scorecardresearch

‘क्रेडिट सुईस’ही संकटग्रस्त; भारतावर मात्र परिणाम नाही

क्रेडिट सुईस बँक भविष्यात बुडाल्यास त्याचा फारसा परिणाम भारतीय बँकिंग व्यवस्थेवर होणार नाही, असा निर्वाळा वरिष्ठ वर्तुळातून दिला जात आहे.

Credit Suisse trouble
‘क्रेडिट सुईस’ही संकटग्रस्त; भारतावर मात्र परिणाम नाही (image source – File/IE)

पीटीआय, नवी दिल्ली

आर्थिक संकटात सापडलेल्या क्रेडिट सुईस बँकेकडून भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. तरीही बँकेच्या आर्थिक स्थैर्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात असून, ही बँक भविष्यात बुडाल्यास त्याचा फारसा परिणाम भारतीय बँकिंग व्यवस्थेवर होणार नाही, असाही निर्वाळा वरिष्ठ वर्तुळातून दिला जात आहे.

देशात कार्यरत असलेल्या परदेशी बँकांमध्ये क्रेडिट सुईस बाराव्या स्थानी आहे. बँकेची भारतातील मालमत्ता २० हजार ७०० कोटी रुपये आहे. सिलिकॉन व्हॅली बँकेप्रमाणे क्रेडिट सुईस बँक बुडाली तरी त्याचा भारतीय बँकिंग व्यवस्थेला धोका नाही. कारण भारतीय बँकिंग व्यवस्थेतील मालमत्तेत क्रेडिट सुईसचा हिस्सा केवळ ०.१ टक्का आहे. असे असले तरी वायदे बाजारात बँकेचे दखल घेण्यासारखे अस्तित्व आहे. बँकेकडील ६० टक्के मालमत्ता ही कर्जातून उभी राहिलेली आहे. त्यातील ९६ टक्के ही दोन महिन्यांपर्यंतच्या मुदतीच्या कर्जाची आहे.

देशातील एकूण बँकिंग व्यवस्थेचा विचार करता परदेशी बँकांचा मालमत्तेतील हिस्सा ६ टक्के, कर्जातील हिस्सा ४ टक्के आणि ठेवीतील हिस्सा ५ टक्के आहे. या बँका प्रामुख्याने वायदे बाजारात सक्रिय आहेत. तिथे त्यांचा हिस्सा ५० टक्के आहे. क्रेडिट सुईसची भारतातील एकमेव शाखा मुंबईत आहे.

क्रेडिट सुईसच्या समभागाची उसळी

जिनिव्हा : स्वित्झर्लंडमधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी बँक असलेली क्रेडिट सुईसच्या समभागाने गुरुवारी ३० टक्क्यांची उसळी घेतली. स्वित्झर्लंडची मध्यवर्ती बँक सुईस सेंट्रल बँकेकडून ५४ अब्ज डॉलरचे कर्ज घेऊन आर्थिक स्थिती भक्कम करण्याची घोषणा क्रेडिट सुईसने केली. यानंतर गुंतवणूकदारांमध्ये उत्साही वातावरण निर्माण होऊन भांडवली बाजारात बँकेच्या समभागात तेजी दिसून आली.

क्रेडिट सुईस बँकेचा सर्वांत मोठा भागधारक असलेल्या सौदी नॅशनल बँकेने आणखी गुंतवणूक न करण्याचे जाहीर केल्यानंतर बँकेच्या स्थितीबाबत चर्चा सुरू झाली होती. परिणामी जगातील सहा भांडवली बाजारांमध्ये क्रेडिट सुईसचा समभाग बुधवारी ३० टक्क्यांनी कोसळला होता. क्रेडिट सुईसच्या समभागांमध्ये घसरण झाल्याने अमेरिकेसह युरोपमधील बँकिंग व्यवस्थेत चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. अमेरिकेतील काही बँका कोसळल्याने जागतिक बँकांच्या स्थितीबद्दल साशंकता व्यक्त होत आहे. याचाही फटका क्रेडिट सुईसला मोठ्या प्रमाणात बसला.

अमेरिकेतील बँकांच्या आधीपासून क्रेडिट सुईसची समस्या सुरू आहे. क्रेडिट सुईस बँकेने मध्यवर्ती बँकेकडून ५० अब्ज फ्रँक्स (५३.७ अब्ज डॉलर) कर्जाऊ घेण्याचा पर्याय स्वीकारण्याचे जाहीर केले. क्रेडिट सुईसने म्हटले आहे की, अतिरिक्त निधीच्या उपलब्धतेमुळे बँकेला मुख्य व्यवसाय आणि ग्राहकांना सेवा देता येणे शक्य होणार आहे. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन अधिक सोपी आणि ग्राहककेंद्री सुविधा देण्यावर बँकेचा भर आहे.

क्रेडिट सुईसवरील संकटाची कारणे

क्रेडिट सुईसमध्ये आणखी गुंतवणूक न करण्याचा निर्णय सौदी नॅशनल बँकेने जाहीर केला. कारण नियामक चौकटीनुसार सौदी नॅशनल बँकेला क्रेडिट सुईसमध्ये दहा टक्क्यांपेक्षा अधिक गुंतवणूक करता येत नाही. सौदी बँकेची क्रेडिट सुईसमधील गुंतवणूक १.५ अब्ज फ्रँक्स असून, ती कमाल मर्यादेच्या जवळ आहे. सौदी बँकेच्या घोषणेनंतर स्वित्झर्लंडच्या भांडवली बाजारात क्रेडिट सुईसचे समभाग कोसळल्याने त्यांचे व्यवहार आपोआप थांबविले गेले होते.

मराठीतील सर्व अर्थवृत्त ( Finance ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-03-2023 at 14:06 IST
ताज्या बातम्या