भारतीय राजकीय आणि वैचारिक परंपरांचा काळ चिमटीत पकडून सर्वसामांन्य वाचकापर्यंत तो सोप्या पद्धतीने पोहचविण्यासाठी सातत्याने काम करणारे ज्येष्ठ साहित्यिक व माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे शनिवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास निधन झाले. मृत्यूसमयी ते ८७ वर्षाचे होते. देशाची राजकीय स्थिती यामध्ये हैदराबाद संस्थानातील मराठवाडा समजून घेऊन या भागाचा इतिहास, सामाजिक, राजकीय वास्तव आपल्या लेखनातून मांडणारे चपळगावकर गेल्या काही महिन्यापासून कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन विवाहित कन्या, नातवंडे असा परिवार आहे.

नरेंद्र पुरुषोत्तम चपळगावकर यांचा जन्म १९३८ चा. वडील हैदराबाद स्वातंत्र्य चळवळीतील नेते होते. स्वातंत्र्य चळवळीतील अनेक बारकावे माहीत असणाऱ्या चपळगावकरांनी राजकीय आणि वैचारिक परंपरा हेच लेखनाचे केंद्रस्थान मानले. विधि आणि मराठी या विषयातील पदवी संपादन केल्यानंतर सुरुवातीच्या काळात लातूरच्या दयानंद महाविद्यालयात त्यांनी मराठीचे प्राध्यापक म्हणून तर नंतर छत्रपती संभाजीनगर येथील माणिकचंद्र पहाडे विधि महाविद्यालयातही अध्यापनाचे काम केले. २८ वर्षे वकिली व्यावसाय केल्यानंतर १९ जानेवारी १९९० रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी त्यांची निवड झाली. मराठवाड्यातील साहित्य आणि वाड्मयीन विश्वाला वळण देण्यात न्यायमूर्ती चपळगावकरांचा मोठा वाटा राहिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजहंसचा ‘ श्री. ग. माजगावकर स्मृती ’ हा वैचारिक लेखनासाठी पुरस्कार, मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे जीवन गौरव पुरस्कार ,महाराष्ट्र फाऊंडेशन या संस्थेचा दिलीप चित्रे स्मृती पुरस्कार आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळाचा राम शेवाळकर स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेल्या नरेंद्र चपळगावकर हे वर्धा येथील ९६ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. आपल्या लिखाणातून भारतीय स्वातंत्र्याचा काळ आणि नेतृत्व या विषयीचे त्यांचे चिंतन प्रेरणादायी मानले जाते. कविता, कथा लिखाणाने सुरुवात करणारे नरेंद्र चपळगावकर यांनी आपले वैचारिक लिखाण कधीही दुर्बोध होणार नाही, याची काळजी घेतली. त्यांची एकूण ३६ पुस्तके प्रकाशित झाली होती. यामध्ये तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ, स्वामी रामानंद तीर्थ यांच्या वरील चिरत्रात्मक लिखाण असणारे कर्मयोगी सन्यासी, भाषाविषयक, साहित्य आणि समीक्षा या क्षेत्रातील दीपमाळ, नामदार गोखले यांच्यासह पंडित जवाहरलाल नेहरु व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विषयीचे कमालीचे औत्सुक्य त्यांच्यामध्ये होते. त्यातून त्यांनी नेहरू आणि पटेल यांच्या कार्यकतृत्वाचा मांडलेला आढावा प्रेरणादायी होती. अनंत भालेराव आणि दै. मराठवाडा यांच्याविषयी ते भरभरुन बोलत. त्यांनी अनंत भालेराव यांच्याविषयीचे चरित्र्यात्मक लिखाण केले होते.