छत्रपती संभाजीनगर : जायकवाडी धरणाच्या क्षेत्रात तसेच अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यात शनिवारी रात्रभर पाऊस झाल्याने पूरस्थिती आणखी गंभीर झाली आहे. धरणातून सध्या दोन लाख २६ हजार प्रतिसेंकद घनफूट वेगाने पाणी सोडले आहे. त्यामुळे पैठण शहरात पाणी येऊ शकते, असे कळविण्यात आले आहे. पैठण तालुक्यातील नदी काठच्या १३ गावातील नागरिकांना हलवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी निलिमा बाफना यांच्यासह अधिकारी गावकऱ्यांना नागरिकांनी सुरक्षितस्थळी जावे यासाठी प्रयत्न करत आहे.
२००६ मध्ये जायकवाडीतून दोन लाख क्युसेक वेगाने पाणी आल्यानंतर अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. तो जुना अनुभव लक्षात घेऊन कारवाई करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. पैठण शहरातील सखल भागातील नागरिकांनाही सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू करण्यात आले असून आमदार विलास भुमरे हेही या कामात असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील दोन गावात पाणी घुसले. नारायणपूर आणि गोपाळवाडी येथील नागरिकांना बाहेर काढण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. तर वैजापूर शहरातील २० कुटुंबाना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. जायवाडी धरणातून नियमित व आपतकालीन दरवाज्यातून एक लाख २५ हजार विसर्ग करण्यात आला आहे. पुढे पाण्याची आवक अशीच राहिली तर दुपारपर्यंत पैठण शहरातही पाणी येऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे.
माजलगाव धरणातूनही पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने बीड जिल्ह्यातील अनेक गावातील पूरस्थितीत वाढ झाली आहे. पाणी शेतशिवारामध्ये पसरते आहे. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले, वैजापूरमधील दोन गावातील स्थिती लक्षात घेऊन काही कुटुंबाना सुरक्षित स्थळी आणले आहे. प्रशाासन सतर्क आहे. काेणीही घाबरू नये, आवश्यकता वाटली की प्रशासनाशी संपर्क साधवा.’
१९८ मंडलात अतिवृष्टी
मराठवाड्यात गेल्या २४ तासात १९८ मंडलात अतिवृष्टी नोंदविण्यात आली आहे. सकाळी सहा वाजता पावसाचा जोर अधिक होता. विविध भागात झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरणात दोन लाख ३० हजार क्युसेक वेगाने पाणी येऊ शकते असा अंदाज असल्याने पूरपरिस्थिती अजून गंभीर होईल असे सांगण्यात येत आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनीही पूरस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक त्या भागातून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे आदेश दिले आहेत.