शिवसेना पक्षाचा सध्या संघर्षाचा काळ सुरू आहे. साधारण १३ महिन्यांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली. जून २०२२ मध्ये शिवसेनेत बंडखोरी झाल्यापासून पक्षात दोन गट पडले आहेत. एकनाथ शिंदे यांनी पक्षातील ४० आमदार आणि १३ खासदारांना बरोबर घेत आधी वेगळा गट बनवला आणि नंतर थेट शिवसेना पक्षावरच दावा केला. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता देत पक्षचिन्हदेखील त्यांनाच दिलं आहे. बाळासाहेबांची शिवसेना असं त्यांच्या पक्षाचं नाव आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव देण्यात आलं आहे.

शिवसेनेचे दोन गट पडल्यापासून ठाकरे गटातून गळती सुरू आहे. ठाकरे गटातील अनेक नेते शिंदे गटात प्रवेश करत आहेत. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेली ठाकरे गटाची ही गळती थांबायचं नाव घेत नाहीये. बंडखोर आमदार आणि खासदारांसह ठाकरे गटाचे अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे सातत्याने शिंदे गटात प्रवेश सुरू आहेत. गेल्या महिन्यात विधान परिषदेच्या आमदार आणि ठाकरे गटाच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी एकनाथ शिंदेंच्या गटात प्रवेश केला. त्यापाठोपाठ विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीदेखील शिंदे गटात प्रवेश केला.

दरम्यान, आता शिवसेनेच्या ठाकरे गटाला छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा धक्का बसला आहे. औरंगाबादच्या (जुनं नाव) माजी महापौरांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या नव्या साथीदारांचं मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पक्षात स्वागत केलं.

हे ही वाचा >> मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले, “मी मुख्यमंत्र्यांना…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकनाथ शिंदे यांनी यासंबंधी एक ट्वीट केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे उबाठा गटाचे माजी महापौर गजानन बारवाल, माजी शाखाप्रमुख सतीश माहोरे, विभागप्रमुख कन्हैया देवतवाल, गुड्डू बन्सीवाल यांनी आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी आमदार संजय शिरसाट, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ उपस्थित होते.