छत्रपती संभाजीनगर : अतिवृष्टीमुळे नदीकाठचा ऊस झोपला. विविध जिल्ह्यांत मजुरांऐवजी हार्वेस्टरची संख्या वाढवण्यात आली. अनेक कारखाने तोडणीसाठी यंत्र वापरत असल्याने बीड जिल्ह्यातील मजुरांना तामिळनाडू व कर्नाटकात अधिक संख्येने जावे लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.तामिळनाडूमध्ये जाणाऱ्या मजुराचे दीड महिन्यापूर्वीच स्थलांतर झाले आहे. तामिळनाडूमध्ये प्रतिटन ऊसतोडणीसाठी ५०० ते ५१५ रुपयांपर्यंत मजुरी पडते.
कर्नाटकमधील कारखान्यानेही प्रतिटन ३६४ रुपयांची वाढीव मागणी मान्य केली आहे. त्यामुळे या वेळी कर्नाटकातील कारखाना क्षेत्रातील ऊसतोडणीसाठी अधिक लोक जात असल्याचे दिसून येत आहे. बहुतांश जणांच्या शेतात पुरेसे काम नाही. त्यामुळे कोयता घेऊन मजुरी केली तर एक ते दीड लाख रुपये मिळतील म्हणून स्थलांतर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ऊसतोडणी मुकादम कृष्णा तिडके म्हणाले, ‘या वर्षी अतिवृष्टीच्या संकटामुळे २० जोड्या मजुरांच्या वाढल्या आहेत. ही स्थिती जिल्हाभर सर्वत्र आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातून या वर्षी स्थलांतर वाढेल, असा दावा केला जात आहे.
शेतकरी संघटनेचे कालिदास आपेट म्हणाले, ‘राज्यात कापसाचे पीक कमी होत गेले आणि वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यातूनही ऊसतोडणीसाठी जाऊ लागली आहे. चार महिन्यांत बऱ्यापैकी पैसे मिळतात. त्यामुळे कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये जाण्यासाठी मजुरांची संख्या वाढली. दुसरीकडे हार्वेस्टरची संख्या वाढली असल्याने महाराष्ट्रात मात्र मजुरांची संख्या कमी होईल, असे चित्र दिसून येत आहे.’
राज्यात हार्वेस्टरची संख्या प्रत्येक महिन्यात वाढू लागली आहे. राज्य सरकारकडून अनुदान मिळणार असून ९०० हून अधिक हार्वेस्टर खरेदी होणार आहेत. आतापर्यंत अनुदानावरची २६३ ऊसतोडणी यंत्र आली आहेत. त्यामुळे जवळचे काम कमी आणि लांबवर जाऊन ताेडणीचे काम करावे लागणार आहे. अतिवृष्टीमुळे येत्या काही दिवसांत रोजगार हमी योजनेतून कामे उपलब्ध झाली नाही तर तोडणी करणाऱ्या मजुरांना कर्नाटकात जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही.