News Flash

जानकरांच्या विधानाचे संतप्त पडसाद

बारामती हॉस्टेलमधील राष्ट्रवादीचे नेते शदर पवार यांच्या छायाचित्रावर शाईफेक केली.

   मराठवाडय़ात राष्ट्रवादीतर्फे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. तर काही ठिकाणी त्यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन करण्यात आले. औरंगाबाद शहरातील क्रांती चौकात आंदोलन झाले. 

पुण्यात बारामती हॉस्टेलमध्ये पवारांच्या छायाचित्रावर शाईफेक; मराठवाडय़ात जानकर, अजित पवार यांचे पुतळे जाळले

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्य केल्याचे पडसाद बुधवारी पुणे व मराठवाडय़ात ठिकठिका उमटले. मराठवाडय़ात जानकर व अजित पवार यांचे पुतळे जाळण्यात आले तर बारामती हॉस्टेलमधील राष्ट्रवादीचे नेते शदर पवार यांच्या छायाचित्रावर शाईफेक केली.

पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यालय राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मंगळवारी रात्री फोडण्यात आल्यानंतर रासपच्या संतप्त कार्यकर्त्यांनी बुधवारी बारामती हॉस्टेलमधील राष्ट्रवादीचे नेते शदर पवार यांच्या छायाचित्रावर शाईफेक केली. या प्रकारात सहभागी असलेल्या रासपच्या एका कार्यकर्त्यांला कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले.  या प्रकारानंतर गोखलेनगर भागातील जनवाडी पोलीस चौकीसमोर रासप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यामुळेही दुपारी तणाव निर्माण झाला. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरुवातीला बाचाबाची झाली आणि त्याचे पर्यवसान धक्काबुक्कीत झाले. बारामती हॉस्टेलमध्ये शाईफेक केल्याप्रकरणी रासपचा कार्यकर्ता उमेश भीमराव कोकरे (वय २६, रा. इंदिरा वसाहत, उत्तमनगर, एनडीए रस्ता) याला अटक करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी रासपच्या पाच-सहा कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती हॉस्टेलमधील रखवालदार गणपत बबन कोकाटे (वय ३३, रा. गोखलेनगर) यांनी या संदर्भात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रासपचे कार्यालय फोडल्याची घटना मंगळवारी रात्री घडल्यानंतर रासपचा कार्यकर्ता उमेश कोकरे याच्यासह पाच ते सहा कार्यकर्ते गोखलेनगर भागातील बारामती हॉस्टेलमध्ये बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास शिरले. त्यांनी घोषणाबाजी करून रखवालदार कोकाटे यांना धक्काबुक्की केली. तेथील छायाचित्रावर त्यांनी शाईफेक केली. त्यानंतर पसार होण्याच्या तयारीत असलेल्या कोकरेला पकडण्यात आले. मात्र, त्याच्यासोबत असलेले अन्य कार्यकर्ते पसार झाले. रासप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जनवाडी पोलीस चौकीसमोर जमा झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी तातडीने शीघ्र कृती दलाला घटनास्थळी पाचारण केले. त्यानंतरही तणाव होता.

रासप कार्यकर्त्यांला धक्काबुक्की

जनवाडी पोलीस चौकीसमोर रासपचे कार्यकर्ते संतोष वाघमोडे-पाटील (वय २६, रा. कात्रज) यांना मारहाण करण्यात आली. वाघमोडे यांनी याप्रकरणी जनवाडी पोलीस चौकीत तक्रार दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रवादीच्या दोन महिला कार्यकर्त्यां तसेच आणखी दोघांनी मारहाण केल्याचे वाघमोडे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

अटकेची मागणी

जनवाडी पोलीस चौकीसमोर जमलेल्या रासपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर महिला अध्यक्ष रूपाली चाकणकर यांना अटक करण्याची मागणी केली. सिंहगड रस्त्यावरील रासपचे कार्यालय फोडल्याप्रकरणी रूपाली चाकणकरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे चाकणकरांना तातडीने अटक करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली.

बारामती हॉस्टेल परिसरात बंदोबस्त

शाईफेकीच्या घटनेनंतर गोखलेनगर भागातील बारामती हॉस्टेल परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तेथे शीघ्र कृती दलाची एक तुकडी ठेवण्यात आली आहे. रासप व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या कार्यालयासमोर बंदोबस्त ठेवला .

