडवली बाजारालादेखील तंतोतंत लागू पडतात.

भांडवली बाजारातील सगळे आर्थिक अनर्थ हे केवळ आणि केवळ तेजीत समभाग विकले नाहीत म्हणून घडतात. कसे ते पाहा. भांडवली बाजार हा ना ‘मूलभूत विश्लेषणावर चालतो, ना तांत्रिक’! तर बाजाराची वाटचाल ही भावनेवर असते. भावनेची दोन प्रमुख अंग असतात. लालसा आणि भीती.

प्रत्येकाला सुख, समाधान मिळालेच पाहिजे. पण सुखा-समाधानाची लक्ष्मणरेषा ओलांडली की हव्यास, लालसा जन्माला येते व प्रत्येक तेजी हे या ‘लालसेचे’ मूर्तिमंत उदाहरण असते.

आता चालू असलेली तेजीच्या माध्यमातून जी काही नवनवीन शिखर गाठली जातात ती तांत्रिक विश्लेषणातील विविध प्रमेयांमुळेच. आता या प्रमेयांचीदेखील वरची लक्ष्य सेन्सेक्सवर ५८,००० ते ५९,५०० आणि निफ्टीवर १७,३०० ते १७,७०० साध्य होताना दिसतील. त्यामुळे आता सावध होण्याची गरज आहे. या ऐतिहासिक उच्चांकावरून निर्देशांक सेन्सेक्स ५३,५०० ते ५१,८०० आणि निफ्टी निर्देशांक १६,००० ते १५,५०० पर्यंत घसरण्याची शक्यता आहे. म्हणूनच सध्याच्या ऐतिहासिक उच्चांकाला अल्पमुदतीची गुंतवणूक धारणा असलेल्या गुंतवणूकदारांनी, नफ्यातील अर्धे समभाग विकायला हवेत.

नफ्यासाठी समभाग विकण्याच्या दृष्टीने, त्यांची मानसिकता तयार करण्यासाठी खालील गोष्टी उपयोगी पडतील..

१.आपल्याकडे असलेल्या चांगल्या प्रतीच्या समभागांची जी आपण विक्री करणार आहोत ती तात्पुरत्या स्वरूपाची आहे, किंबहुना ही नफारूपी विक्री आहे. गुणवत्तेचे मापदंड जोपासणाऱ्या कंपन्या या कधीच वाईट नसतात, असते ती वाईट वेळ असते. त्यामुळे आपल्याकडे असलेल्या कंपन्यांचे अर्धे समभाग तेजीत विकले की मंदीत तेच समभाग पुन्हा स्वस्तात खरेदी करता येऊ शकतात. हे सांगण्यामागे मुख्य उद्देश हा गुंतवणूक धारणा व मर्यादित भांडवलाचा आहे. जोपर्यंत मध्यमवर्गीय गुंतवणूकदार समभाग विकत नाहीत तोपर्यंत फेरखरेदीसाठी भांडवल उपलब्ध होणे अशक्य, मग अर्धे समभाग नफ्यात विकले तर काय चूक? एकदा का तेजी येऊन गेली की, पुन्हा तेजी कधी येणार, ती पुन्हा आपल्याच समभागात येईल का? याची खात्री नाही व त्यात मंदीच्या दाहकतेत समभागाचे भाव अध्र्यावर आले की आर्थिक फटका तर बसतोच, पण त्याहून कैक पटींनी अधिक असा मानसिक धक्का बसतो.

२. अल्पमुदतीची गुंतवणूक धारणा असलेल्या गुंतवणूकदारांकडून नफ्यातील समभागांमध्ये नफावसुलीसाठी विक्री झटकन होत नाही. किंबहुना नफ्यातील समभाग हातातून सुटत नाहीत. अशासमयी हात कंप पावतो याचे एकमेव कारण म्हणजे, नफ्यातील समभाग विकले व नंतर भाव आणखी वाढले तर? येथे एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की, अल्पमुदतीची गुंतवणूक धारणा असलेल्या गुंतवणूकदारांना नेहमीच नफ्यातील – तोटय़ाला (नोशनल लॉस) सामोरे जावे लागते. उदाहरणार्थ, समभाग १०० रुपयांना खरेदी करून १५० ला विकल्यानंतर त्याच समभागाची किंमत २०० रुपये होते. पण येथे निदान ५० टक्के परतावा तरी मिळतोय! आज आपण जो समभाग भविष्यकालीन उदयोन्मुख समभाग म्हणून विचार करतो, पण भविष्यातील व्यापारउदीम चक्रात तसे न घडल्यास? फार दूरची गोष्ट नाही अवघ्या तीन वर्षांपूर्वीच्या घटना आठवून पाहा. २०१८ सालच्या तेजीत भविष्यकालीन उदयोन्मुख कंपन्यांची यादी सांगा, तर त्यात हमखास डीएचएफएल ६८० रुपये, येस बँक ४०० रुपये, वक्रांगी सॉफ्टवेअर ५०० रुपये, पी.सी.ज्वेलर्स ६०० रुपये अशी नावे त्या वेळेला, त्या किमतीला सुचविली जायची. अवघ्या तीन वर्षांच्या आत आताच्या घडीला या सर्व समभागांचे भाव १० ते ५० रुपयांच्या आसपास आहेत. तेव्हा या व्यवस्थेत समभाग १०० रुपयाला घेऊन १५० रुपयाला विकला व त्यानंतर समभागाचा भाव २०० रुपये झाला, या न दिसू शकलेल्या नफ्यातील तोटय़ाचे दु:ख जास्त की मुद्दल गमवली जाण्याच्या मनस्तापापेक्षा चांगलेच, याचा विचार होण्याची आज गरज आहे.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’, इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय

Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…

ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”

byju s shuts 30 out of 292 tuition centres for cost cutting
बायजूच्या ३० शिकवणी केंद्रांना टाळे; खर्चात कपात करण्यासाठी कंपनीने उचलले पाऊल