नांदेड : यंदाचा पावसाळा सुरू होऊन एक महिना लोटला असून, महायुतीतील घटक पक्षांचे शत-प्रतिशत लोकप्रतिनिधी जिल्ह्यात असतानाही पीक कर्जाच्या बाबतीत जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांनी हात आखडता घेतला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत उद्दिष्टाच्या केवळ ५० टक्के कर्ज वितरण झाले असल्याची चिंताजनक बाब भाजपच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी शुक्रवारी विधानसभेमध्ये मांडली.

खरीप हंगामासाठी नांदेड जिल्ह्यात १ हजार ८५० कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते. विधानसभेमध्ये पीक कर्ज वितरणाचा मुद्दा मांडताना आमदार श्रीजया चव्हाण यांनी संपूर्ण आकडेवारीच सादर केली. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ४४५ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करून १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण केले. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने आतापर्यंत २५० कोटींचे वितरण करून ५७ टक्के उद्दिष्ट गाठले. इतर बँकांनी केवळ २१ टक्केच कर्जवाटप केल्याची बाब आमदार चव्हाण यांनी नमूद केली.

नांदेड जिल्ह्यात मे महिन्यात, तसेच ९ व १० जून दरम्यान अवकाळी आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे वेगवेगळ्या भागांतील फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शेतकरीवर्ग अडचणीत आलेला असताना बँकांकडून कर्ज वितरणाच्या बाबतीत अनास्था दिसत असल्यामुळे शेतकऱ्यांना सावकाराकडे जावे लागत आहेे. याकडे आ. चव्हाण यांनी सहकार आणि कृषिमंत्र्यांचे लक्ष वेधले. शेतकऱ्यांना सावरण्यासाठी आवश्यक ते कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली.