छत्रपती संभाजीनगर : बीड पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर परळीतील महादेव मुंडे यांच्या खुनाच्या तपासाकडे पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत त्यांच्या कुटुंबीयांनी बुधवारी दुपारी विष प्राशन करून आणि अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

महादेव मुंडे यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधीक्षक नवनीत काॅवत यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. अधीक्षकांसोबत हत्येच्या तपासाबाबत सकारात्मक चर्चाही झाली. परंतु बाहेर येताच ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्राशन केले. त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून पोलिसांनी नजीकच असलेल्या जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवले.

तत्पूर्वी महादेव मुंडे यांचे कुटुंबीय वेगळे पाऊल उचलण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस त्यांनी जवळ बाळगलेल्या साहित्याचा अंदाज घेत होते. त्यातून पोलीस व मुंडे कुटुंबीयांमध्ये झटापटही झाली. मुंडे कुटुंबातील अन्य सदस्यांनी ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांनी तत्काळ रोखल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

महादेव मुंडे यांची २० ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी परळीत निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येशीही वाल्मीक कराड यांचे नाव जोडले जात आहे. मात्र, याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे तपास देऊन आरोपींचा तत्काळ शोध लावून वेगवेगळे गुन्हे दाखल झाले. त्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आपल्या पतीच्या खुनाचा तपास करावा, अशी मागणी लावून धरली. ज्ञानेश्वरी मुंडे व त्यांच्या कुटुंबीयांची मध्यंतरी भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही भेट घेऊन त्यांना महादेव मुंडे यांच्या खुनाचा तपास योग्य पद्धतीने व्हावा आणि आरोपींना अटक करावी, अशी मागणी केली होती. या प्रकरणानंतर सुरुवातीला रीतसर गुन्हाही दाखल झालेला नव्हता.

मागील आठवड्यात वाल्मीक कराडचा पूर्वाश्रमीचा सहकारी बाळा बांगर याने बीडमध्ये एक पत्रकार परिषद घेऊन कराडवर हत्येच्या दृष्टीने आरोप करत हत्या करणाऱ्यांची माहिती आपल्याकडे असल्याचे सांगितले होते. दोन दिवसांपूर्वी बाळा बांगरने परळीत जाऊन ज्ञानेश्वरी मुंडे आणि कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्यामध्ये आरोपी कोण आहेत, याची चर्चा झाल्याची माहिती आहे. यानंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी महादेव मुंडेंच्या हत्येचा तपास तातडीने करून आरोपींना अटक करा अन्यथा आत्मदहन करू, असा इशारा दिला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस अधीक्षक नवनीत काॅवत आणि ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यात सकाळी सकारात्मक चर्चा झाली. त्यांना तपासाची माहिती देण्यात आली. या प्रकरणाचा तपास बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे. तपास जवळपास पूर्ण होत आलेला असून, लवकरच आरोपींना अटक होऊ शकते. – सचिन इंगळे, जनसंपर्क अधिकारी, बीड पोलीस अधीक्षक कार्यालय.