अविष्कार देशमुख

मराठी मातीतील उद्यम-व्यवसायातील नवधुमाऱ्यांचा वेध घेणारे साप्ताहिक सदर ..

तो युवक गरीब होता; पण मोठी स्वप्ने बघायचा. घरच्या अठराविशे दारिद्रय़ातही असे मोठे स्वप्न बघण्याची हिंमत त्याला धीरुभाई अंबानीच्या यशोगाथेतून मिळायची. धीरुभाई हेच त्याच्या स्वप्नांचा प्रेरणास्रोत. तो काळ तसा फारच संघर्षांचा होता. गुजरात व सौराष्ट्रदरम्यान मोठा भडका उडाला होता. त्यातून वाचण्यासाठी या युवकाच्या कुटुंबाने थेट विदर्भातील अकोला गाठले. जगण्यासाठीच्या या कठीण प्रवासातही त्या युवकाने भव्य स्वप्नांचे गाठोडे हातून सुटू दिले नाही. गॅस, स्टोव्हची दुरुस्ती करून त्याने कुटुंबाला आधार दिला व सोबतच स्वप्नांच्या पूर्ततेसाठी स्वत:ला प्रयत्नांच्या यज्ञकुंडात झोकून दिले. कधीकाळी स्टोव्हची दुरुस्ती करणारा तोच युवक आज वर्षांला ६८ लाख सिलिंडरची निर्मिती करतोय. ज्या धीरुभाई अंबानींना तो आपले प्रेरणास्रोत समजत होता त्याच धीरुभाईंची रिलायन्स इंडस्ट्रीज आज त्याची ग्राहक आहे. संघर्षांतून असे असामान्य कर्तृत्व घडवणाऱ्या या उद्योजकाचे नाव आहे नितीन खारा.

कधीकाळी स्वत: घरगुती गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी दोन-दोन दिवस रांगेत उभे राहणारे नितीन खारा आज आपल्याच विविध कारखान्यांत वर्षांला ६८ लाख सिलिंडरची निर्मिती करताहेत. कॉन्फिडेन्स ग्रुप असे त्यांच्या कंपनीचे नाव आहे. खारा यांनी १९ राज्यांत आपले साम्राज्य उभे केले आहे. खारा परिवार मूळचे राजकोटशेजारी असलेल्या जसधन या छोटय़ा गावातील. गुजरात व सौराष्ट्रदरम्यानच्या झालेल्या भीषण संघर्षांनंतर अकोला शहर गाठले. नितीन खारा यांचे आई-वडील पूनमचंद खारा आणि रसिलाबेन खारा यांनी तेथे स्टील भांडय़ाचे दुकान थाटले. याच छोटय़ा शहरात ९ मार्च १९६१ साली नितीन खारा यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण त्यांनी अकोल्यात घेतले. सोबतच दुकानाचा व्यवहारही ते सांभाळत. गॅस, स्टोव्हची दुरुस्ती करून ते कुटुंबाला हातभार लावायचे. अकोल्यात शिक्षण पूर्ण केल्यावर नितीन खारा १९९० साली एक दिव्य स्वप्न घेऊन नागपुरात आले. त्यांनी महाल येथे एक छोटेसे गॅस शेगडी, स्टोव्हदुरुस्ती व विक्रीसोबतच स्टीलच्या भांडय़ांचे दुकान थाटले. गणेशपेठ भागात ते भाडय़ाने राहायचे. काही काळ व्यवसाय केला. मात्र खारा यांचे स्वप्न मोठे होते, ते स्वस्थ बसू देत नव्हते. खारा यांना व्यवसाय नाही तर उद्योग थाटायचा होता, तोही अंबानींसारखा. त्यांनाही गॅसनिर्मिती क्षेत्रात आपला ठसा उमटवायचा होता. १९९३ साली सरकारने घरगुती गॅस सिलिंडरनिर्मितीसाठी नियमात शिथिलता प्रदान केली आणि या क्षेत्रातील व्यावसायिकांना सरकारसोबत भागीदारी करण्याचे निमंत्रण दिले. नितीन खारा यांनी या संधीचे सोने करायचे ठरवले. गॅस शेगडी वितरकाचे काम मिळवले. आता खारा यांना गॅस सिलिंडर तयार करण्याचा कारखाना सुरू करायचा होता. त्यांनी गॅस सिलिंडरच्या कारखान्याचा अभ्यास सुरू केला तेव्हा नागपुरात देशातील सर्वात जुना गॅस सिलिंडरचा कारखाना होता. तो विक्रीस निघाला आहे अशी माहिती खारा यांना मिळाली. त्यांनी कारखान्याच्या मालकाच्या भेटीसाठी मुंबई गाठली. नामांकित उद्योगपती धरमजी मोरारजी यांच्या समूहाचा हा ‘कोसान’ नावाचा कारखाना होता आणि त्याचे मालक होते गोपालदास भाटिया. सर फिरोजशा मेहता मार्गावरील त्यांच्या कार्यालयात नितीन खारा पोहोचले. त्यांनी भाटिया यांची भेट घेतली आणि विक्रीस निघालेला कारखाना खरेदीसंदर्भात विचारले. हे ऐकताच वयोवृद्ध भाटिया संतापले आणि खारा यांना बाहेरचा रस्ता दाखवला. जातेवेळी भाटिया यांच्या स्वीय साहाय्यकाकडे आपले व्हिजिटिंग कार्ड ठेवून ते निघून गेले. खारा यांचा पहिला प्रयत्न फसला. ते निराश झाले. मात्र त्यांची आशा कायम होती. याच दरम्यान हैदराबाद येथे फ्रिज तयार करणाऱ्या ऑल्विन कंपनीने आपला कारखाना विक्रीस काढला. यामध्येच सिलिंडर तयार करण्याचाही कारखाना होता. हा कारखाना टाटा समूहाने खरेदी केला. मात्र सिलिंडर तयार करण्याचे नियम व कायदे फार कडक होते. सिलिंडरची निर्मिती झाल्यावर त्यामध्ये चाचणीदरम्यान थोडी जरी गळती आढळल्यास कारखान्याचा परवाना रद्द केला जायचा. त्यामुळेच ती कंपनी विक्रीस काढली होती. मात्र ही बाब टाटा समूहाला कळताच त्यांनी कारखाना बंद केला. खारा यांनी टाटा समूहाचे जे.जे. इराणी यांची भेट घेऊन, बंद कारखाना विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली. साडेसात कोटींत सौदा पक्का झाला. मात्र खरेदीसाठी ही एवढी रक्कम उभी करणे मोठे संकटच होते. १९९५ सालचा तो काळ. खारा यांनी कसे तरी दोन कोटी रुपये जमवले. मात्र बाकीच्या साडेचार कोटी रुपयांचा प्रश्न कायम होता. खारा यांचा आत्मविश्वास  दांडगा होता. ते परत जे.जे. इराणींना भेटले आणि त्यांच्यापुढे एक प्रस्ताव ठेवला – ‘सध्या दोन कोटींची रक्कम घ्या आणि मला कारखाना सुरू करण्याची परवानगी द्या. एकदा कारखाना सुरू झाला, की उर्वरित रक्कम मी तुम्हाला देईन आणि त्यानंतरच कारखाना माझ्या नावे करा.’ खारा यांचा आत्मविश्वास बघून इराणी यांनी तो प्रस्ताव मंजूर केला. आपल्या ध्यासाची पहिली पायरी खारा यांनी अशा तऱ्हेने पार केली.

