नांदेड : माजी मंत्री तथा उबाठा गटाचे शिवसेना नेते आमदार रवींद्र वायकर, जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांना बुधवारी मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. देगलूर शहरात उभय नेत्यांचा ताफा आंदोलकांनी अडविला. त्यामुळे वायकर व थोरात यांनी नियोजित मेळाव्यासाठी खुतमापूर येथे जाणे टाळले. ते दोघेही देगलूरहून माघारी परतले. आमदार रवींद्र वायकर, जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या उपस्थितीत देगलूर तालुक्यातील खुतमापूर येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. देगलूर शहरातून शिवसेनेच्या वतीने भव्य रॅली काढत कार्यकर्ते खुतमापुरकडे रवाना होत असताना अण्णाभाऊ साठे चौकात तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी अगोदर मराठा आरक्षण, नंतरच राजकीय सभा, अशा अनेक घोषणा देत शिवसेनेचा ताफा अडवला. यावेळी रवींद्र वायकर, बबनराव थोरात हे मराठा समाजाच्या भावना ओळखून गाडीतून बाहेर उतरले. आम्हीही आपल्या लढ्यात सहभागी आहोत, असे या दोन्ही नेत्यांनी सांगितले. तसेच मेळाव्याला न जाता ते तेथून आल्यापावली नायगावकडे रवाना झाले. हेही वाचा : अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे शंभरीपार गुन्हे; गुन्ह्यांशी संबंधित पाेलिसांच्या वार्षिक अहवालात माहिती एकनाथ पवारांनी मेळावा घेतला आमदार वायकर व थोरात हे नायगावकडे परत गेल्यानंतर काही वेळाने एकनाथ पवार व काही प्रमुख पदाधिकारी मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचले. खुतमापूर येथे मेळावा पार पडल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी विधानसभा मतदारसंघ प्रमुख सुनिल एबंडवार, शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील आदींसह प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.