scorecardresearch

‘लता’ जीवेत्‌ शरद: शतम्‌ !

सागराची गाजेशी, मेघांत कडाडल्या विजेशी,, मनमोहन मेघश्यामाच्या ओठांवर विसावलेल्या अलगुजाशी, युगानुयुगाचं नातं सिद्ध करणारा ’लता’चा स्वर…

फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस

अरुण काकतकर

संस्कृत, मराठी अक्षर-साहित्यातल्या, अगदी पुराणकालीन भगवद्‌ गीतेपासून ते बाराव्या शतकातल्या भावार्थदीपिका अर्थात ज्ञानेश्वरीपासून ते अर्वाचीन काळांतल्या साहित्यामधल्या सोनसळी शब्दकळांना, कंठातल्या ज्वालाफुलांमधून तावून सुलाखून पार करीत, झळाळी देत, उजळत, रसिकांच्या तृषार्त श्रवणेंद्रियांना सामोरा जातोय, गेली जवळपास पांच तपं, एक अद्वितीय, नादब्रह्मातल्या प्रत्येक श्रुतीचा मापदंड असलेला ’लता’चा स्वर. खर्जा पासून, मंद्र, तार आणि कधीकधी अतितारापर्यंत, जवळपास सव्वादोन सप्तक, ’सहज-प्रवाही’, शंखनादाची गंभीरता, ललनेच्या कांकणांच्या नादातलं आश्वासन, मुग्धेच्या पैंजणांतल्या किणकिणीची निरागसता, शयनेषु रंभा’ नायकिणीच्या चाळांच्या ठसक्यातलं शृंगारिक आवाहन, मंदिरातल्या घंटानादाच पावित्र्य, रणांगणातल्या असिधारेचं ओज आणि स्फुल्लिंग, अशी विविधरंगांची, घाटांची लेणी ’एकसमयावच्छेदेकरून’ मिरवणारा ’लता’चा स्वर…कितीकिती, कुणीकुणी आणि कायकाय लिहावं, बोलावं…सगळं सगळं अपुरंच पडणार..स्वर-शब्द-भावांपलीकडलं आहे हे सगळं…अवकाशाला ओंजळीत धरण्याच्या व्यर्थ प्रयत्नांसारखं…या विशेषणांना सोदाहरण सिद्ध करायचं म्हटलं तर अगणित ग्रंथ अपुरे पडतील आणि ’दशांगुळे उरला’ अशी अवस्था होईल…

’अरे अरे ज्ञाना झालासी पावन ।’
सार्थ झाला हा चरण, जेंव्हा त्या’अक्षरां’ना आंजारत-गोंजारत, कुरवाळलं, ’लता’च्या स्वरांनी…
सागराची गाजेशी, मेघांत कडाडल्या विजेशी,, मनमोहन मेघश्यामाच्या ओठांवर विसावलेल्या अलगुजाशी, युगानुयुगाचं नातं सिद्ध करणारा ’लता’चा स्वर…

लता, आम्ही तुझ्या युगांत जगतो आहोत हे आम्हा सगळ्यांचं किती महद्भाग्य आहे, हे तुला कसं कळावं ?

नगाधि, सागर, तारे, वारे, निर्मळ निर्झर झुळझुळणारे
अथांग अवकाशाचा अनाहत अनुनाद, मायेंत भिजलेली वत्सल साद
सुख-दु:खाना तुझ्या गाण्याचाच थांग ! कसं सगळं विसरू सांग ?
देवबीव झूठ सगळं, असेल तुझ्याच स्वरांच हे नांव वेगळं,
गाईच्या डोळ्यांतलं आर्त भेटतं, गाणं तुझं जेंव्हा काळजांत दांटतं
जगण्याला रोज तुझ्या भूपाळीची ’बांग !.कसं आम्ही विसरावं सांग ?

गीतेच्या अध्यायांतला, ज्ञानदेवांच्या विराण्यातला किंवा हरिपाठाच्या किंवा तुकयाच्या अभंगातला, संस्कृत, प्राकृत, मराठी मधाळ शब्द, असो किंवा गालिब, राजा मेहेंदी अलि खान, मीर तकी मीर, साहिर लुधियानवी, मजरूह सुलतानपुरी, हसरत जयपुरी, शैलेन्द्र, कैफी आझमी यांच्या शायरीतला ’सुरे’च्या कैफांत दडलेला ऊर्दू शब्द असो किंवा मीरा-सूर-कबीर ते पंडित नरेंन्द्र शर्मा यांच्या भजन-दोह्यांतला सगुण, मधुरा-भक्तीतं भिजलेला शब्द असो,

’लता’चा स्वर त्यातल्या अभिप्रेत ध्वन्याथ, व्यंग्यार्थ, दृष्टांत, श्लेष, रूपक या शुष्क व्याकरणी संज्ञांच्याही पलीकडचं कांहीतरी सांगून जातो…
कारण, ’लता’च गाण म्हणजे नुसतं गाणं नसत…

शब्द-स्वर-भावांपलीकडचं ते एक ’सांगण’ असतं

कथेतली व्यथा, व्यथेतली आर्तता, कवितेतली प्रीती, त्यांतली उत्कट अनुभूती यांना, जाई, जुई, हिरवा, कवठी, सोनचाफा, चंदनाच्या मंद सुगंधाचं देण असतं…

अहो ! नुसतं ’शिवकल्याण राजा’ ऐकलं तरी कोण कोण भेटत आपल्याला ’लता’च्या स्वरांतून ?

समर्थ रामदासांपासून, कवि भूषण, गोविंदाग्रज, स्वातंत्र्यवीर सावरकर, कुसुमागज, ते अगदी कविवर्य शंकर वैद्यांपर्यंत, ’मर्‍हाठी’ काव्यप्रतिभेचे समस्त मानदंड…

’गुणि बाळ असा..’, ’वेडांत दौडले वीर मराठे सात…’, ’निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु…’
कायकाय म्हणून आठवावं ? हे तो…

हे सप्तसुरांचे हृदय आणि माहेर,
’मॉं’ सरस्वतीच्या वीणेचा शृंघार,
गोपाला हाती वेणु आर्तशी मंद्र,
श्रीहरिच्या शंखातील खर्ज गंभीर
ही शिवतेजाची लखलखती असिलता,
ही उमा-रमेच्या हृदयी वत्सल गाथा,
ही विनायकाच्या शब्दामधले ओज,
अन्‌ अग्रज कविच्या उर्मीमधली वीज
ही ग्रीष्मानंतर श्रावणसर, गारवा,
अन्‌ गाभार्‍यांतिल मंद तुपाचादिवा,
हा स्थीरस्वर स्वरनिधीत दीपस्तंभ,
हा नादमंथनोत्तरी दिव्यश्रुतिकुंभ,
हा मांगल्याचा पावनक्षम गंगौघ,
हा प्रेम, विरह अन्‌ करुणेचा आवेग,
हा ज्ञानेशाच्या ओवीचा परिमळू,
हा तुकयाचा अन्‌ अभंग अक्षय बोलू,
अवतरली मीरा पुनश्च अवनीवरी,
रघुरायकृपेने समर्थ ही वैखरी

(लेखक आकाशवाणी मुंबई येथे निर्माता म्हणून कार्यरत)

मराठीतील सर्व ब्लॉग्स ( Blogs ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lata mangeshkar death article abaout lata mangeshkar by arun kakatkar vsk

ताज्या बातम्या