उद्योग क्षेत्रात मंदीची छाया दाटलेली असताना उद्योगाला अधिक लाभ देणाऱ्या काही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केल्या जातील, अशी अपेक्षा होती. मात्र औरिक सिटीमधील सभागृहाच्या लोकार्पण सोहळ्यात उद्योग विभाग मागच्या बाकावर आणि महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानातून उभारण्यात आलेल्या बचतगटाच्या महिला केंद्रस्थानी, असे चित्र शनिवारी आयोजित कार्यक्रमात होते. विशेष म्हणजे औरिक सिटी आणि औरिक हॉलमधील सुविधांची माहिती देणारी एक चित्रफीत दाखवण्यात आली. त्यात उद्योगमंत्री सुभाष देसाई बोलताना दिसून आले. मात्र उद्योगाच्या प्रमुख कार्यक्रमात सुभाष देसाईंना भाषण करण्याची संधी काही मिळाली नाही. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दोन वेळा भाषण केले.

राज्यभरातून महिला बचत गटातील सदस्यांना कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी खासी तजवीज करण्यात आली होती. मोठय़ा प्रमाणात बस ठरवून महिलांना शेंद्रा औद्योगिक वसाहतीत आणण्यात आले. त्यामुळे सकाळच्या वेळी शेंद्रा औद्योगिक परिसरातील वाहतुकीचा कोंडमारा झाला होता. अनेक महिलांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तीन-साडेतीन किलोमीटरची पायपीट करावी लागली. औरिक हॉलच्या उद्घाटनानिमित्त उद्योग क्षेत्राला दिलासा देणाऱ्या काही घोषणा होतील, असे अपेक्षित होते. मात्र औरिक सिटी भारताच्या उद्योगाच्या केंद्रस्थानी राहील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधानांच्या भाषणापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र औरंगाबादच्या उद्योजकांचे कौतुक केले. मराठवाडा ऑटोक्लस्टरच्या माध्यमातून देशातले उत्कृष्ट काम येथील उद्योजक करत असल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला. जालना आणि औरंगाबाद ही शहरे भविष्यातील उद्योग जगताचे चुंबक असेल, असेही ते म्हणाले. उज्ज्वला गॅस जोडणी, मुद्रा योजना याचा उल्लेख पंतप्रधानांनी भाषणातून केला. तत्पूर्वी बचत गटाच्या महिलांना कसे प्रोत्साहन दिले जात आहे, याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिली. कर्ज रक्कम शंभर टक्के परत करणाऱ्या गटांना शून्य टक्के व्याजाने कर्ज दिले जाते, अशी योजनाही राज्यात सुरू असल्याचे आवर्जून सांगितले. बचत गटांनी तयार केलेल्या वेगवेगळ्या वस्तूंच्या प्रदर्शनाची पाहणीही पंतप्रधान मोदी यांनी केली.

सबका साथ, सबका विकास

उज्ज्वला गॅस जोडणीसाठी निवडण्यात आलेल्या पाच महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात जोडणी संदर्भातील कागदपत्रे शनिवारच्या कार्यक्रमात देण्यात आली. यात सुलताना बर्डे आणि जम्मू-काश्मीरच्या नर्गिस बेगम यांचाही समावेश होता. त्यांच्या बरोबरच झारखंडच्या रेखादेवी आणि औरंगाबादच्या मंदाबाई भाबले यांनाही गॅस जोडणीची कागदपत्रे देण्यात आली. लाभार्थी महिलांच्या निवडीमध्ये उद्दिष्टपूर्ती करणाऱ्या महिलेचे नाव सुलताना बर्डे असे होते. याचा अर्थ ‘सबका साथ, सबका विकास’, असाही लावला जात होता.