-श्रुति गणपत्ये

आपल्या चित्रपटसृष्टीत, टिव्ही मालिकांमध्ये राजकीय विषय अनेकदा येतात. पण त्यांची हाताळणी बालिशपणे किंवा अतिशयोक्तीपूर्ण असते. नवऱ्याच्या जागी बायकोने मंत्री बनणं ही एक अशीच अनेकदा आलेली कथा आहे. सोनी लिव्ह वर अलीकडेच प्रदर्शित झालेल्या “महाराणी” या मालिकेमध्येही हीच कथा आहे. मात्र त्याबरोबर बिहारचं राजकारण, जाती व्यवस्था आणि त्यातून होणारं शोषण, जात संघर्ष, पुरुषी मानसिकता, भ्रष्टाचार असा खूपसा मसाला घालून गोष्ट गुंतवून ठेवते. राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि पत्नी राबडी देवी यांच्यावर खरंतर कथा बेतली आहे. लालू यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यावर १९९७ मध्ये अर्धशिक्षित असलेल्या राबडीदेवी यांना मुख्यमंत्री पदी बसवण्यात आलं. त्यावेळी माध्यमं आणि राजकीय वर्तुळात त्यांची खिल्ली उडवण्यात आली, रबर स्टँप म्हणून त्यांना नाव ठेवली गेली. त्यांचं राजकीय करिअरही फारसं प्रभावी नव्हतं. पण या कथानकात मात्र सत्ता हातात आल्यावर लिहिता-वाचता न येणाऱ्या राणी भारती (हुमा कुरेशी) मध्ये जे बदल होत जातात ते खूपच छान टिपले आहेत.

भीमा भारती (सोहन शाह) हा मागास जातीतून आलेला नेता बिहारचा मुख्यमंत्री होतो. पण राजकारणातील दुश्मनीमधून त्याच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे मुख्यमंत्री पद टिकवण्यासाठी तो आपल्या बायकोला मुख्यमंत्री बनवतो. बिहारमधील जातीयता किती टोकाला पोहोचली आहे हे दाखवण्यासाठी सुरुवातीचं एकच दृश्य बोलकं आहे. शहरात नोकरी करणाऱ्या एक मागास जातीचा पुरुष गावी परत येतो तेव्हा पूर्वीच्या मालकाकडे जातो. मालक त्याला विचारतो की, त्याची बायको जी नोकर म्हणून काम करत असते ती येत का नाही? यावर तो माणूस सांगतो की, आम्ही लोकांनी ठराव केलाय उच्च जातींच्या घरी काम करायचं नाही. त्यातून मालक आणि हा माणूस यांच्यात वाद होतो. आपल्यापेक्षा खालच्या जातीच्या माणसाने तोंड वर करून आपल्याशी बोलणं, शहरात नोकरी करून आयुष्य उच्च जातीच्या मदतीशिवाय जगणं, स्वतंत्र होणं आणि मुख्य म्हणजे आपलं म्हणणं मांडण्याची हिंमत दाखवणं या गोष्टी मालकाच्या डोक्यात जातात आणि त्या माणसाला सरळ गोळी घालून ठार मारलं जातं.

एकीकडे हा मागास जातींवरील अन्याय दूर करण्यासाठी नक्षलसदृश एक गट तयार होतो तर त्यांच्याशी लढण्यासाठी उच्च वर्णीयांची वीर सेना हातात शस्त्र घेऊन सज्ज होते. या पार्श्वभूमीवर राणी ही एका खेडेगावात राहणारी, गायी-म्हशींमध्ये आणि आपल्या संसारामध्ये रमणारी एक खेडूत बाई असते. तिचा नवरा मुख्यमंत्री झाल्यावर एकदा भेटायला येतो तर ती त्याला पण गायीचं दूध काढायला लावते आणि बाजारात विकायला पाठवते. हा प्रसंग मस्तच चांगला रंगवला आहे. पण अचानक तिच्यावर मुख्यमंत्री पदाची जबाबदारी येऊन पडते आणि ती चांगलीच हडबडते. मग या तिच्या प्रवासाची कथा सुरू होते ती तिला पुन्हा नवऱ्यापर्यंतच आणून सोडते.