हा सौदा होत नाही तोच मुंबईहून मोरारजी समूहाच्या कार्यालयातून फोन आला. भाटिया यांनी भेटण्यास बोलावले. खारा यांनी तातडीने मुंबई गाठत नागपूर येथील घरगुती सिलिंडर तयार करण्याच्या कारखान्याचा आठ कोटी एकेचाळीस लाखांत सौदा केला. खारा यांनी ताबडतोब पंचवीस लाखांचा धनादेश भाटिया यांना दिला. मात्र उर्वरित रक्कम १८० दिवसांत दिली नाही तर पंचवीस लाखही विसरून जा, असे भाटिया यांनी बजावले. खारा यांच्यापुढे तोच प्रश्न आला, की एवढी रक्कम आणायची कुठून? कारखाना सोडायचा नाही हे डोक्यात ठेवून त्यांनी कर्ज घेण्यासाठी अनेक बँकांच्या चकरा मारल्या. अखेर पुढील चार वर्षांसाठी खारा यांना कर्ज मंजूर झाले. तो त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा वळणबिंदू ठरला. गुणवत्तेत अव्वल दर्जा असल्याने खारा यांचा व्यवसाय प्रगती करू लागला. दिवसरात्र कठोर मेहनत, चिकाटी आणि ग्राहकांचा विश्वास जिंकत खारा यांनी पुढील तीन दशकांत १५ सिलिंडरच्या शाखा, एक सीएनजी प्लांट, ५४ गॅस बॉटिलग प्लांट, तीन इथेनॉल रिफायनरी प्लांट आणि दीडशेहून अधिक ऑटो गॅस स्टेशन उभे केले. सहा हजार प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर्मचाऱ्यांना रोजगार मिळाला. देशातील १९ राज्यांत कॉन्फिडेन्स समूह विस्तारला. या व्यवसायात त्यांचे दोन भाऊ नितीन आणि अनुज त्यांना हातभार लावत आहेत. या क्षेत्रात खारा यांनी नावीन्यपूर्ण संशोधनाला महत्त्व दिले. त्यांच्या ‘गो गॅस’च्या अंतर्गत असलेल्या तीन गॅस सिलिंडरपैकी एक सिलिंडर हे ब्लास्टप्रूफ असून ते इतर सिलिंडरच्या तुलनेत निम्म्या वजनाचे आहे. त्यामध्ये किती गॅस शिल्लक आहे हेदेखील सहज कळते.

रेल्वेच्या दारात बसून प्रवास

आपल्या तीन दशकांच्या प्रयत्नानंतर खारा आज आशिया खंडात सिलिंडरनिर्मितीमध्ये आघाडीवर आहेत. इंडियन ऑइल, हिंदुस्थान पेट्रोलियम, रिलायन्स इंडस्ट्रीज आज खारा यांचे ग्राहक आहेत. आज एवढे मोठे साम्राज्य असले तरी खारा जुने दिवस विसरलेले नाहीत. ते सांगतात, ९० च्या दशकात कामानिमित्त मुंबईला नियमित ये-जा करावी लागायची. त्या वेळी रेल्वेचे तिकीट काढण्यासाठीही पैसे नसायचे. त्यामुळे मी अनेकदा रेल्वेच्या दारात बसून मुंबई गाठली आहे.

प्रदूषणमुक्त भारताचे स्वप्न

भारतात दिवसेंदिवस वाहनांमुळे प्रदूषण वाढत आहे. विशेष करून शाळकरी विद्यार्थी याचे शिकार ठरत आहेत. यासाठी ऑटो एलपीचीची निर्मिती आम्ही करतो. ते सहज ग्राहकांना मिळावे यासाठी देशभरात १००० पेक्षा अधिक ऑटो एलपीजी स्टेशन सुरू केले आहे. भविष्यात एक हजार स्टेशन सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे, असे नितीन खारा मोठय़ा अभिमानाने सांगतात.

नितीन खारा (कॉन्फिडेन्स ग्रुप)

* व्यवसाय –   गॅस सिलिंडर, बॉटलिंग

* कार्यान्वयन : सन १९९५

* सध्याची उलाढाल : सुमारे ८०० कोटी रुपये

* रोजगारनिर्मिती : सुमारे सहा हजार कामगार

* संकेतस्थळ : http://www.confidencegroup.co

लेखक ‘लोकसत्ता’चे नागपूरचे प्रतिनिधी avishkar.deshmukh@expressindia.com

आपणासही या सदरासाठी नवउद्योजकाची शिफारस, सूचना ई-मेल :  arthmanas@expressindia.com वर कळविता येईल.