रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा वितरणातून काढून घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा फायदा बँकांना होण्यासह, अर्थव्यवस्थेलाही होऊन ती इच्छित ६.५ टक्क्यांचा विकासदर गाठण्याची चिन्हे आहेत, असा रिझर्व्ह बँकेने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालाचा निष्कर्ष आहे.
या नोटाबदलीमुळे बँकांच्या ठेवी वाढण्यासह त्यांच्या कर्जांच्या वसुलीतही वाढ होईल, असे सोमवारीच प्रसिद्ध झालेल्या स्टेट बँकेच्या संशोधन अहवालानेही म्हटले आहे.
रिझर्व्ह बँकेने १९ मे रोजी दोन हजारांच्या नोटा वितरणातून काढून घेण्याचा निर्णय घेतला. या नोटा बँकांमध्ये बदलण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. सरलेल्या ३१ मार्चअखेर दोन हजारांच्या ३.६२ लाख कोटी रुपये मूल्याच्या म्हणजेच १०.८ टक्के नोटा चलनात होत्या. त्यातील १.८ लाख कोटी म्हणजेच निम्म्या नोटा परत आल्याचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ८ जूनला जाहीर केले. त्यातील १.५ लाख कोटी रुपये बँकांमध्ये जमा करण्यात आल्या तर उरलेल्या अन्य मूल्याच्या नोटांमध्ये बदलून घेण्यात आल्या.
हेही वाचाः अनिल अंबानींवर आणखी एक संकट; आता ‘ही’ कंपनी बंद होण्याची शक्यता
दोन हजारांच्या ३.०८ लाख कोटी रुपयांच्या नोटा बँकांमध्ये जमा केल्या जातील. त्यातील ९० हजार कोटी रुपये बचत खात्यांमध्ये ठेव रूपात येतील. जरी बचत खात्यांमध्ये जमा होणाऱ्या रकमेपैकी ६० टक्के रक्कम नंतर काढून घेतली गेली तरी याचा एकंदर परिणाम बँक ठेवींमध्ये वाढ, कर्जाच्या परतफेडीला चालना, ग्राहकांच्या उपभोग- मागणीत तब्बल ५५,००० कोटी रुपयांनी वाढ, रिझर्व्ह बँकेच्या किरकोळ डिजिटल चलनाला (ई-रूपी) चालना आणि अर्थव्यवस्थेला संभाव्य वाढीस हातभारात होऊ शकते, असे स्टेट बँकेच्या अहवालाने म्हटले आहे.
हेही वाचाः ५ अन् १० नव्हे तर जुलैमध्ये ‘इतके’ दिवस बँका राहणार बंद; पाहा संपूर्ण यादी
या नोटाबदलीमुळे चालू आर्थिक वर्षात सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) वाढ होण्याचा अंदाज रिझर्व्ह बँकेच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत जीडीपी ८.१ टक्क्यांवर जाण्याचा अंदाज आहे, तर संपूर्ण आर्थिक वर्षासाठी जीडीपी वाढ ही ६.५ टक्के अंदाजाच्याही पुढे जाण्याची शक्यता या अहवालाने वर्तविली आहे.
नोटाबदलाचे परिणाम
- पेट्रोल पंप आणि खाद्यान्न बटवडा ॲपकडे दोन हजारांच्या नोटांचे प्रमाण अधिक
- मंदिरे आणि धार्मिक ठिकाणी दानपेट्यांत दोन हजारांच्या नोटांचे प्रमाण जास्त
- चालू आर्थिक वर्षात सकल राष्ट्रीय उत्पादनात वाढ होणार
- सोने, दागिने, एसी, मोबाइल, घरांच्या विक्रीत वाढ अपेक्षित
- चलनात जास्त मूल्याच्या नोटा नसल्याने ‘ई-रूपी’चा जलद स्वीकार शक्य