छत्रपती संभाजीनगर : मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसानंतर आता पेरणीला सुरुवात होत असतानाच शेतकऱ्यांना युरिया खताचा तुटवडा भासत आहे. यंदा एकीकडे कापूस पिकाच्या क्षेत्रात घट होत असल्याचे, तर दुसरीकडे मका, सोयाबीन पिकाचे क्षेत्र वाढणार असल्याचे चित्र असून, मका पिकासाठी युरियाची मागणी वाढल्याने तुटवडा भासत आहे. शिवाय काही दिवसांपूर्वी आरसीएफ प्रकल्पही बंद होता, असेही एक कारण कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

अनेक कृषी केंद्रांवर सध्या युरिया खत मिळत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. मुळात खतांच्या मुख्य वितरण केंद्रांवरच युरियाचा तुटवडा निर्माण झाल्याने कृषी सेवा केंद्रांनाही खत मिळत नाही. परिणामी खरेदीसाठी बाजारात आलेल्या शेतकऱ्यांनाही खतांविना परतावे लागत आहे. सध्या युरियाचा खत उपलब्ध नसल्याचे कृषी सेवा केंद्रचालकांकडूनही सांगण्यात आले.

कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना ही युरिया खताची अधिक मागणी असणारे जिल्हे आहेत. त्यात मध्यंतरी आरसीएफ (राष्ट्रीय केमिकल ॲण्ड फर्टिलायझर) हा सरकारी प्रकल्प बंद होता. रेल्वेचे काही नियमही पुरवठा करण्यात अडचणीचे ठरले. आंतरराष्ट्रीय स्तरावरून येणारे (इम्पोर्टेड) खतही बंद आहे. काही कंपन्यांना युरियाचा पुरवठा करा, अशा नोटिसीही पाठवण्यात आल्या आहेत. अशातच पीक पद्धतीतही अचानक बदल झाला. त्यातून युरियाची मागणीही वाढली आहे, असे कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

यंदा दीड लाख मेट्रिक टन खताची मागणी केली होती. १ लाख १२ हजार मे. टन आवंटन (मंजुरी) तर ४९ हजार ५०० मे. टन जूनपर्यंत मिळण्याचा भाग होता. तर ३९ हजार ६०० मे. टन प्रत्यक्ष प्राप्त झाला आहे. सध्या ४ ते ५ गाड्या (रेक) मंजूर झाल्या आहेत. लवकरच परिस्थिती सुरळीत होईल. शेतकऱ्यांनी नॅनो युरियाचाही वापर करावा. परंतु, युरियाचा अधिक वापर हा हानिकारक ठरतो, याकडेही लक्ष द्यावे. – प्रकाश पाटील, कृषी विकास अधिकारी, जि. प., छत्रपती संभाजीनगर.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मे महिन्यापासून रेक लागलेला नाही. त्यामुळे खत उपलब्ध नाही. यापूर्वी आलेले खत संलग्नित कृषी केंद्रांनी घेतले असल्याचे एका वितरकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.