छत्रपती संभाजीनगर-नांदेड : पावसाच्या अधून-मधून कोसळणाऱ्या सरी, त्यात भिजत असतानाही ढोल-ताशांचा गगनभेदी दणदणाट, त्याच्या तालावर पावसात भिजतच ठेका धरणाऱ्या तरुणाईचा अभूतपूर्व उत्साह, बच्चे कंपनीच्या गणपत्ती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला, या घोषणा आणि विसर्जनादरम्यान, भाव दाटून आलेले चेहरे, अशा आनंद आणि गलबलून सोडणाऱ्या वातावरणात लाडक्या गणरायाला मराठवाड्यात निरोप देण्यात आला. यंदा ‘आवाजाच्या भिंती’वर (डिजे) बंदी असल्यामुळे मिरवणुका सुरळीत आणि मध्यरात्रीपर्यंतच चालल्या. यादरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. नांदेडमध्ये मात्र, दोन तरुण वाहून गेले. गाडेगाव येथील योगेश गोविंद उबाळे (वय १७) व बालाजी कैलास उबाळे (१८) हे दोन चुलत भावंडे वाहून गेले असून, त्यांचा शोध रविवारी रात्रीपर्यंत सुरू होता. हे दोघे आसना नदीवर विसर्जनासाठी गेले होते, त्यांच्यासोबत अन्य एक जणही होता, मात्र, त्याला शोधण्यात यश आले.

छत्रपती संभाजीनगर शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत मानाच्या संस्थान गणपतीपासून सुरुवात झाली. सकाळी ११ वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली. संस्थान गणपतीचा रथ ओढण्यासाठी पालकमंत्री संजय शिरसाठ, मंत्री अतुल सावे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, आमदार संजय केणेकर, गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार आदी उपस्थित होते. शहरातील इतर मिरवणुका या रात्री एक वाजेपर्यंत चालल्या असून, यंदा शहरात ८०३ सार्वजनिक मंडळे व १ लाख ६१ हजार घरगुती मूर्तींचे विसर्जन झाले. महानगरपालिकेकडूनही चोख व्यवस्था करण्यात आली होती. सुमारे दीड हजार कर्मचारी तैनात करण्यात आले होते. विसर्जन विहिरी, कृत्रिम तलाव, अशा २१ ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती. ४१ गणेश मूर्ती संकलन केंद्र तयार ठेवण्यात आले होते. याशिवाय कृत्रिम तलावाच्या ठिकाणी अधिकारी, कर्मचारी, आरोग्य कर्मचारी पथक, जीवरक्षक प्रणालीची व्यवस्था करण्यात आली होती. यंदाही गणेश मंडळांकडून सामाजिक देखावे सादर करण्यात आले होते, ते पाहण्यासाठी महिलांसह तरुणाईने गर्दी केली होती.

नांदेडमध्ये पहिल्या टप्प्यात ५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ईदच्या मिरवणुका सोमवारी काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पोलिसांना काहीअंशी दिलासा मिळाला. त्यानंतर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विशेषतः यापूर्वी जिथे अनुचित घटनांची नोंद झाली आहे तेथे पोलिसांनी आपले लक्ष केंद्रित केले. वेगवेगळ्या सार्वजनिक गणेश मंडळांनी उभारलेेले आकर्षक देखावे आकर्षण ठरले. अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी महाप्रसाद, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असे नियोजन केले होते. त्याचा भक्तांनी आस्वाद घेतला. विशेष म्हणजे सकाळपासूनच हा महाप्रसाद सुरू झाला होता.

ध्वनीवर्धकमुक्त मिरवणुका निघाल्याने पारंपरिक पद्धतीने तुरेदार फेटे, गुलालाची उधळण, गणपती बाप्पा मोरयाचा गजर, ढोल-ताशाच्या तालावर नाचत नाचत निघालेल्या मिरवणुका पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. महानगरपालिकेतर्फे शहरातील नावघाट, बंदाघाट, गोवर्धन घाट, आसना, झरी येथे विसर्जनाची व्यवस्था केली होती. निर्माल्य संकलनही एकत्रित झाल्याने रस्त्यावर कचरा पहावयास मिळाला नाही. सर्वच विसर्जन स्थळांवर महानगरपालिकेचे कर्मचारी, जीवरक्षक दल, एनडीआरएफचे पथक, शीघ्रकृती दलाचे जवान तैनात करण्यात आले होते.

यंदाच्या गणेश उत्सवात प्रशासनाने केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत व सांस्कृतिक परंपरा जपत नांदेडकरांनी कृत्रीम तलावात विसर्जन तर केलेच, शिवाय २४.५८६ मे.टन निर्माल्य जमा झाले. ९ हजारांपेक्षा अधिक मूर्ती संकलित झाल्या तर २६ हजार ९५२ मूर्तींचे प्रशासनाने विसर्जन केल्याची माहिती मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी दिली.

शहरातील सर्व गणेश मंडळांच्या मिरवणुका या रात्री १ वाजेपर्यंत चालल्या. या दरम्यान, कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.रत्नाकर नवले, पोलीस उपायुक्त (गुन्हे).