गेल्या दहा वर्षांत मुंबईकरांना, मुख्यत्वे उपनगरातील मुंबईकरांना दिलासादायक वाटणारी महत्त्वाची बाब म्हणजे पाइपद्वारे घरापर्यंत येणारा गॅस. अतिशय सुरक्षित, सोपी आणि सुलभ असलेली ही प्रणाली महानगर गॅसने मुंबईतील उपनगरांमधील हजारो घरांत पुरवली आहे.

arth2-chart१९९५ मध्ये सरकारी कंपनी गेल आणि ब्रिटिश कंपनी रॉयल डच शेल पीएलसी यांचा हा संयुक्त प्रकल्प सुरू झाला. कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलात दोन्ही प्रवर्तकांचे प्रत्येकी ३२.५ टक्के भागभांडवल आहे. मुंबई, नवी मुंबई, मीरा भाईंदर आणि ठाणे इ. उपनगरांत सुमारे ९.२ लाख घरांत महानगर गॅसचे जाळे पसरले आहे. तसेच नव्याने निर्माण होणाऱ्या प्रत्येक गृहप्रकल्पात पाइपद्वारे स्वयंपाकाचा गॅस हे आकर्षण आहे. याखेरीज कंपनीची १९७ सीएनजी स्टेशन्स असून हजार वितरण बिंदू आहेत. हे सीएनजी आणि गॅस वितरण कंपनी आपल्या ४०० किलोमीटर कार्बन स्टील पाइपलाइन, तर सुमारे ४,००० किलोमीटर पॉलिथिलीन पाइपलाइनद्वारे करते. आपले वितरण विस्तार करण्यासाठी कंपनीने आता मुंबईजवळची मोठी उपनगरे म्हणजे कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, भिवंडी, पनवेल, तळोजा आणि खारघर इ. ठिकाणी लक्ष केंद्रित केले आहे. या सर्व उपनगरांत सुमारे दोन कोटी लोकसंख्येला हे वितरण अपेक्षित आहे. येत्या पाच वर्षांत १० लाख घरांना पाइपद्वारे गॅस तसेच सुमारे ३३० नवीन सीएनजी स्टेशन्स उभारण्याचा कंपनीचा मानस आहे. यासाठी कंपनी ६७५ किलोमीटर कार्बन स्टील पाइपलाइन तर सुमारे ५,५०० किलोमीटर पॉलिथिलीन पाइपलाइनचे जाळे उभारेल.

 

गेल्या जून महिन्यात प्रति शेअर केवळ ४२१ रुपयांना ‘आयपीओ’द्वारे विक्री करून कंपनीने गुंतवणूकदारांना आजवर दामदुप्पट नफा कमावून दिला आहे. कुठलेही कर्ज नसलेली महानगर गॅस सद्य भावातही एक उत्तम दीर्घकालीन गुंतवणूक ठरेल.

सूचना : प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

arth2-chart1