स्वतःची सहीसुद्धा न करता येणारी बाई फाईलींवर अंगठे मारताना काही जुजबी प्रश्न विचारते. कारण प्रत्येक नवीन प्रस्ताव, मागणी यावर सरकारकडे पैसे नाही त्यामुळे तो नामंजूर असा शेरा वित्त विभागाने मारलेला असतो. तिजोरी खाली का झाली आणि पैसे गेले कुठे असे सर्वसामान्य प्रश्न तिला पडतात. त्यातून ती वित्त सचिवाला शोध घ्यायला लावते आणि जनावरांसाठी असलेल्या धान्यामध्ये शेकडो कोटींचा घोटाळा झाल्याचं उघड होतं. त्यातून ती एका मंत्र्याला राजीनाामा द्यायला सांगते आणि तिथूनच गोष्टी बदलायला सुरुवात होते. आतापर्यंत केवळ नवऱ्याचा रबरस्टँप म्हणून असलेली तिची प्रतिमा बदलू लागते. जखमी असलेला नवराही या निर्णयाने हादरतो आणि त्याला न विचारता काहीही निर्णय घ्यायचे नाहीत हे बजावतो. पण हा सगळा गुंता साधा नसतो. अनेक गुन्हेगार, भ्रष्ट राजकारणी, त्यांना मदत करणारे बाबा-बुवा, वीर सेनेसारख्या संघटना, कीडलेली पोलीस यंत्रणा, भ्रष्ट अधिकारी अशी साखळीच तिच्यासमोर उघड व्हायला लागते. त्यातून तिची सुरुवातीची निरागसता संपून जाते आणि सत्याच्या बाजूने उभं राहायचं की नवऱ्याच्या हा मोठा प्रश्न निर्माण होतो.

हुमा कुरेशीने एका खेडूत संसारी बाईपासून ते बिहारची मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी घेण्यापर्यंत प्रवास खूपच सहज पण ताकदीने उभा केला आहे. बऱ्याच काळानंतर अशी स्त्री केंद्रीत भूमिका तिला मिळाली. बिहारमधील वातावरण निर्मिती, पुरुषप्रधान राजकारण, भ्रष्टाचाराबद्दल जराही लाज न बाळगणारे नेते-अधिकारी, हिंसा यांची गुंफण कथानकामध्ये खूपच चांगली झाली आहे. विशेषतः भ्रष्टाचार कसा झाला हे अगदी सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितलं आहे. गोष्टीमध्ये पुढे काय होणार याचा थोडाफार अंदाज येत असला तरी १० भाग आपल्याला गुंतवून ठेवतात. प्रत्यक्ष मंत्रालयातले प्रसंग, विधानसभेमध्ये विरोधीपक्षाने पहिल्यांच राणीवर निरक्षर म्हणून आरोप करून तुटून पडणं आणि त्यावर प्रसंगावधान राखत राणीने उत्तर देणं, नंतर भ्रष्टाचाराची स्वतःच कबुली देणं आणि आपल्या मंत्र्यावर कारवाई करणं अशी अनेक दृश्यं खूप चांगली घेतली आहेत.

मालिकेचे निर्माते सुभाष कपूर ज्यांच्या नावावर “जॉली एलएलबी” आणि “जॉली एलएलबी टू” सारखे चांगले चित्रपट आहेत त्यांनीच महाराणी बनवला आहे. मात्र त्यांच्या “मॅडम चीफ मिनिस्टर” या अलीकडेच आलेल्या चित्रपटाने घोर निराशा केली होती. रिचा चढ्ढासारखी अभिनेत्री मुख्य भूमिकेत असूनही आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या आयुष्यावरून कथानक घेऊनही खूप वाईट चित्रपट होता. पण त्याची भरपाई कदाचित त्यांनी या आणखी एका महिला मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून केली असावी. महिला आणि राजकारण यावर कमी बोललं, लिहिलं किंवा दाखवलं जातं. महाराणी मालिकेमध्येही अनेक ठिकाणी लोकप्रियतेसाठी काही गोष्टी केल्या आहेत. पण एका गांभीर्याने मालिका बनवलेली आहे हे निश्चित.

 

shruti.sg@gmail.com