जगभरामध्ये ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढत असून दिवसोंदिवस या विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय. याच पार्श्वभूमीवर काही देशांनी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर कठोर निर्बंध लादले आहेत. तर काही देशांमध्ये लॉकडाउन आणि पुन्हा निर्बंध लागू करण्यासंदर्भातील हलचाली सुरु झाल्यात. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर लागू केल्या जाणाऱ्या निर्बंधांच्या शक्यतेच्या धास्तीनेच जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये खळबळ उड्याचं पहायला मिळत आहे. आज डिसेंबर महिन्याच्या शेवटून दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीलाच जगभरातील शेअर बाजारांमध्ये कोट्यावधी रुपयांचा चुरडा झाल्याचं चित्र पहायला मिळालं. पूर्वेकडील जपानपासून पश्चिमेकडे जागतिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेमध्येही शेअर बाजाराची पडझड झालीय. भारतीय शेअर बाजारही दुपारपर्यंत १७०० अंकाहून अधिक पडल्याचं पहायला मिळालं.

जगभरातील भांडवली बाजारामध्ये आज करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूची दहशत दिसून आली. ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव आणि पुन्हा निर्बंध लागू होण्याच्या भितीने गुंतवणूकदारांनी मोठ्याप्रमाणात विक्री करण्यास सुरुवात केली. जपान आणि हाँग काँगपासून सुरु झालेला हा ट्रेण्ड अगदी अमेरिकन शेअर बाजारामध्येही दिसून आला. भारतीय शेअर बाजारही आज सुरुवातीच्या तासामध्ये एक हजारांहून अधिक अंकांनी घसरला. सेन्सेक्स १८०० अंशांनी गडगडला असून निफ्टीचा निर्देशांकही १६ हजार ५०० च्या खाली गेला. आशियामधील शेअर मार्केट्समध्ये पडझड दिसून आली. तेलाच्या किंमतीही घसरल्याने गुंतवणुकदारांचा कल बाजारातून पैसा काढून घेण्याकडे राहिला. ओमायक्रॉनचा वाढता प्रभाव आणि निर्बंधांच्या शक्यतेने गुंतवणुकदारांनी हात आखडता घेतलाय. त्यामुळेच युरोपीयन बाजारपेठांमधूनही गुंतवणूकदार पैसे काढून घेताना दिसत आहे. याचा परिणाम नवीन वर्षाच्या सुरुवातीनंतरही जाणवत राहील असा अंदाज आहे.

नक्की वाचा >> भारतीय शेअर बाजारातही ओमायक्रॉनची दहशत; काही मिनिटांमध्ये पाच लाख कोटींचं नुकसान

बिजिंगने एका वर्षाच्या कर्जावरील दर कमी करत काही प्रमाणामध्ये शेअर बाजाराला सावरण्याची संधी दिली. मागील २० महिन्यांमध्ये पहिल्यांदाच चीनमध्ये व्याजदरात कपात करण्यात आलीय. मात्र ही कपात पाच वर्षांच्या कर्जावर केली जाईल अशी काहींना अपेक्षा आहे. चिनी शेअर बाजारामध्ये ०.४ टक्क्क्यांची पडझड झाली. तर जपानच्या निकाई शेअर बाजारामध्ये १.७ टक्के, दक्षिण कोरियन शेअर बाजार १.२ टक्क्यांनी गडगडला. नॅसडॅक म्हणजेच अमेरिकन शेअर बाजारामध्येही एक टक्क्यांनी घसरण झाली. युरोस्टॉक्समध्येही १.१ टक्क्यांची तर एफटीएसईमध्ये एका टक्क्यांनी घसरण होऊन पुन्हा अल्पशी वाढ झाली.

रविवारी नेदरलँडमध्ये ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. नेदरलँडच्या या निर्णयामुळे इतर युरोपीयन देशांमध्येही लॉकडाउनची चर्चा आणि विचार विनिमय सुरु असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मात्र असं असलं तरी अमेरिकेने सर्व व्यवहार सुरळीत सुरु ठेवणार असल्याची भूमिका घेतल्याचं दिसत आहे.

जपान शेअर मार्केट – २७ हजार ९३७.८१, एकूण पडझड ६०७.८७ अंक म्हणजेच २.१३ टक्के
हाँग काँग शेअर मार्केट – २२ हजार ७२५.७७, एकूण पडझड ४६६.८६ अंक म्हणजेच २.०१ टक्के
चिनी शेअर मार्केट – १० हजार ५३.२२, एकूण पडझड १०९.४० अंक म्हणजेच १.०८ टक्के
पॅरिस शेअर मार्केट – ६ हजार ९२६.६३ एकूण पडझड ७८.४४ अंक म्हणजेच १.१२ टक्के
जर्मन शेअर मार्केट – १५ हजार ५३१.६३ एकूण पडझड १०४.७१ अंक म्हणजेच ०.६७ टक्के

अमेरिकन शेअर मार्केट
डाऊ जोन्स – ३५ हजार ३६५. ४४ एकूण पडझड ५३२.१६ अंक म्हणजेच १.४८ टक्के
नॅसडॅक १०० – १५ हजार ८०१.४६ एकूण पडझड ६२.४४ अंक म्हणजेच ०.३९ टक्के
एस अॅण्ड पी ५०० – ४ हजार ६२०.६४ एकूण पडझड ४८.०३ अंक म्हणजेच १.०३ टक्के

भारतीय शेअर मार्केट –
निफ्टी १६ हजार ४४२.८० एकूण पडझड ५४२.४० अंक म्हणजेच ३.१९ टक्के
सेन्सेक्स ५५ हजार २६३.२३ एकूण पडझड १ हजार ७४८.५१ अंक म्हणजेच ३.०७ टक्के
निफ्टी बँक ३४ हजार ८९.२० एकूण पडझड १ हजार ५२९.४५ अंक म्हणजेच ४.२९ टक्के

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लंडन शेअर बाजार हा आज एकमेव मोठा शेअर बाजार ठरला ज्यामध्ये पडझड झाली नाही. एफटीएसईमध्ये अल्प घसरणीनंतर बाजार सावरला आणि त्यात ०.१३ टक्क्यांनी वाढ झाल्याचं पहायला मिळालं.
लंडन (एफटीएसई) शेअर मार्केट – ७ हजार २६९.९२ अंक, एकूण वाढ ९.३१ अंक म्हणजेच ०.१३ टक्के