औरंगाबाद : पावसाचा जोर उत्तर भारतात वाढत असून कोकण किनारपट्टी, मुंबई व इगतपुरीचा भाग वगळता अन्यत्र पुढील दहा दिवस जोरदार पावसाची शक्यता कमीच वर्तवण्यात येत आहे. नाशिक, अहमदनगर भागातही जेमतेम पाऊस राहणार असल्याने जायकवाडीत पाणी येण्याचाही प्रश्न नसल्याचे हवामान विभागातील तज्ज्ञांचे मत आहे.

औरंगाबादमध्ये मागील काही दिवसांपासून दररोज ढगाळ वातावरण असले तरी दिवसभरात एखाद्या भागात हलका, मध्यम स्वरूपाचा सडाका बरसून पाऊस विश्रांती घेत आहे. मात्र, त्यामुळे शेतीत तण अधिक माजत असून शेतकऱ्यांना फवारणीसाठी अधिकचा खर्च करावा लागत आहे. शेतकरी विश्वंभर हाके यांनी सांगितले,की फवारणीसाठी दीड हजार रुपये खर्च करावे लागत असून मजूरही मिळत नाहीत. शिवाय मजुरीही २५० ते ४०० रुपये द्यावी लागत आहे. म्हणजे फवारणीसाठी २ हजार रुपये शेतकऱ्यांना खर्च करावे लागत आहेत. एमजीएमच्या एपीजे अंतराळ व खगोल विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले,की पुढील साधारण दहा दिवसांत पावसाचा जोर मराठवाडा व अन्य काही भागात कमीच राहणार आहे. सध्या पावसाचा जोर उत्तर भारतात आहे. महाराष्ट्रात कोकण किनारपट्टी, मुंबई, इगतपुरी भागात पाऊस चांगला राहील. मात्र, अन्यत्र पाऊस हलकाच राहील.