छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील तब्बल १९६ मंडळांमध्ये तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ५८ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पावसाने पुन्हा झोडपल्याने छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यातही दाणादाण उडाली असून, अनेक वसाहतींमधील घरांमध्ये पाणी शिरले, तर नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले. लक्ष्मी कॉलनीतील पूल तुटल्याने नागरिकांचा संपर्क तुटला. जिल्ह्यातील ३५४ नागरिकांना सुखरूप बाहेर काढले असून, कन्नड तालुक्यातील ब्राह्मणी नदीत मदन झब्बू राठोड (वय ५५) वाहून गेले असून शोधमोहीम सुरू होती.

शहरात मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांच्यासह अग्निशमन दलाचे जवान, झोन कार्यालयाचे अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही रस्त्यावर उतरून मदतकार्यात सहभागी व्हावे लागले. हर्सूल तलाव ओसंडून वाहू लागला असून खाम आणि सुखना नदीला पूर आला आहे. शहरातील जालाननगर येथील गौरव रेसिडेन्सी, राहुलनगरातील गल्लीनंबर एक, रेवती सोसायटी, सातारा परिसरातील पाडुरंग कॉलनी, विठ्ठल कॉलनी, आनंद कॉलनीसह अनेक वसाहतींना पाण्याचा वेढा पडला. नक्षत्रवाडी आणि जळगाव रोडवरील दोन झाडे पडली. शहरातील पाच मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली.

जायकवाडी धरणातून सध्या दोन लाख २६ हजार प्रतिसेकंद घनफूट वेगाने पाणी सोडले असून, त्यामुळे पैठण शहरात पाणी येऊ शकते, असे कळविण्यात आले आहे. पैठण तालुक्यातील नदीकाठच्या १३ गावांतील नागरिकांना हलवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वैजापूर तालुक्यातील दोन गावांत पाणी घुसले. नारायणपूर आणि गोपाळवाडी येथील नागरिकांना व वैजापूर शहरातील २० कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले, वैजापूरमधील दोन गावांतील स्थिती लक्षात घेऊन काही कुटुंबांना सुरक्षित स्थळी आणले आहे. प्रशासन सतर्क आहे. काेणीही घाबरू नये, आवश्यकता वाटली की प्रशासनाशी संपर्क साधवा.

सोयगाव तालुक्यातील बोरमाळ तांड्यावरील ६ शेळ्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. खुलताबादमधील बाजारसावंगी येथे ६, काटशिवरी फाटा येथे ३, भिवगावमध्ये २७ व बाबुळगाव येथे १७ नागरिक पुरात अडकले होते. या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. वैजापूर नगरपरिषद क्षेत्रात २५० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. कन्नड तालुक्यात अंतापूर येथे ४, देवगाव रंगारी येथे ६ तर गंगापूर तालुक्यात अमळनेर येथील २२ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

लातूरमधील ६८८ नागरिक सुरक्षितस्थळी

लातूर जिल्ह्यातील एकूण ६८८ नागरिक सुरक्षितस्थळी बाहेर काढण्यात आले. चाकूरमधील घरांमध्ये पाणी शिरले होते. ५७ नागरिकांना, जळकोटमधील ४०० नागरिकांना वाढवणा कॅम्पमध्ये ठेवण्यात आले. शिरूर अनंतपाळ येथील १२५ तर लातूरजवळील वासनगावमधील रामगिरीनगरातील ४० नागरिकांना व अहमदपूर येथील तीन मजुरांसह ६६ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. लातूरमधील चार मंडळांमध्ये तर धाराशिवमधील सात मंडळांमध्ये रविवारी सकाळी अतिवृष्टीची नोंद झाली.