सुनीता कुलकर्णी

शहरात तसंच गावातल्या शेतांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलांना पळवून लावण्यासाठी जपानी लोकांनी मॉन्स्टर वोल्फ तयार केले असून त्याच्या आवाजाला आणि हालचालींना घाबरून अस्वलं पळ काढताना बघून जपानी लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

करोना महासाथीच्या काळातील टाळेबंदीमुळे माणसांचा वावर कमी झाला आणि त्यांची चाहूल लागेनाशी झाली तेव्हा जंगलातल्या प्राण्यांनी शहरांच्या दिशेने वावरायला सुरूवात केली. जपानच्या उत्तर भागात अस्वलांनी शहरात, गावांमध्ये यायला सुरूवात केली आणि लोकांची घाबरगुंडी उडाली. कारण अस्वलांचे दिसतील त्या माणसांवर हल्ले सुरू झाले. त्यांच्यामुळे वाहनांचे अपघात होऊन अस्वलं आणि माणसं जखमी व्हायला लागली. त्यांनी गावांमधल्या शेतांमध्येही धुमाकूळ घालायला सुरूवात केली होती.

अर्थात हे काही फक्त करोना काळातच घडलेलं नाही तर गेली पाच वर्षे हा प्रकार सुरू आहे. पण गेल्या एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या काळात अस्वलं शहरांमध्ये, गावांमध्ये येण्याचं प्रमाण वाढलं आहे. या काळात १३ हजार वेळा शहरांमध्ये, महामार्गांवर, शेतांमध्ये अस्वलांचा वावर आढळला, अशी जपान सरकारची आकडेवारी आहे. कचराकुंडीतील अन्नावर, फळबागांमधल्या फळांवर ही अस्वलं ताव मारताना आढळली. हवामानबदलांच्या परिणामामुळे अस्वलांना जंगलात खाणं मिळत नाहीये आणि ती शहरांकडे सरकत आहेत असंही सांगितलं जातं आहे.

पण जपानी लोकांनी अस्वलांना घालवायला फटाके वाजवणं, त्यांना मारून टाकणं असे अघोरी प्रकार केले नाहीत. काही ठिकाणी कुंपणं घालणं, सापळे लावणं हे प्रकार केले गेले. पण होकायडो येथील ओहता सेकी या  फर्मने चक्क रोबोटिक लांडगे तयार केले असून या ‘मॉन्स्टर वोल्फ’ला घाबरून अस्वल पळून जाताना दिसतात. हा ‘मॉन्स्टर वोल्फ’ लांडग्यासारखे आवाज काढतो आणि त्याच्यासारख्याच हालचाली करतो.

शेतात येऊन पिकाची नासधूस करणारे हत्ती ही गेल्या काही वर्षांमधली आपल्याकडची गंभीर समस्या आहे. मग त्या हत्तींना पळवून लावण्यासाठी स्थानिक लोक कधी वनखात्याच्या सहकार्याने तर कधी परस्पर वेगवेगळे उपाय योजत राहतात. त्यातून फटाक्यांनी भरलेला अननस ठेवणे आणि त्याचा तोंडात स्फोट झाल्यामुळे हत्तीणीचा मृत्यू होणं यासारखे अमानुष प्रकारही घडतात. त्या पार्श्वभूमीवर ही रोबोटिक लांडग्याची शक्कल भारीच म्हणायची.