आशीष ठाकूर

सेन्सेक्स ४०,००० आणि निफ्टी ११,८०० कडे झेपावत होते आणि बाजारात तेजी कायम राहून सेन्सेक्स ४४,००० आणि निफ्टी निर्देशांक १२,६००च्या ऐतिहासिक उच्चांकाला गवसणी घालेल, अशा आशा बळावल्या. तेजीचे ‘दिस येतील’ असे वाटत असतानाच, ३१ ऑगस्टपासून बाजारात घसरण सुरूझाल्याने तेजीचे ‘दिस जातील’ काय, असे चित्र पालटले. मंदीला अटकाव बसून, बाजारात सुधारणा सुरू झाली. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव:

सेन्सेक्स: ३८,८५४.५५

निफ्टी : ११,४६४.४५

तांत्रिक आलेखाच्या रचनेवरून, निर्देशांकांना म्हणजे सेन्सेक्सवर ४०,००० आणि निफ्टीवर ११,८०० चा भरभक्कम अडथळा असेल, याचे सूतोवाच केले होते. या स्तरावरून घसरण अपेक्षित होती. त्यासाठी भारत-चीन सीमा प्रश्न, करोना रुग्णांची वाढणारी संख्या, उदासीन अर्थव्यवस्था, बाजाराचे चढे मूल्यांकन (पी/ई रेशो) अशा विविध कारणांतून बाजारात घसरण आली. ही ज्ञात निराशाजनक कारणे झाली. त्यामुळे येणाऱ्या दिवसात, सेन्सेक्सने ३८,२५० ते ३९,२५० आणि निफ्टीने ११,२०० ते ११,६०० मध्ये जास्त काळ व्यथित केल्यास / पायाभरणी केल्यास निर्देशांकाची तेजीची वाटचाल सुकर होऊन डिसेंबरपर्यंत निर्देशांक सेन्सेक्सवर ४१,६५० ते ४४,००० आणि निफ्टीवर १२,२०० ते १२,६०० चा स्तर दृष्टीपथात येईल. याला तेजीचे दिस येतील असे म्हणावयास हरकत नाही. हे तेजीचे दिस किती टिकतील, हा पुढचा प्रश्न. भारत-चीन सीमा प्रश्नामुळे निर्माण होणारा युध्दज्वर अथवा अमेरिकी भांडवली बाजारातील घातक उतार, या आताच्या घडीला अज्ञात असलेल्या कारणांनी आपल्या भांडवली बाजारात घातक उतार आले तरी, या पडझडीत सेन्सेक्सवर ३६,६५० ते ३५,७०० आणि निफ्टीवर १०,८०० ते १०,५५० चा स्तर राखण्यात निर्देशांक यशस्वी ठरल्यास हे वाईट दिस, भोग सरून सुखाचे चांगले दिस आणतील, अशी आशा बाळगूया.

कंपन्यांचे जाहीर झालेले वित्तीय निकाल आणि त्याचे विश्लेषण..

> टाटा पॉवर लिमिटेड :

या स्तंभातील १० ऑगस्टच्या लेखात टाटा पॉवर लिमिटेडचे निकालपूर्व विश्लेषण केले होते. त्यानुसार, तिमाही निकालाची नियोजित तारीख १२ ऑगस्ट होती. ७ ऑगस्टचा बंद भाव ४९ रुपये होता. निकालोत्तर महत्वाचा केंद्रबिंदू स्तर ४८ रुपये होता. निकाल जाहीर झाल्यानंतर,समभागाचा बाजारभाव महत्वाच्या केंद्रबिंदू स्तरावर टिकला,तर तिमाही निकाल चांगला अन्यथा वाईट, असे त्या विश्लेषणात नमूद केले होते. जर निकाल उत्कृष्ट असेल तर ४८ रुपयांचा स्तर राखत ५८ रुपयांचे वरचे लक्ष्य लेखात सूचित केले होते. टाटा पॉवरने प्रत्यक्ष निकालापश्चात ४८ रुपयांचा स्तर राखत २१ ऑगस्टला बरोबर ६३ रुपयांचा उच्चांक नोंदवला. ज्या गुंतवणूकदारांकडे टाटा पॉवर दीर्घ मुदतीच्या गुंतवणूक धारणेअंतर्गत आहेत त्यांनी ते राखून ठेवले, तर अत्यल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांनी अल्पावधीत १८ टक्कय़ांचा घसघशीत परतावा मिळविला. गेल्या सप्ताहातील घातक उतारातदेखील टाटा पॉवरने ४८ रुपयांचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर राखत, सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारचा बंद भाव हा ५६ रुपये होता.

> ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेड :

१० ऑगस्टच्या लेखातील दुसरा समभाग होता ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेड. समभागाचा ७ ऑगस्टचा बंद भाव त्यासमयी ६३७ रुपये होता, निकालोत्तर महत्वाचा केंद्रबिंदू स्तर ६०० रुपये होता. लेखात नमूद केल्याप्रमाणे, जर वित्तीय निकाल उत्कृष्ट असेल तर ६०० रुपयांचा स्तर राखत वरचे लक्ष्य ६९० रुपये होते. ग्रासिम इंडस्ट्रीजने निकालापश्चात ६०० रुपयांचा स्तर राखत,३ सप्टेंबरला ७२९ रुपयांचा उच्चांक मारून वरचे लक्ष्य साध्य केले. अत्यल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांनी अल्पावधीत आठ टक्यांचा परतावा मिळविला. आजही ग्रासिम इंडस्ट्रीज ६०० रुपयांचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर तर राखून आहे. पण सरलेल्या सप्ताहातील, शुक्रवारचा बंद भाव हा लेखात नमूद केलेल्या ७२० रुपयांच्या वरच्या लक्ष्यावरच आहे.

>   गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड :

१० ऑगस्टच्या लेखातील तिसरा समभाग होता गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड.समभागाचा ७ ऑगस्टचा बंद भाव त्यासमयी ३६६ रुपये होता, निकालोत्तर महत्वाचा केंद्रबिंदू स्तर ३५० रुपये होता. लेखात नमूद केल्याप्रमाणे, जर वित्तीय निकाल उत्कृष्ट असेल तर ३५० रुपयांचा स्तर राखत वरचे लक्ष्य ४०० रुपये होत. हे प्रत्यक्ष निकाला अगोदरचे विेषण होते. निकालापश्चत गोदरेज इंडस्ट्रीजनी ३५० रुपयांचा स्तर राखत,२ सप्टेंबरला ४७९ रुपयांचा उच्चांक मारून वरच लक्ष्य साध्य केल.अत्यल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांनी अल्पावधीत नउ  टक्यांचा परतावा मिळविला.आजही गोदरेज इंडस्ट्रीजनी ३५०  रुपयांचा महत्वाचा केंद्रबिंदू स्तर राखत सरलेल्या सप्ताहातील,शुक्रावरचा साप्ताहिक बंद भाव हा बरोबर लेखात नमूद केलेल्या ४०७ रुपयांच्या वरच्या लक्ष्यावरच आहे.

ashishthakur1966@gmail.com

लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.