KYC Mandatory For Flood Victims Help: मराठवाड्यातील पुरामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी १५०० काेटी रुपयांपेक्षा अधिकचा निधी प्राप्त झाला असला तरी ही रक्कम मिळविण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने बँकेत जाऊन ‘ केवायसी ’ करुन ओळख पटवून देणे आवश्यक आहे. पंचनामा केल्यानंतर शेतकऱ्यांच्या याद्या तयार केल्या तरी रक्कम पदरी पाडून घेण्यासाठी ‘ केवायसी’ करणे आवश्यक असल्याची माहिती विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिली. केवळ एवढेच नाही तातडीच्या मदतीमध्ये पूरग्रस्तांना तीन किलो डाळ देण्याचेही आदेश आहेत. मात्र, जिल्हा पुरवठा विभागात सध्या डाळच उपलब्ध नाही.
मराठवाड्यातील पुरामध्ये शेतीचे नुकसान झालेल्या ३१ लाख ९८ हेक्टरावरचे पंचनामे पूर्ण झाले असून हे प्रमाण ८१ टक्के एवढे आहे. ३६ लाख ८८ हजार८४५ शेतकरी बाधित असून या प्रत्येक शेतकऱ्याल बँकेत जाऊन ‘ केवायसी’ करणे आवश्यक आहे. नदीकाठच्या बँकामध्ये सध्या वीज पुरवठाही खंडित आहे. अनेक बँकांमध्ये इंटरनेट सुविधाही विस्कळीत आहे. त्यामुळे मदत कशी मिळणार असा प्रश्न विभागीय आयुक्तांना विचारला असता इंटरसुविधांबाबत कोणतीही तक्रार आलेली नाही. मात्र, वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. सुरक्षित स्थळी हलविण्यात आलेल्या प्रत्येक कुटुंबास दहा किलो गहू, तेवढाच तांदूळ देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गहू आणि तांदूळ पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. पण डाळ उपलब्ध नसल्याने त्याची खरेदी करावी लागणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातून ५.५६ मेट्रीक टन डाळ लागेल असे कळविण्यात आले आहे. जर स्थानिक पातळी डाळ खरेदीची परवानगी मिळाली तर लवकरच ही प्रक्रिया केली जाईल असे जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी सांगितले. केवळ डाळच नाही तर घरी गेल्यावर स्वयंपाक शिजविण्यासाठी रॉकेलही देण्याच्या सूचना आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नऊ हजार लिटर केरोसिन विकत घ्यावे लागणार आहे. ही मागणीही नोंदविण्यात आली आहे.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ‘केवायसी’च्या अट पूर्ण केल्यानंतरही काही बँका ही रक्कम कर्जखाती वळती करुन घेऊ शकतात. काही बँकांनी खात्यात रक्कम जमा झाली की ती कर्ज खाती वर्ग करुन घेण्याची पद्धत ठरवून घेतली आहे. त्याची संगणकीय कार्यपद्धतीच तशी आहे. त्यामुळे ही रक्कम वळती करुन घेऊ नये असा अर्जही पूरग्रस्तास बँकेकडे करावा लागणार आहे.