छत्रपती संभाजीनगर : धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यातील नर-मादी धबधब्यापैकी मादी धबधबा अलीकडच्या काळात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर वाहू लागला आहे. नर धबधबा वाहण्याची प्रतीक्षा आहे. मे महिन्यात राज्यात सर्वच भागांत जोरदार पाऊस झाला.
नळदुर्ग परिसरात झालेल्या पावसामुळे बोरी नदीमध्ये पाणी आले. धरणाच्या वरील क्षेत्रात असलेल्या व्होर्टी, गंधोरा, चिकुंद्रा या भागात मोठा पाऊस झाल्यामुळे ऐतिहासिक मादी धबधबा सुरू झाला आहे. जमिनीपासून ९० फूट उंचीवरून धबधब्याचे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी पर्यटक किल्ल्यात दाखल होत आहेत. राज्यातील पर्यटकांचे ऐतिहासिक नळदुर्ग किल्ला हे प्रमुख आकर्षण आहे.
राज्यातील सर्वांत मोठा भुईकोट किल्ला, अशी नळदुर्ग किल्ल्याची ख्याती आहे. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात पुणे-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर सोलापूरपासून ५० किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे.