करोना साथीचा झाकोळ साऱ्याच व्यवहारांवर पडला आहे. मग ग्रंथव्यवहार तरी त्यास कसा अपवाद ठरावा. डिजिटल माध्यमांनी उभे केलेल्या आव्हानास तोंड देत, व्यवसायाच्या नव्या क्लृप्त्या लढवत ग्रंथव्यवहार सुरू होता, त्यावर करोनाचा प्रखर प्रहार झाला. टाळेबंदीत ग्रंथालये बंद, पुस्तकांची दुकानेही बंद – अशा स्थितीत उरलासुरली व्यवसायसंधीही या क्षेत्रापासून हिरावली, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. यातून मार्ग काढावा तरी कसा, असा प्रश्न ग्रंथव्यवहारांतील धुरीणांपुढे असतानाच काहीशी निराशाजनक बातमी येऊन धडकली, ती थेट ब्रिटनहून. तिथल्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या जवळपास चारशे वर्षांहून जुन्या ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस’ अर्थात ‘ओयूपी’ची  ‘ऑक्सयुनिप्रिंट’ ही मुद्रणशाखा आता बंद करण्याचा निर्णय झाल्याच्या या बातमीने ‘ओयूपी’चे जगभरचे जाणते वाचक नक्कीच हळहळले असतील. आजवर अनेक उत्तमोत्तम वैचारिक पुस्तके दिलेल्या या मुद्रणशाखेचा व्यवसाय आतबट्ट्याचा ठरू लागला होता म्हणून हा निर्णय घेतल्याचे ‘ओयूपी’च्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे. मुद्रणशाखेतील २० कर्मचाऱ्यांचे काय करायचे, हा प्रश्नही त्यामुळे उभा राहिला असून त्यावर सध्या विचारमंथन सुरू असल्याचेही त्या निवेदनात म्हटले आहे. गेल्या काही वर्षांपासून ‘ओयूपी’ची मुद्रणविषयक कामे भारत आणि फिलिपिन्समधील मुद्रणशाखांकडून होत आहेत. त्यातील किफायतशीरपणा जमेस धरला तरी, काहीशे वर्षांची परंपरा असलेली ‘ऑक्सयुनिप्रिंट’ ही मुद्रणशाखा बंद करण्याचा निर्णय ‘ओयूपी’च्या वाचकांना, जुन्या-जाणत्या ऑक्सफर्डप्रेमींना निश्चितच रुचणार नाही. पंरपरा की व्यवसाय, यात अस्तित्वासाठी ‘ओयूपी’ने व्यवसायाची निवड करून जगभरच्या अनेक ग्रंथव्यवहार धुरीणांपुढील अवघड प्रश्नाला काहीसे सोपे उत्तर देऊन टाकले आहे, हे मात्र नक्की!