छत्रपती संभाजीनगर : बीड जिल्ह्यातील बडतर्फ असलेल्या वादग्रस्त पोलीस अधिकारी रणजित कासले याला आज मध्यरात्रीच्या सुमारास गुजरात पोलिसांनी लातूरमधून ताब्यात घेतले. गुजरात राज्यातील सुरत आणि आजूबाजूच्या परिसरात झालेल्या जबरी घरफोडीप्रकरणी अटक असलेल्या आरोपींकडून कासले याच्याबाबत माहिती मिळाली. आरोपींची मदत करण्याचा ठपका कासले याच्यावर ठेवण्यात आले.
लातूर पोलीस, त्याचबरोबर गुजरात पोलीस यांनी एकत्रित केलेल्या मोहिमेमुळे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रणजित कासले यास गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतले. एमआयडीसी पोलीस ठाण्यातील कागदपत्रांची पूर्तता करून सहा जणांच्या पथकाने कासले यास गुजरात येथील सुरत भागातील पाल पोलीस स्टेशनमध्ये नेल्याचे सांगण्यात आले. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि त्यानंतर वाल्मीक कराड याबाबतच्या अनेक चित्रफिती सोशल मीडियावर कासले याने टाकल्या होत्या. तसेच मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांवर थेट आरोप केले होते. याप्रकरणी कासले यास अटकही करण्यात आली होती. वेगवेगळ्या प्रकरणी आत्तापर्यंत सात गुन्हे कासले याच्यावर दाखल आहेत. गुजरात पोलिसांचा हा आठवा गुन्हा असल्याचे सांगण्यात आले.