मुंबई: भारत आणि युरोपीय महासंघादरम्यान मुक्त व्यापार करार (एफटीए) वाटाघाटी पुढील टप्प्यावर नेण्यास उत्सुक असल्याचे स्पेनचे अध्यक्ष पेड्रो सांचेझ यांनी मंगळवारी येथे सांगितले. सुमारे २७ देशांचा समूह असलेला युरोपिय महासंघ भारताशी मजबूत संबंधांबाबत आशावादी असल्याचे त्यांनी त्यांच्या पहिल्यावहिल्या मुंबई भेटीत स्पष्ट केले.

युरोपीय महासंघाने उभयतांतील द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्याच्या उद्देशाने मुक्त व्यापार करार प्रस्तावित केला. दोन्ही बाजू सध्या, गुंतवणूक संरक्षण करार आणि भौगोलिक संकेतांवरील करार यावर वाटाघाटी करत आहेत. या मजबूत संबंधांतून साध्य करता येणाऱ्या परिणामांची क्षमता खूप मोठी आहे. स्पेन जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे आणि त्याने भारतात ४.२ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. मुक्त व्यापार करारामुळे बाजारपेठांचा आकार आणि विविधता वाढण्यास मदत होईल, असे भारतीय उद्योग महासंघ अर्थात ‘सीआयआय’ने आयोजित केलेल्या स्पेन इंडिया बिझनेस समिटला संबोधित करताना सांचेझ यांनी नमूद केले.

हेही वाचा : बँकांच्या समभागांकडून ‘सेन्सेक्स’ला बळ

आमच्याकडे सौर आणि पवन ऊर्जेतील अनुभवासह भारताला देण्यासारखे बरेच काही आहे. आमचे कौशल्य भारताला २०३० पर्यंत ५०० गिगावॉट अक्षय्य ऊर्जेचे उद्दिष्ट गाठण्यात मदत करू शकते. आम्ही भारताची ऊर्जा सुरक्षा आणि हरित संक्रमणाला चालना देण्यासाठी भागीदारी करण्यासाठी वचनबद्ध आहोत. ते पुढे म्हणाले की, स्पेनची प्रगत रेल्वे प्रणाली, भुयारी मार्गांचे जाळे आणि वाहतूक उपाय भारताच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना खूप फायदेशीर ठरू शकतात. कार्यक्षम आणि शाश्वत वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी त्यांनी स्पॅनिश अभियांत्रिकी कंपन्यांचे कौशल्य भारताला उपलब्ध करून देण्याची इच्छा व्यक्त केली.

हेही वाचा : मुहूर्ताचे सौदे यंदा शुक्रवारी संध्याकाळी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिखर परिषदेदरम्यान, भारताचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०७० पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य निश्चित केले आहे. यासाठी हरित ऊर्जा आणि हरित गतिशीलता यांना प्राथमिकता आहे. स्पेनमध्ये या संबंधाने आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे, ज्यायोगे भारतात मोठ्या प्रमाणावर पवन आणि सौर ऊर्जा निर्मितीचा खर्च कमी होण्यासह, जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मकता वाढवता येऊ शकेल.