छत्रपती संभाजीनगर – येथील पडेगाव भागातील सैन्य दलाच्या कार्यालयापासून काही अंतरावरील पाच एकरमध्ये महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील पहिली एनसीसी अकादमी उभारण्यात येत असून, या सात मजली इमारत बांधकामाचे भूमिपूजन शनिवारी राष्ट्रवादीचे नेते (अजित पवार) तथा राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते पार पडले.

या कार्यक्रमास महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक विवेक त्यागी यांच्यासह सैन्य दलातील उच्च पदस्थ अधिकारी, एमजीएमचे कुलगुरू डाॅ. सपकाळ आदी उपस्थित होते. परंतु, छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाठ, शहरातील अन्य एक मंत्री, भाजपचे नेते अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे यांनी मात्र या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती.

मंत्री शिरसाठ, सावे यांच्यासह काँग्रेसचे खासदार डाॅ. कल्याण काळे, माजी केंद्रीयमंत्री डाॅ. भागवत कराड, भाजपचे आमदार संजय केणेकर, प्रशांत बंब, अनुराधा चव्हाण यांच्यासह शिवसेनेचे (शिंदे) प्रदीप जैस्वाल, अब्दुल सत्तार, संजना जाधव, विलास भुमरे, राष्ट्रवादीचे (अजित पवार) सतीश चव्हाण, विक्रम काळे या आमदारांनाही कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले होते.

परंतु, ते का उपस्थित राहिले नाहीत, याची माहिती नाही, असे राष्ट्रीय छात्र सेना अकादमीच्या काही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. १२७ काेटी रुपये खर्चातून उभारण्यात येणाऱ्या छावा एनसीसी अकादमी इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाणही फिरकल्याचे दिसले नाही. तेही का उपस्थित राहिले नाहीत याविषयी विचारले असता कार्यक्रमस्थळावरील अधिकाऱ्यांकडून कानावर हात ठेवण्यात आले. एनसीसीच्या विद्यार्थ्यांना देशाचे सुजान, शिस्तप्रिय नागरिक म्हणून घडवण्यासाठी राज्यातील पहिली छावा अकादमी येथे उभारण्यात येत आहे.

स्वबळाची भाषा कार्यकर्त्यांच्या मतानुसार

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना महायुती म्हणूनच सामोरे जाण्याचा एक मतप्रवाह प्रत्येक घटक पक्षात आहे. शक्यतो महायुती म्हणूनच लढावे, असा एक विचार असला तरी स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहून आणि कार्यकर्त्यांचे मत जाणूनच निर्णय घेतला जाईल. स्वबळाची भाषा ही कार्यकर्त्यांच्या मतानुसार केली जाते, असे राज्याचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.

मंत्री कोकाटे यांनी कृषिमंत्रीपद गेल्याचे वाईट वाटत असल्याचे सांगत आता ६५ टक्के युवा वर्ग असलेल्या देशातील महाराष्ट्रासारख्या राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री पद भूषवायला मिळते, याचाही आनंद आहे, असे सांगितले. अतिवृष्टीग्रस्तांना दिवाळीनंतरही मदत मिळाली नाही, याकडे लक्ष वेधले असता कोकाटे यांनी प्रशासनाकडे बोट दाखवले.