06 March 2021

News Flash

BLOG : तुम्ही हत्तीचा नाही, माणुसकीचा खून केलात !

फटाक्यांनी भरलेलं फळ खाल्ल्यामुळे हत्तीणीचा मृत्यू

असं म्हणतात प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, एक चांगली आणि एक वाईट. काही दिवसांपूर्वी केरळमध्ये एका मुलीला पेपरला जाण्यासाठी स्थानिक सरकारने ७० आसनी बोट चालवल्याची बातमी वाचली होती. शिक्षणाप्रती दाखवलेली सजगता पाहून खरंच खूप भारी वाटलं होतं. मी देखील त्यानंतर केरळ सरकारचं कौतुक केलं आणि ते करायलाच हवं. परंतू यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये केरळची काळी बाजू पुढे आणणारी एक घटना समोर आली आहे. पलक्कड जिल्ह्यातील एका गावात फटाक्यांनी भरलेलं अननस गर्भवती हत्तीणीला खायला देण्यात आलं. ते खाल्ल्यानंतर, अननस पोटात फुटल्यामुळे या हत्तीणीला आपले प्राण गमवावे लागले. कुठून येते इतकी क्रूरता, असा पहिला विचार बातमी वाचताना मनात आला. यानंतर या बातमीसंदर्भातल्या प्रत्येक घटना वाचत असताता सतत हाच विचार मनात घोळतोय, की तुम्ही सुशिक्षत असला की सगळं काही साध्य होतं अशातला भाग नाही.

लहानपणी आजी सांगायची की माणूस हा प्राणीच मुळात वाईट. आपल्या स्वार्थासाठी जनावरं कापतो, त्यांना खातो वगैरे, वगैरे… लहानपणी आजीची ही गोष्टी ऐकताना फारसं काही कळायचं नाही. पण नंतर-नंतर देशात प्राण्यांवर अत्याचार होत असतानाच्या काही घटना वाचल्या की आजीची गोष्ट कायम लक्षात येते. माणूस हा प्राणीच मुळात वाईट. कोणी आपल्या पाळीव कुत्र्याला निर्जन रस्त्यावर सोडून जातं, कोणी एक धनाढ्य बाई कुत्र्याच्या पिल्लांना गाडीखाली चिरडते, कोणी एक मुलगा घराच्या खिडकीतून पिल्ल खाली फेकतो असे एक ना अनेक प्रसंग आजपर्यंत आपण पाहीलेत..त्या त्या वेळेपुरतं आपल्याला वाईटही वाटतं. पण केरळमधील हत्तीणीच्या मृत्यूनंतर शवविच्छेदनादरम्यान डॉक्टरांनी तिच्या पोटातून मृत पावलेलं लहान पिल्लू बाहेर काढतानाचे फोटो पाहिले त्यावेळेला मला आजीची गोष्ट समजली, माणूस हा प्राणीच वाईट.

केरळमधील वन-विभागात काम करणारे अधिकारी मोहन क्रिश्नन यांच्या फेसबूक पोस्टमुळे ही घटना प्रसारमाध्यमांसमोर आली. त्यांनी सांगितलेला अनुभव हा क्षणोक्षणी तुम्हाल माणूस म्हणून स्वतःचीच चीड आणणारा आहे. फटाक्याचा स्फोट झाल्यानंतर हत्तीणीच्या तोंड आणि सोंडेला चांगलीच दुखापत झाली. वेदना सहन होत नसल्यामुळे ती गावभर सैरावैरा पळत होती. पण अशा परिस्थितीतही तिने कोणत्याही माणसावर किंवा कोणत्याही घरावर हल्ला केला नाही. कदाचित त्यावेळी तिच्या डोक्यात आपल्या पोटात असणाऱ्या बाळाचा विचार असावा. माणसं आपल्याशी वाईट वागली, म्हणून आपणही त्यांच्याशी तसंच वागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक तो काय उरला असं तिला नक्कीच वाटलं असणार. स्फोटामुळे होत असलेल्या वेदना, पोटात भूक लागलेली असतानाही काही खाता येत नसल्यामुळे अखेरीस ही हत्तीण नदीत जाऊन उभे राहिली.

मोहन क्रिश्नन यांच्या फेसबूक पोस्टनुसार, या हत्तीणीला बाहेर काढण्यासाठी वन-अधिकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. दोन हत्तींना नदीकिनाऱ्यावर आणत तिला बाहेर काढण्याचे प्रयत्न झाले. पण माणसाच्या नीच स्वभावाची एकदा ओळख झाल्यानंतर या हत्तीणीने पाण्याबाहेर येणं पसंत केलं नाही. शवविच्छेदन करत असताना डॉक्टरांनी ही हत्तीण गर्भवती असल्याचं सांगितलं. आपल्याला जे सोसावं लागलं ते आपल्या मुलाला सोसावं लागू नये, कदाचीत याच विचारातून तिने पाण्यात उभं राहून आपला अखेरचा श्वास घेतला. अनेकदा माणूस जनावरासारखा वागला असं आपण ऐकतो, पण केरळमध्ये झालेला हा प्रकार सैतानी मनोवृत्तीचा आहे. आपल्यावर संकट आल्याशिवाय मुके प्राणी कोणावरही हल्ला करत नाही, पण माणसाचं तसं नसतं ना…आणि इथेच सगळा घोळ झालाय.

जंगल बुक सिनेमात ओम पुरींच्या आवाजात एक डायलॉग आहे. जंगलात हत्तींना महत्व का असतं हे त्यांनी सांगितलं आहे. ते आपला मार्ग स्वतः बनवतात, त्यांच्या मार्गावरुन मग नद्या वाहू लागल्या…इ.इ. अंगाने अवाढव्य असा हा प्राणी पहिल्याच नजरेत प्रेमात पडावा असा आहे. अनेकदा सर्कस किंवा एखाद्या देव संस्थानात आपण हत्तीला फळं खाताना पाहिलं आहे. हत्तीच्या ताकदीवर कोणालाच शंका नसेल, माणसाला तर सोंडेत उचलून अस्मान दाखवण्याची ताकद या प्राण्यात आहे. पण तरीही आतापर्यंत हत्तीने माणसांवर विनाकारण हल्ला केल्याच्या फार कमी घटना आपण ऐकल्या असतील. पण, असो….बैल गेला झोपा केला ही म्हण आपल्याला परिचीत आहेत. केरळ वनविभाग आता या हत्तीणीच्या मारेकऱ्यांचा शोध घेत आहे.  प्रसारमाध्यमांमध्ये ही बातमी आल्यानंतर अनेक जणं यावर आपली नाराजी व्यक्त करत आहेत. पण मनोमन ही इच्छा कायम आहे, की पुढचा जन्म घेतलास तर तथाकथित God’s Own Country मध्ये न घेता, तुझ्या जिवाची किंमत केली जाईल अश्या ठिकाणी घे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2020 7:14 pm

Web Title: elephant died because of eating pineapple stuff with crackers special write up on inhuman act in kerala psd 91
Next Stories
1 अ‍ॅम्ब्युलन्स… भयाण शांतता अन् स्तब्ध झालेली मुंबई!
2 Coronology: विषाणूवर मात करणारा मालेगाव पॅटर्न
3 Coronology: सोलापूरचे दुखणे
Just Now!
X