छत्रपती संभाजीनगर : लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथील शेतकरी अंबादास पवार यांचे बैलाच्या जागी स्वतःला जुंपून पिकांची कोळपणी करतानाचे कष्ट समाज माध्यमामुळे समोर आले. त्यानंतर गेल्या सहा दिवसांत रोख मदत, नातवांच्या शिक्षणाची हमी, कर्जाची परतफेड झाली. शनिवारी बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनीही बैलजोडीसोबत रोख पन्नास हजार रुपये व वर्षभर पुरेल एवढा किराणा अशी मदत केली. तसेच सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पवार यांच्या पन्नास हजाराच्या पीककर्जाचा रोख भरणा करून त्यांना बेबाकी प्रमाणपत्र दिले. त्यामुळे पवार यांच्याकडे आता दोन बैलजोड्या झाल्या.
याच दरम्यान शुक्रवारी भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके पाटील यांनी पवार यांच्या नातवांच्या बारावीपर्यंतच्या शिक्षणाची हमी दिली. हाडोळी येथील शेतकरी अंबादास पवार (वय ७५) हे पत्नी मुक्ताबाई यांच्या मदतीने कोळप्याने बैलाच्या जागी स्वतःला जुंपून घेत दरवर्षी रब्बी व खरीप पिकांची कोळपणी करतात. भाऊ वाटणीनंतर त्यांनी बैलजोडी विकली होती. दोन एकर नऊ गुंठे जमिनीतील बैलजोडीने होणारा कोळपणीचा खर्च परवडत नसल्याने ते दहा वर्षांपासून स्वतः कोळपणी करतात. यासाठी त्यांनी टायर ट्युब कोळप्याला बांधून व खांद्याला अडकवून कष्ट सुलभ केले. त्यांची ही कसरत यंदा समाज माध्यमामुळे सर्वांना पाहायला मिळाली. यामुळे सहा दिवसांपासून त्यांना राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे.
शनिवारी आमदार गायकवाड यांनी बैलजोडी, रोख रक्कम व किराणा दिला. त्यापूर्वी त्यांनी पवार दाम्पत्याची पाद्यपूजा करत त्यांच्या कष्टाचा सन्मान केला. नाशिक जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती रवींद्र देवरे यांनी पन्नास हजार रुपये तर कामखेडा (ता. रेणापूर) येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते दिग्विजय प्रकाश पाटील यांनी रोख चाळीस हजाराची मदत केली. सहकारमंत्री पाटील यांनी मागील आठवड्यात पवार यांना संपर्क साधून कर्जफेड करण्याची हमी दिली होती. शनिवारी त्यांनी कर्जाचा भरणा करून विविध कार्यकारी सोसायटीचे बेबाकी प्रमाणपत्र पवार यांना दिले. दहा वर्षांनंतर पवार यांच्याकडे पुन्हा बैलबारदाना आला.