छत्रपती संभाजीनगर : धाराशिव जिल्ह्यातील एका तरुणास आरोग्य विभागात नोकरी लावतो म्हणून आठ लाख रुपये घेतले. चार वर्षांनंतरही नोकरी काही लागली नाही. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच धाराशिव शहरातील ३८ वर्षीय युवकाने पोलीस ठाणे गाठून दोघांविरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहोळ तालुक्यातील नरखेड येथील अंकुश देशमुख व मुंबईतील संजय यमाजी साळवे या दोघांनी संगनमत करून धाराशिव तालुक्यातील दत्तात्रय संपत करवर (रा. राघुचीवाडी) यास आरोग्य विभागात नोकरी लावतो, अशी हमी देवून त्याच्याकडे नोकरीच्या कामासाठी आठ लाख दहा हजार रुपयांची मागणी केली. १२ ते ३१ ऑक्टोबर २०२१ या काळात रोख आणि ऑनलाईन स्वरूपात करवर यांनी आठ लाख दहा हजार रुपये दोघांकडे जमा केले. या गोष्टीला आता चार वर्षे उलटली आहेत.
करोना काळात आरोग्य विभागात नोकरीची संधी होती. मात्र, ती आता पैसे देवूनही हुकली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दत्तात्रय करवर यांनी शहर पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गैरप्रकाराचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.