छत्रपती संभाजीनगर : उद्योजक संतोष लड्डा यांच्या बजाजनगरातील घरात १५ मे रोजी पडलेल्या दरोड्यात साडेपाच किलो सोने व ३२ किलो चांदी चोरून नेल्याप्रकरणाचे धागेदोरे बुधवारी नांदेडशीही असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या गुन्हे शाखेने गुरुवारी सराफा व्यावसायिकासह चौघांना अटक केली आहे. चारही आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्या. जी. डी. गुरनुळे यांना ९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

शेख अबुजर उर्फ शाहीद (वय २३), शेख सोहेल शेख मुस्तफा (२६, रा. दोघेही अंबाजोगाई), शेख शाहरुख शेख रफिक व सराफा व्यावसायिक आशिष जयकुमार बाकलीवाल (वय ४२, दोघेही रा. नांदेड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपी बाकलीवालकडून १९४.०१० ग्रॅम वजनाची सोने लगड जप्त करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली. आरोपीपैकी शाहरूख व अबुजर हे किडुक-मिडूक सोने वितळवून लगड तयार करत असल्याचे शुक्रवारी त्यांना न्यायालयात उभे केले असता वकिलांनी युक्तिवादात सांगितले.

बाकलीवालसोबतचे तीन्ही आरोपी हे मुख्य आरोपी असलेल्या सुरेश गंगणेचे जवळचे साथीदार आहेत. सुरेश गंगणे याने दरोड्यातील त्याच्या वाटेचे सोने पत्नी बबिता व सासऱ्याला दिले. उर्वरीत सोने सुरेशने अंबाजोगाईतील साथीदार शेख सोहेल याच्याकडे दिले. सोहेलने शेख शाहरुख व शेख अबुजर यांच्या मदतीने सराफा व्यावसायिक आशिष बाकलीवाल याला विकल्याचे चौकशीत सांगितले. त्यावरून पोलिसांनी वरील चौघांना बुधवारी ताब्यात घेऊन छत्रपती संभाजीनगरमध्ये आणले. चौकशीत दरोड्याच्या गुन्ह्याशी चौघांचेही धागेदोरे मिळत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुरुवारी रात्री अटक दाखवली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेप्रकरणी आतापर्यंत १६ आरोपी निष्पन्न झाले असून, अमोल खोतकर हा २७ मे रोजी पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाला आहे. तर बाळासाहेब चंद्रकांत इंगोले हा आरोपी उद्योजक संतोष लड्डा यांचा जवळचा मित्र होता, अशी माहितीही तपासात पुढे आली आहे. बाळासाहेब इंगोले हा संतोष लड्डा यांच्या गावाचा म्हणजे अंबाजोगाईचा रहिवासी आहे. शिवाय वर्गमित्र होता. तो २००६ पासून लड्डा यांच्या कंपनीत काम करत होता. डिसेंबर २०२४ मध्ये कंपनी व्यवस्थापकाशी इंगोलेचा वाद होता. या वादातून इंगोले याने व्यवस्थापकाला शिवीगाळ केली होती. याचा बदला म्हणून इंगोलेने दरोड्याचा कट रचल्याचा अंदाज आहे.