छत्रपती संभाजीनगर : एखाद्या देशाचा प्रभाव कमी करण्यासाठी आखली जाणारी धोरणे कधी बदलतील हे सांगता येत नाही. आता ट्रम्प यांनी टेरीफ आखलेले धोरण लक्षात घेता जागतिक आव्हान लक्षात घेऊन भारतीय पद्धतीने शेती विकास करायला हवा. त्यासाठी भारतीय पद्धतीचे तंत्रज्ञानात्मक बदलही आवश्यक आहेत, असे मत रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठानच्या २८ व्या वर्धापन दिनी ते बोलत होते.
मोहन भागवत म्हणाले, देशाचं जीवन चालायचे तर पोटात अन्न पाहिजे. त्यामुळे अन्नाच्या बाबतीत स्वावलंबी झाले पाहिले. शेतकऱ्यांनी शेती करावीच पण ती त्यांना परवडली पाहिजे. अन्यथा ते शेती सोडून देतील किंवा रोखीचे पीक घेतील. शेती परडवणारी नाही हे दिसतेच आहे. शेतीतून मिळणारे उत्पन्न होणारा खर्च याचा विचार करता शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम आहे. पण शेती करण्याची ११ – १२ हजार वर्षांपासूनच्या परंपरा आहे आणि आपल्याकडील शेती अजून देणारी आहे. आफ्रिकेतील शेती अचानक मिळाल्यानंतर ती भूमी ४०० वर्षांत उत्पादन देईनाशी झाली आहे. त्यावर उपाय करणारी फायदेशीर पद्धत सांगितली पाहिजे. अनेक शेतकऱ्यांनी प्रयोग पाहिल्यानंतर सांगताे.
भारतीय पद्धतीने शेती करायला पाहिजे. याचा अर्थ बाहेरचे सगळे नाकारायचे असे नाही. याचा अर्थ बाहेरचे सगळे टाकून द्या असे नाही. त्याचे एक भारतीय तंत्र विकसित करायला हवे. आता आपण ट्रॅक्टरने शेती करतो. त्यांच्या नांगराने वरचे जिवाणू खूप खोलवर जातात. अशा स्थितीमध्ये नवे तंत्रज्ञान शोधून त्याला भारतीय रूप द्यावे लागेल. शेतीत पाश्चात्य आणि आधुनिक तंत्रज्ञान आवश्यक तेथे वापरून भारतीय पद्धतीने शेती आणि पशुपालनाचा समन्वय साधत या क्षेत्रात काम करावे लागणार आहे, असेही भागवत म्हणाले.
पशुवैद्यक शास्त्रात सर्वोच्च गुण प्राप्त करणारे विद्यार्थी व पशुपालन क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोक दिवाण व्यासपीठावर होते.
स्वत: पशुवैद्यकीय पदवीधर असणारे डॉ. भागवत म्हणाले, आपल्याकडे ज्यांना काही सांगता येत नाही असे रुग्ण येतात. ज्याला बोलता येत नाही, उपचार करताना जो विरोध करतो, त्याचेही दुःख समजून त्याला बरे करण्याची कला आपल्याकडे आहे. पशुवैद्यक क्षेत्रातही आपले एक आयुर्वेद आहे. भारतीय पद्धतीनुसार शेती व पशुपालनाचा समन्वय साधला तर शेतकऱ्याला लाभ होईल. देशी गोवंश व पारंपरिक शेती पद्धतीबाबत लोकांचा विश्वास वाढत आहे. भारतीय शेतीची आधुनिक रूपे विकसित करूनच आपण कृषी स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करू शकतो, असेही ते म्हणाले.