एलआयसी हौसिंग फायनान्स या कंपनीचा शेअर साधारण तीन वर्षांपूर्वी याच स्तंभातून २३८ रुपयांना सुचविला होता. ज्या वाचकांनी हा शेअर खरेदी केला असेल त्यांनी लाभांशाखेरीज दामदुप्पट परतावा मिळू शकेल. मात्र आज तीन वर्षांनंतरदेखील ज्या गुंतवणूकदारांनी हा शेअर खरेदी केला नव्हता त्यांना सद्य भावात खरेदी करायला काहीच हरकत नाही. निश्चलनीकरणानंतर गृह वित्त कंपन्यांच्या शेअर्सच्या भावात बऱ्यापैकी घसरण झाली आहे. एलआयसी हौसिंगदेखील त्याला अपवाद नाही.

arth01भारतीय आयुर्विमा मंडळ – एलआयसीने स्थापन केलेल्या या कंपनीत प्रवर्तकांचा ४०.३१% हिस्सा असून सध्या भारतातील ही दुसरी मोठी गृह वित्त कंपनी आहे. कंपनीची सात क्षेत्रीय कार्यालये असून. २४५ विपणन कार्यालये आणि १३,००० हून अधिक एजंट आहेत. सौदी अरब तसेच आखाती देशातही कंपनीची कार्यालये आहेत. गेली अनेक वर्ष सातत्याने उत्तम कामगिरी करणाऱ्या या कंपनीने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर बाजारपेठेतील साधारण १०% हिस्सा काबीज केला आहे. कंपनीच्या कर्ज वितरणातील मुख्य हिस्सा म्हणजे जवळपास ९२.९% हिस्सा रिटेल असून ८८% कर्जदार नोकरदार मंडळी आहेत. बहुधा त्यामुळेच की काय कंपनीच्या अनुत्पादित कर्जाचे प्रमाण इतर कंपन्यांच्या तुलनेत अत्यल्प आहे. निश्चलनीकरण आणि चलन तुटवडय़ामुळे स्थावर मालमत्ता क्षेत्रावर विपरीत परिणाम होईल अशी भीती वाटत असली तरीही हा परिणाम दीर्घकाळ राहणार नाही. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी राबविल्यावर केवळ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कंपनीने नवीन योजना आणली आहे. तसेच कंपनीचा बहुतांश ग्राहकवर्ग हा नोकरदार असल्याने नोटाबंदीचे विपरीत परिणाम कंपनीच्या कामकाजावर होणार नाहीत अशी आशा आहे. नुकतेच कमी झालेले व्याजदर कंपनीची नफ्याची मार्जिन कमी करतील. मात्र तरीही आगामी काळात गृहनिर्माण क्षेत्राला परिणामी गृह वित्त कंपन्यांना चांगले दिवस येतील अशी अपेक्षा आहे. सध्या ५०० रुपयांच्या आसपास उपलब्ध असलेला हा शेअर दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य वाटतो.

समग्र पी/ई गुणोत्तर काय?

या स्तंभात वाचकांच्या माहितीसाठी शेअर निवडण्याचे महत्त्वाचे निकष दिले जातात. हे निकष अभ्यासून वाचक गुंतवणूकदार गुंतवणुकीचा निर्णय घेतात. आवश्यक ते बहुतांशी महत्त्वाचे निकष आणि गुणोत्तरे दिलेली असली तरीही यंदा अजून एक निकष ‘उद्योग क्षेत्राचा समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर’ (Composite P/E Ratio) समाविष्ट करीत आहे. समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर म्हणजे एकाच क्षेत्रातील सर्व कंपन्यांच्या किंमत उत्पन्न गुणोत्तराची सरासरी. या सरासरीच्या तुलनेत निवडलेल्या कंपनीचे किंमत उत्पन्न गुणोत्तर किती आहे ते तपासून निवडलेला शेअर त्याच क्षेत्रातील इतर कंपन्यांच्या तुलनेत महाग आहे की स्वस्त ते यामुळे पडताळता येते. जसे आजचा एलआयसी हौसिंग फायनान्सचा शेअर हा त्या क्षेत्रातील इतर कंपन्यांच्या समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तराच्या तुलनेत स्वस्त आहे.

सूचना: प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.