चाचपणी करण्याची शिवसेनेतील काही जणांवर गुप्त जबाबदारी; उमेदवारी देण्याबाबत उद्धव ठाकरे यांची अद्याप अनुकूलता नाही

भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर बंडखोरी वेळीच आळा बसावा याची खबरदारी घेत ‘मातोश्री’ने यादी जाहीर न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ‘मातोश्री’ने निवडणुकीच्या कामाला लागण्याचे संकेत दिल्यामुळे उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचे समजून अनेकांनी कार्यकर्त्यांची फौज जमविण्यास सुरुवात केली आहे. या मंडळींना मंगळवारी रात्रीपासून विभागप्रमुखांच्या माध्यमातून ‘एबी’ अर्जाचे वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र विभागप्रमुखांना उमेदवारी देण्याबाबत अद्यापही पक्षप्रमुख अनुकूल नाहीत. अट्टहासापोटी विभागप्रमुखांना उमेदवारी देण्याची वेळ आलीच तर त्यांना त्यांचे सध्याचे पद सोडावे लागण्याची शक्यता आहे.

गेले काही दिवस मुंबईतील २२७ प्रभागांमधील इच्छुकांच्या भेटीगाठी घेऊन शिवसेना पक्षप्रमुख अद्धव ठाकरे यांनी निवडणुकीची यादी निश्चित केली आहे. मात्र भाजपबरोबर काडीमोड घेतल्यानंतर शिवसेनेतील उमेदवारीपासून वंचित राहिलेले इच्छुक बंडखोरी करण्याची शक्यता लक्षात घेत उमेदवारांची यादी जाहीर न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र उमेदवारी देण्यात येणाऱ्या व्यक्तीला कामाला लागण्याची सूचना दस्तुरखुद्द उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

त्यामुळे मुंबईतील अनेक प्रभागांमधील शिवसेनेचे उमेदवार कामाला लागले आहेत. गोव्याला जाण्यापूर्वी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या उमेदवारांचे एबी अर्ज विभागप्रमुखांकडे सोपविण्यात आले. मंगळवारी रात्रीपासून विभागप्रमुखांनी आपापल्या विभागातील उमेदवारांना बोलावून एबी अर्ज देण्यास सुरुवातही केली. तसेच काही विभागप्रमुखांनी बुधवारी या अर्जाचे वाटप केले.

मुंबईमधील काही विभागप्रमुख पालिका निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. तर काही विभागप्रमुख आपली पत्नी, मुलगी आणि मुलाला उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही आहेत. काही दिवसांपूर्वी या विभागप्रमुखांनी एकत्रितपणे ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन उमेदवारीसाठी आग्रह धरला होता. त्यामुळे विभागप्रमुख आणि त्यांच्याशी संबंधितांच्या उमेदवारीबाबत तूर्तास निर्णय झालेला नाही.

गोव्याहून परत आल्यानंतर त्यांच्या उमेदवारीबाबत उद्धव ठाकरे विचार करणार आहेत. त्यासाठी या विभागप्रमुखांना बुधवारी रात्री उशीरा ‘मातोश्री’वर बोलावण्यात आले आहे. असे असले तरी इच्छुक विभागप्रमुखांना उमेदवारी नाकारल्यास त्याचे काय परिणाम होतात याची चाचपणी करण्याची जबाबदारी काही जणांवर गुप्तपणे देण्यात आली आहे.

आपापल्या विभागातील प्रभागांमधील उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी विभागप्रमुखांवर सोपविण्यात आली आहे.

त्यामुळे विभागप्रमुखांना उमेदवारी मिळणार नाही, असा निर्णय उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच घेतला आहे. आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी काही विभागप्रमुख आग्रह धरत आहेत.