छत्रपती संभाजीनगर : पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे व त्यांचे बंधू माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांच्यात सध्या संस्थात्मक निवडणुकीत ‘सामंजस्य’ राजकारण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. एक तप परस्परांबद्दल टोकाची विरोधी भूमिका बजावलेल्या दोन्ही भावंडांमध्ये वैद्यनाथ बँकेच्या निमित्ताने होणाऱ्या राजकारणाची परळी विधानसभा मतदारसंघात चर्चा होत आहे. राज्यात भाजपने अजित पवार यांना शिवसेनेसोबतच्या महायुतीत घेऊन राजकारणाचे प्रारुपच बदलून टाकले. परस्परांचे कट्टर विरोधक दोन पक्ष सत्तेमध्ये एकत्र बसल्याने राज्याच्या राजकारणाचे समीकरण बदलून गेले.
वरिष्ठ स्तरावरील नेतेच एकत्र आल्याने गावपातळीवरील कार्यकर्ते, पदाधिकारीही मने जुळत नसतानाही एकत्र राहू-फिरू लागले. त्यामुळे भावा-बहिणीचे नाते असून, दीर्घकाळ परस्परांचे कट्टर विरोधक राहिलेल्या मुंडे भावंडांनीही सामंजस्याने पावले टाकण्यास सुरुवात केली. कौटुंबिक सुख-दु:खे सोडली तर दोन्ही भावंडे परळीमधील प्रत्येक निवडणुकीत परस्परांविरोधात पॅनेल, उमेदवार उभे करून शह-काटशहाचे राजकारण करताना दिसत होते.
वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, वैद्यनाथ महाविद्यालय व आता वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत दोन्ही भावंडांनी विरोधाच्या राजकारणाची कास सोडून सामंजस्याने आपआपल्या समर्थकांना संधी देऊन वर्णी लावत असल्याचे चित्र आहे.
सध्या वैद्यनाथ बँकेची निवडणूक गाजत आहे. बँकेवर आतापर्यंत पंकजा मुंडे यांचेच वर्चस्व राहिलेले आहे. ही संस्था पुन्हा आपल्याच ताब्यात राहण्यासाठी पंकजा मुंडे सध्या ‘लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनेल’च्या प्रचारार्थ परळीसह जिल्ह्यातील अनेक भागांत फिरत असून, पाठची बहीण तथा माजी खासदार डाॅ. प्रीतम मुंडे यांनाही त्यांनी निवडणुकीत उतरवले आहे. सर्वांत धाकटी बहीण यशश्री यांनाही एक पर्यायी अर्ज भरून पुढे आणण्याचा प्रयत्न झाला. परंतु, ऐनवेळी यशश्री मुंडे यांचा अर्ज माघारी घेण्यात आला. त्यातून धाकटी बहीणही संस्थात्मक राजकारणातून पुन्हा एकदा पुढे येण्याची चर्चा मागे पडली. यापूर्वी यशश्री मुंडे या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात संचालक राहिलेल्या आहेत.
२०२३ मध्ये झालेल्या कारखान्याच्या निवडणुकीत सामोपचाराने पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या तीन समर्थकांची संचालकपदावर वर्णी लावली होती. त्यात एक कुटुंबातीलच सदस्य होता. वैद्यनाथ महाविद्यालयाची निवडणूक आणि प्राचार्यपदावरूनही दोन्ही भावंडांमध्ये राजकारण पेटलेले असताना राज्यातील घडामोडींनंतर तेथेही समेट घडून आला. अखेर राजीनामा दिलेल्या प्राचार्यांची पुन्हा त्याच पदावर पुनर्स्थापना करण्यात आली. त्यामागेही दोघांमधील ‘सामंजस्या’चेच राजकारण असल्याचे सांगितले जात आहे.
आताही बँकेच्या निवडणुकीत धनंजय मुंडे यांचे तीन समर्थक पंकजा मुंडे या संचालक म्हणून घेत असल्याची चर्चा असून, त्यातून बँकेवर पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करण्याच्या दृष्टीने टाकलेले पाऊल मानले जात आहे. बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) राजेभाऊ फड हे त्यांचे ‘परिवर्तन पॅनेल’ उभे करून दोन्ही भावंडांच्या राजकारणाला विरोधक म्हणून प्रतिमा निर्माण करताना दिसत आहेत.