शिक्षक संमेलनात शिक्षण विभागाच्या कारभारावर टीका

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा चांगला कार्यक्रम. त्याचे स्वागत करायला हवे. एका बाजूला या कार्यक्रमाची अंमलबजावणी नीटपणे सुरू असताना वेगवेगळे शासन निर्णय धडाधड आदळत आहे. वेगवेगळे प्रशिक्षण सुरू आहे. एक अहवाल तयार केला आणि वर्गावर जावे म्हटले की, दुसरा अहवाल मागवला जातो. त्यामुळे आम्हाला वर्गावर जाऊ द्या, अशी विनंती सरकारला करतो आहे, असे सांगत राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बालाजी मदन इंगळे यांनी लिहित्या माणसांसाठी सध्याचा काळ वाईट असल्याचे प्रतिपादन केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, शिक्षण विकास मंच व महात्मा गांधी मिशनच्यावतीने औरंगाबाद येथे शनिवारी आणि रविवारी दोन दिवसाचे शिक्षकांचे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

शिक्षक संमेलनाचे उद्घाटन अनोख्या पद्धतीने करण्यात आले. फळ्यावर खडूने शुभेच्छा संदेश लिहीत उपस्थितांनी संमेलनाचे उद्घाटन केले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड, स्वागताध्यक्ष आमदार विक्रम काळे, शिक्षण विकास मंचचे वसंत काळपांडे, बसंती रॉय, नंदकिशोर कागलीवाल, दासू वैद्य, नीलेश राऊत, दत्ता बाळसराफ यांची उपस्थिती होती. यावेळी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते वीरा राठोड, रवी कोरडे व डॉ. आसाराम लोमटे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सकाळी ग्रंथदिंडीही उत्साहात काढण्यात आली. एमजीएमच्या परिसरात पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

कॉपीमुक्तीसह वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी कशा व कोणत्या उपाययोजना शिक्षकांनी कराव्यात, याचे विवेचन बालाजी इंगळे यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणामध्ये केले. त्याचबरोबर साहित्य क्षेत्रात लिहिणाऱ्यांची मानसिकता कशी बदलली जात आहे, यावरही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ‘एक अनामिक भीती, तुटलेपण, अस्वस्थता आणि असुरक्षितता वाटू लागली आहे. लोकशाहीने दिलेले हक्क, अधिकार, आपल्यासाठीच आहेत, असे वाटत नाही. निर्धोकपणे व्यक्त होता येत नाही. कायम टांगती तलवार डोक्यावर ठेवण्यात आली आहे. कुठे गेले आमचे स्वातंत्र्य? निर्वासितांच्या छळछावण्यांमध्ये आम्ही राहत नाही ना, असे वाटत आहे. मंत्रालयात एक शेतकरी भेटायला जातो, त्याला मारहाण होते. विनाअनुदानित शाळेतील शिक्षक मुख्यमंत्र्यांना भेटायला जातात, तेव्हा त्यांना मारहाण होते. स्वतंत्र मराठवाडय़ाच्या विरोधात असलो तरी अणेंचे गाडीवर दगडफेक करणे, हा कुठला मार्ग?’  या वेळी शिक्षक विकास मंचच्यावतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा वसंत काळपांडे यांनी केली. डॉ. शारदा बर्वे लिखित ‘अध्ययन अक्षमता’, डॉ. राजा दांडेकर यांचे ‘अशी घडलेली माणसे’, व श्रुती पानसे लिखित ‘बहुरंगी बुद्धिमत्ता’ या तीन पुस्तकांच्या लेखक व प्रकाशकांचा सत्कार यावेळी करण्यात आला. रोख पाच हजार रुपये, स्मृतिचिन्ह व गौरवपत्र’ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी बाबा भांड यांचे समयोचित भाषण झाले. विशेष सत्कारानंतर बोलताना डॉ. आसाराम लोमटे म्हणाले, जेव्हा समाज संभ्रमित असतो, समाजमन जेव्हा कुंठित असते, तेव्हा शिक्षकच लिहितो. पण हे लिखाण करताना केवळ मनोरंजन व्हावे, रम्य आणि आनंदी भाव लिहिण्यापेक्षा समाजमन हलावे, असे लिहिण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले.