छत्रपती संभाजीनगर : ‘कॅबिनेटच्या निर्णयांवर नाराज असाल, तर मग तिथे बसून काय करता? आत राहून त्याच निर्णयांचा विरोध करणे म्हणजे सरळ दुटप्पीपणा. हिंमत असेल तर राजीनामा द्यावा,’ असे म्हणत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भुजबळ यांना फटकारले. बीड येथे ओबीसी मेळाव्यात भुजबळ यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेवर ते बोलत होते.
‘भुजबळांना जामीन मिळाला तो भाजपामुळे. तो जामीन केव्हाही रद्द होऊ शकतो.’ महायुती सरकार जाणीवपूर्वक भुजबळ यांच्याकडून भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका करवून घेत आहे, हा मोठा राजकीय डाव असून, हे सारे ठरवून चालले आहे, असे दानवे म्हणाले. बीड येथील सभेत भुजबळ यांनी थेट विखे पाटील यांच्यावर हल्लाबोल केल्याने महायुतीत खळबळ उडाली.
‘एकमेकांवर हल्ला चढवणारे हेच नेते आतून एकच आहेत, अशी टीका दानवे यांनी केली. भुजबळ हे स्वतःच्या मनाने बोलत आहेत की महायुतीतून ठरवूनच हे सगळे नाट्य रचले जात आहे. विखे पाटील एवढे विषारी असतील तर त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळाच्या टेबलावर बसता कशाला, असेही दानवे म्हणाले.