छत्रपती संभाजीनगर : नाथ व्हॅली शाळा ते कांचनवाडी चौक दरम्यान ३६ मीटर रस्ता असून, या रस्त्याच्या गट नंबर १० मधील औकाफ बोर्डच्या जागेवर अनधिकृत बांधकाम करून टोलेजंग इमारती उभारल्या आहेत. या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी मनपाचे पथक आज शनिवारी मोजणी करून रेखांकनासाठी गेले असता नागरिकांनी मोजणीला विरोध करत रास्ता रोको आंदोलन केले. मोजणीपथकाला मोजणी व रेखांकन करू न देता परत पाठवले.
नाथ व्हॅली स्कूल ते कांचनवाडी चौक हा ३६ मीटर रस्ता २००१ च्या मंजूर विकास आराखड्यात आहे. परंतु, या भागातील पुढाऱ्यांनी स्वत: उखळ पांढरे करून घेण्यासाठी गोरगरिबांना औकाफ बोर्डाच्या जागेवर अतिक्रमण करायला लावले. या भागात आता टोलेजंग इमारती उभ्या आहेत. मुख्य रस्त्यापासून साधारणपणे ७०० मीटरपर्यंत, गट नंबर दहामध्ये ३६ मीटर रस्त्याच्या जागेवरच अतिक्रमण झाले. अतिक्रमण होऊनदेखील त्याकडे दुर्लक्ष झाले.
या भागात राष्ट्रीय विधी विद्यापीठ सुरू झाले आहे. या विद्यापीठात मार्गदर्शन करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती, न्यायमूर्ती, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, केंद्र व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी वेळोवेळी येतात. या रस्त्यानेच त्यांना विद्यापीठात यावे-जावे लागते. वाहनांचा ताफा असल्यामुळे कधी कधी रस्त्यात वाहतूक ठप्प होते. त्यामुळे हा रस्ता मोठा करण्याचा निर्णय महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी घेतला.
हा रस्ता ३६ मीटर रुंद करण्याचे ठरविण्यात आले. या रस्त्यावर कांचनवाडीच्या मुख्य चौकात अतिक्रमण करून दुकाने थाटण्यात आली आहेत. एका बाजूने रस्त्याच्या ७०० मीटर अंतरापर्यंत रस्त्याच्या जागेतच गट नंबर दहामध्ये औकाफ बोर्डाच्या जागेवर अनधिकृत बांधकामे करून अतिक्रमण केले आहे. या रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार होते. आम्हाला जागेचा मोबदला द्या, आम्ही बेघर झाल्यास आम्हाला राहायला घरे द्या, अशी मागणी करत नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले.
मनपा आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या आदेशावरून नगररचना उपसंचालक मनोज गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपअभियंता बाळासाहेब शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली सहायक नगररचनाकार शिवाजी लोखंडे यांच्यासह सहकाऱ्यांनी शनिवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात व नागरी मित्र पथकाच्या उपस्थितीत होणारी कारवाई नागरिकांनी रोखली.