छत्रपती संभाजीनगर : राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमध्ये ‘आरोग्यसेवक ५० टक्के – हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी’ या (पुरुष) अडीच हजारांवर पदांची भरती सध्या सुरू असून, बहुतांश जिल्ह्यांत पारदर्शक प्रक्रिया पार पाडली जात असताना छत्रपती संभाजीनगर जि. प. कडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतरिम यादीत आलेल्या ११ उमेदवारांच्या नावावरून गोंधळ निर्माण झाल्याचा आक्षेप नोंदवण्यात आला आहे. ही नावे पदांच्या मूळ जाहिरातीतील नियम १७.१६ चा भंग करून म्हणजे नियमबाह्य पद्धतीने समाविष्ट केल्याचा तो आक्षेप आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील ५७ हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी पदांसाठी जून २०२४ मध्ये आयबीपीएसमार्फत परीक्षा घेण्यात आली. ८ ऑगस्ट २०२४ रोजी निकाल, नंतर कागदपत्रे पडताळणीची प्रक्रिया पार पडली. दि. ७ मे २०२५ रोजी अंतरिम यादी प्रसिद्ध करण्यात आली. ९ मे रोजी ५७ पैकी ४६ उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली. उर्वरित ११ उमेदवारांची कागदपत्रे पडताळणीसाठी पाठवण्यात आली. या पडताळणीसाठी सहायक संचालक आरोग्य सेवा (हिवताप) यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली.
परंतु मुळात या पदांच्या भरतीच्या जाहिरातीतील १७.१६ क्रमांकाच्या सूचनेत जे उमेदवार कागदपत्र छाननीच्या वेळी मूळ कागदपत्रे दर्शविण्यास असमर्थ ठरतील, असे उमेदवार अंतिम निवडीस पात्र राहणार नाहीत, याची नोंद घ्यावी, असे स्पष्ट नमूद असतानाही पुन्हा त्यांना पडताळणीची संधी देण्याला आक्षेप घेण्यात आला आहे. या नियमानुसार पुन्हा कागदपत्र पडताळणीची संधी देणे हा नियमभंग असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
यातील ११ पैकी दोनच उमेदवारांची कागदपत्रे कार्यालयाकडे जमा झालेली नाहीत, असे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून स्पष्टीकरण देण्यात आले असल्याचा दावा काही उमेदवारांनी केला आहे. तर, नऊ उमेदवारांपैकी दोन जणांचा अहवाल येणे बाकी असून, त्यातील उर्वरित सातपैकी सहा उमेदवार अपात्र, तर एक पात्र ठरला. अपात्र सहापैकी तीन उमेदवारांच्या कागदपत्रांची फेरपडताळणी करण्यात येत आहे. त्यासाठी ती पडताळणी समितीकडे पाठवण्यात आली आहेत. एक उमेदवार आठ महिन्यांनंतरही हंगामी फवारणी अनुभव प्रमाणपत्र जमा करत नाही, त्यानंतरही त्याच्या कागदपत्रांची पडताळणी होते, हा सर्व प्रकार नियमबाह्य असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
एखाद्या उमेदवाराला नियुक्ती दिली आणि त्याच्या कागदपत्रांमध्ये काही चुकीच्या बाबी आढळल्या, तर ती नियुक्ती रद्दही करता येते. त्या अर्थाचे म्हणणे मुद्रांकावर लेखी स्वरूपातून घेतले जाते. १७.१६ चा नियम जाहिरातीत असला तरी काही मुद्द्यांवर संबंधित विभागाला अधिकार असतात. – वासुदेव साळुंके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.
जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अभय धानोरकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आरोग्यसेवक ५० टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी पदांच्या भरती विषयावर आपण एका दूरचित्रसंवादानंतर प्रतिक्रिया देऊ, असे सांगितले. मात्र, त्यानंतर डाॅ. धानोरकर यांच्याशी संवाद होऊ शकला नाही.