छत्रपती संभाजीनगर : माजी राज्यमंत्री व गंगापूरचे माजी आमदार अशोक पाटील डोणगावकर यांचे शनिवारी ११.५७ मिनिटानी निधन झाले. ते गेली आठ वर्षे आजारी होते. सरपंच ते राज्यमंत्री असा राजकीय प्रवास करणारे अशोक पाटील डोणगावकर यांनी कॉग्रेस पक्षाचे झेंडा उंचावला. पुढे अपक्षांचे ते नेते होते. मितभाषी अशी ओळख असणाऱ्या डोणगावर यांच्यावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
गंगापूर तालुक्यातील डोणगाव येथे १९४५ साली जन्मलेल्या अशोक पाटील यांनी १९७७ मध्ये १९८० या कालावधीमध्ये गावचे सरपंच म्हणून नेतृत्व केले. १९९५ ते ९७ या कालावधी मध्ये राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले. गंगापूर तालुक्यात भगिरथी शिक्षण संस्था व मुक्तेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते. वाळुज गटातून ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून ते निवडून आले होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि भूविका बॅकेचे सचालक म्हणून त्यांनी काम केले होते. १९९५ मध्ये त्यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये अपक्ष निवडणूक लढवली होती. १९८३ मध्ये त्यांनी गंगापूरमध्ये मुलींची शाळा काढली होती. गंगापूर तालुक्याच्या विकासात त्यांचे मोठे योगदान होते.
१९९५ मध्ये शिवसेनाप्रमूख बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर अपक्षाची बाजू मांडणारे नेते अशी अशोक पाटील डोणगावकर यांची ओळख होती. मराठवाड्यातील अनेक प्रश्नांवर त्यांनी आवाज उठवला. छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर यांचे ते वडील होत.