औरंगाबाद – जानकर यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेच्या निषेधार्थ बुधवारी मराठवाडय़ात ठिकठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महादेव जानकर यांच्या पुतळ्याला जोडे मारून पुतळा जाळला. औरंगाबाद शहरातील क्रांती चौकात कार्यकर्त्यांनी जोडेमारो आंदोलन केले. शहरातील गांधीचमन भागात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत मंत्री महादेव जानकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर जानकर यांच्या वक्तव्याचा निषेध करत जानकर यांच्या पुतळ्याला जोडे मारून पुतळा जाळला. जालन्यातील अंबडमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महादेव जानकर यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा पुतळा जाळला. यावेळी पोलिसांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या १३ कार्यकर्त्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या , कार्यकर्त्यांनी उस्मानाबाद व तुळजापूर येथे जानकरांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास चपला हार घालून दहन केले. उस्मानाबादमध्ये छत्रपती शिवाजी चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी युवती काँग्रेसच्या प्रवक्त्या सक्षणा सलगर, राजसिंहा राजेिनबाळकर, नंदा पुनगडे आदी उपस्थित होते. भगवान गडावर जानकर यांनी केलेल्या वक्तव्याचा परभणी येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निषेध नोंदवला. येथील राष्ट्रवादी भवनासमोर जानकर यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. या वेळी डॉ. केंद्रे यांच्यासह विष्णू नवले, सुमंत वाघ, सिद्धांत हाके आदींसह पक्षाचे कार्यकत्रे या वेळी हजर होते.  मंत्रिपदी असलेल्या व्यक्तीने अत्यंत खालच्या पातळीवर वक्तव्य करावे, ही बाब निषेधार्ह असून जानकर यांच्या वक्तव्याने महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री किती हीन थराला जात आहेत, हेच त्यातून स्पष्ट झाले आहे. भविष्यात जानकर यांना त्यांच्या विधानाची किंमत चुकवावी लागेल, अशी प्रतिक्रिया आ. डॉ. मधुसूदन केंद्रे यांनी व्यक्त केली.

विनाशकाले विपरीत बुध्दी’-अजित पवार

सोलापूर- दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी आपल्या विरोधात केलेले वक्तव्य म्हणजे त्यांची ‘विनाशकाले विपरीत बुध्दी’ आहे. एखाद्या जबाबदार मंत्र्याने तारतम्य न बाळगता बेजबाबदार विधान करणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केली. जानकरांच्या विधानावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही शांतता राखावी, असे आवाहनही त्यांनी केले. जानकर यांच्या कार्यकर्त्यांनी आरक्षणाचा मुद्दा बारामतीत पेटवून शरद पवार यांना लक्ष्य करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला होता. आताही त्यांची हीच चाल आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आम्हा पवार काका-पुतण्यावर जानकर यांनी तारतम्य न बाळगता केलेल्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी न संतापता शांतता व संयम राखावा, असे आवाहन पवार यांनी केले. शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव असलेल्या राज्यात मंत्र्यांनी बेजबाबदार विधाने करणे चुकीचे आहे. आपण सत्तेवर असताना तारतम्य न बाळगता अशी विधाने केली नव्हती, असा दावाही त्यांनी केला.

जानकरांना बडतर्फ कराधनंजय मुंडे

बीड – दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी अजित पवार व माझ्यावर पातळी सोडून टीका करताना विधिमंडळ सभागृहासह मुख्यमंत्र्यांचाही अवमान केला आहे. मंत्री जाहीरपणे विधिमंडळातील सहकाऱ्यांना शिव्या देत असतील तर कायदा आणि सुव्यवस्था पाळण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसची नाही तर मंत्र्यांची असते. त्यामुळे जानकर यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे, अशी मागणी राज्यपालांकडे करणार असल्याचे सांगून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावरही विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पलटवार केला. जिल्हाभर जानकर यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यांचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दहन करुन संताप व्यक्त केला.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे समर्थक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी १२ ऑक्टोंबर रोजी परळी, सिरसाळा, अंबाजोगाई, वडवणी येथील चौकांमध्ये जानकरांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करुन संताप व्यक्त केला. जानकरांनी माफी मागितली नाही तर जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी आदींनी दिला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर पलटवार करताना धनंजय मुंडे म्हणाले की, भावाला माझ्यामुळे लाल दिवा म्हणणाऱ्यांसाठी २००९ला भावानेच आमदारकीचा दावा सोडला हे विसरले काय? मी दावा सोडला नसता तर राजकीय जन्मच झाला नसता. एका मंत्र्याच्या दर्शनासाठी पहिल्यांदाच भगवानगडावर सत्तेच्या बळाचा वापर करुन सामान्यांसाठी चार तास दर्शन बंद केले, ही कोणती परंपरा?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2016 1:41 am

Web Title: mahadev jankar aggressive speech issue
Next Stories
1 कितीही घेरले तरी घाबरत नाही!
2 पक्षांतर्गत राजकारणाला पंकजा मुंडे यांचा शह
3 सोयाबीन प्रश्नी सदाभाऊ खोत यांची भंबेरी
Just Now!
X