सरकारच्या पाठिंब्यावरून पूर्णविरामाची भाषा शिवसेनेकडून जाहीरपणे व्यक्त होत असली तरी मराठवाडय़ात जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला अनुल्लेखाने मारले. औरंगाबाद हा सेनेचा बालेकिल्ला तर हिंगोलीमध्ये शिवसेनेची मोठी ताकद. हिंगोली जिल्हा परिषदेवर शिवसेनेची सत्ता होती, मात्र दोन्ही ठिकाणी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सेनेवर बोलण्याचे टाळले. काँग्रेस व राष्ट्रवादीवर टीका करण्याऐवजी दोन वर्षांत घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाची उजळणी प्रचारसभांमध्ये दिसून आली. हिंगोलीतून शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी माने, परभणीमध्ये शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख शिवाजी दळणर यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला.

पैठण तालुक्यातील बिडकीन येथे जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली. पैठणचे आमदार शिवसेनेचे आहेत. या तालुक्यातील ९ गटांपैकी ३ गटांमध्ये शिवसेनेचे वर्चस्व होते. मात्र, मराठवाडय़ातील एकाही सभेत त्यांनी शिवसेनेचा उल्लेखही केला नाही.

माजी खासदार शिवाजी मानेंनी चौथ्यांदा पक्ष बदलला

शिवसेनेच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आलेले शिवाजीराव माने यांनी घुसमट होत असल्याचे सांगत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तेथे ते रमले नाहीत. मग ते काँग्रेसमध्ये गेले. तेथे त्यांना जिल्हाध्यक्षपदही देण्यात आले. त्यांनी पुन्हा पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.  काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि आता भाजप असे सर्व पक्ष फिरणारे ते एकमेव माजी खासदार असावेत.