छायाचित्रकार डेव्हिड डग्लस डंकन हे १०२ वर्षांचे होऊन, सात जून रोजी वारले. त्यांच्या छायाचित्र-संग्रहांची झालेली पुस्तकं जरी भारतात फार परिचित नसली, तरी तशा पुस्तकांची संख्या  २५ आहे. त्यापैकी सुमारे आठ पुस्तकं आहेत चित्रकार पाब्लो पिकासोबद्दल. काही अमेरिकेतल्या जगण्याबद्दल.. आणि दोन पुस्तकं, युद्धातल्या मरण्याबद्दल.

ही मरणाची जाणीव जिथं स्पष्ट दिसते, असे चेहरे- असे डोळे टिपण्याचं काम जेव्हा फार कुणी करत नव्हतं तेव्हा डेव्हिड डग्लस डंकन यांनी केलं. सन १९१६ मध्ये सुखवस्तू कुटुंबात जन्मून फोटोग्राफीचा ‘श्रीमंती शौक’ बालवयापासूनच बाळगू शकणारे डंकन १७ फेब्रुवारी १९४३ रोजी पासून अमेरिकी   नौदलात ‘सेकंड लेफ्टनंट’ या पदावर रुजू झाले; पण त्यांच्या हाती कॅमेरा हेच शस्त्र नौदलानं दिलं. प्रचार आणि प्रसिद्धीसाठी दुसऱ्या महायुद्धातल्या अमेरिकी कारवायांचे फोटो काढणं, हे त्यांचं नेमून दिलेलं काम. पण त्याखेरीज त्यांनी आपल्या सहकाऱ्यांची घालमेलही टिपली. सहज. तीच पुढे त्यांना ‘युद्धाचा मानवी चेहरा टिपणारे’ अशी प्रसिद्धी देऊन गेली. सन १९४६ च्या फेब्रुवारीत डंकन यांची नौदल-नोकरी थांबली. ‘लाइफ’ नियतकालिकात ते रुजू झाले. पुढे अमेरिका युद्धं करतच राहिली. यापैकी कोरियन युद्धात आणि व्हिएतनाम युद्धातल्या सैनिकांचे हालच होताहेत, हे टिपणाऱ्या  छायाचित्रकारांत डंकन अग्रस्थानी होते. ‘लाइफ’नं १९६७ मध्ये त्यांच्या युद्ध-छायाचित्रांवर खास अंक काढला. त्यात भर घालून ‘धिस इज वॉर’ हे पुस्तक झालं.. प्रचंड गाजलं!

याच काळात डंकन यांची पिकासोशी मैत्री वाढत होती. किती मैत्री, हे पिकासोच्या फोटोंची पुस्तकं सांगतातच. पण का म्हणून मैत्री? काय समान दुवा होता या दोघांत? हे दोघेही युद्धाला प्रश्न विचारणारे होते! युद्धात एकच बाजू घेणारे नव्हते. माणसाची बाजू जपणारे होते.