अजय वाळिंबे
शेअर बाजारातील गुंतवणूक धोक्याची असते म्हणजे नक्की काय हे एव्हाना नवीन गुंतवणूकदारांना कळले असेल. ‘जितका धोका जास्त तितका नफा अधिक’ असंही म्हंटलं जातं. पण तोटा सुरू झाल्यावर नक्की थांबायचं कधी याचा अंदाज येत नाही आणि मग केलेल्या खरेदीला ‘ॲव्हरेज’ करायच्या नादात तोटा अजून वाढत जातो. सध्याची शेअर बाजाराची स्थिती नेमकी अशीच आहे.

‘माझा पोर्टफोलियो’ सदरात सुचविलेले शेअर्स किंवा इतरही अनेक कंपन्यांचे शेअर्स हे फंडामेंटली कितीही चांगले असले तरीही मंदीच्या काळात सुक्याबरोबर ओलंही जळतं. याचाच प्रत्यय अशा वेळी अनेकांना आला असेल. सर्वाधिक फटका बसतो तो मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांना. तेजीत भरमसाट वाढ झालेले आणि छोटय़ा गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केलेले हे शेअर्स म्हणूनच सर्वाधिक कोसळताना दिसतात. त्यामुळे अशा काळात लार्ज कॅप शेअर्स आणि ‘व्हॅल्यू बाईंग’ अर्थात मूल्यात्मक खरेदी सर्वात महत्त्वाची ठरते. नवीन वर्ष २०२२ ची सुरुवातच ओमायक्रॉन या करोनाच्या नव्या प्रकारच्या विषाणूच्या साथीच्या तिसऱ्या लाटेने झाली. त्यानंतर जागतिक बाजारपेठेत खनिज तेलाच्या वाढत्या किमती, रशिया-युक्रेन युद्ध, परदेशी गुंतवणूकदारांनी सातत्याने केलेली विक्री, अमेरिकेची मध्यवर्ती बँक – फेडरल रिझव्‍‌र्ह आणि भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेने केलेली व्याजदरातील वाढ आणि अर्थात त्यामुळे अटळ असणारी चलनवाढ असा नवनव्या आव्हानांचा क्रम सुरू राहिला. या सर्वाचा परिणाम होऊन शेअर बाजारच्या तेजीला खीळ बसून निर्देशांक जवळपास २० टक्क्यांनी खाली आला आहे. अजूनही शेअर बाजार सावरण्याची लक्षणे नाहीत. जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता, ढासळता रुपया आणि चलनवाढीचा धोका या कारणामुळे शेअर बाजारात लगेच तेजी येण्याची शक्यता धूसर वाटते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘माझा पोर्टफोलियो’अंतर्गत सुचविलेले शेअर्स हे नेहमीच मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी असल्याने त्यांचे लगेचच मूल्यमापन करणे योग्य ठरणार नाही. मात्र वाचक गुंतवणूकदारांनी कायम जागरूकता दाखवून गुंतवणूक केलेल्या कंपन्यांचे आर्थिक निकाल तसेच शेअर बाजारातील घडामोडींवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. अनिश्चित काळात उत्तम कंपन्यांत केलेली गुंतवणूक टप्प्या-टप्प्याने केली तर जास्त फायद्याची ठरते, ही सुज्ञता आणि अनुभव आता वाचकांकडे आहेच.